नागपूरला वाहन उद्योगात गुंतवणुक
होण्यासाठी निश्चित प्रयत्न करु : मुख्यमंत्री
मुंबई, दि. 15 : नागपूर आणि परिसरात वाहन उद्योगात गुंतवणुक व्हावी, यासाठी राज्य शासन निश्चितपणे प्रयत्न करील आणि अशा उद्योजकांशी संपर्क साधुन त्यांना यासाठी प्रवृत्त केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज नागपूरच्या उद्योजकांच्या शिष्टमंडळाला दिले.
विदर्भ इंडस्ट्रिज असोसिएशनच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयात श्री. चव्हाण यांची भेट घेतली व नागपूरला वाहन उद्योगाचा विकास करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी केली, त्यावेळी श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री नारायण राणे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, उद्योग सचिव डॉ. के. शिवाजी, असोसिएशनचे अध्यक्ष प्रफुल्ल दोशी, सचिव आकाश अग्रवाल, माजी अध्यक्ष प्रविण तापडीया, सुरेश अग्रवाल, सदस्य रोहित बजाज उपस्थित होते.
पुणे परिसरामध्ये अनेक नामवंत वाहन उद्योग समुहांनी आपले निर्मिती प्रकल्प सुरु केले आहेत. त्यामुळे या परिसराच्या विकासाला मोठी चालना मिळाली आहे. नागपूर येथे जमीन, पायाभूत सुविधा, मनुष्यबळ, पोषक वातावरण आदी सुविधा असल्याने राज्य सरकारने नागपूरला वाहन उद्योग येण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा