पोलीस अधिकाऱ्यांनी सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभ्यास करावा
- मुख्यमंत्री
मुंबई, दि.15 : नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा राज्य शासनाने निर्धार केला आहे. दहशतवाद्यांना समर्थपणे तोंड देण्यासाठी पोलीस दल अधिक सक्षम करत असताना या दलात काम करणाऱ्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी सुरक्षिततेच्याबाबत सुरू असलेल्या प्रभावी उपाययोजनांचा अभ्यास करावा, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
पोलीस दलाच्या आधुनिकीकरणा संदर्भात नागपूर येथील गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक यशस्वी यादव यांनी माहिती तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून सुरक्षेच्या दृष्टीने सुरू असलेल्या उपाययोजनांबाबत सादरीकरण केले, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या बैठकीस उप मुख्यमंत्री अजित पवार, गृह मंत्री आर.आर.पाटील, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव उमेशचंद्र सरंगी व गृह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
दहशतवादी हल्ला घडविताना दहशतवाद्यांकडून वापरल्या जाणाऱ्या पद्धती आणि त्यांना तोंड देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अत्याधुनिक यंत्रणांची माहिती यावेळी पोलीस अधीक्षक यादव यांनी दिली. यावेळी गृह मंत्री आर.आर.पाटील यांनी राज्यात सुरक्षेच्या दृष्टीने हाती घेतलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. सुरक्षेच्या दृष्टीने वापरल्या जाणाऱ्या अद्यावत रडार टेक्नॉलॉजीबाबत माहिती उपलब्ध करून द्यावी असे आदेशही त्यांनी यावेळी दिले.
मुंबईच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले असून सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याच्या कामाला गती द्यावी असे आदेश देऊन मुख्यमंत्र्यांनी मुंबईबरोबरच नागपूर आणि पुणे येथेही सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत कार्यवाही सुरू करावी अशी सूचना यावेळी केली.
--0--
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा