खडतर परिस्थितीत यश मिळविणाऱ्या युवराजच्या
पाठीशी राज्य शासन सदैव राहिल - मुख्यमंत्री
मुंबई,िद. 15: आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत अप्रतिम कामगिरी करीत युवराज वाल्मिकीने देशासह महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे. अत्यंत खडतर परिस्थितीत राहून मेहनतीने हे यश मिळविणाऱ्या युवराजच्या पाठीशी राज्य शासन सदैव राहील, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण युवराजच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली.
चीनमध्ये नुकत्याच झालेल्या आशियाई चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत भारताच्या विजेतेपदात मोलाची कामगिरी बजावलेल्या आणि मुंबईचा रहिवासी असलेला हॉकीपटू युवराज वाल्मिकी याला राज्य शासनातर्फे श्री. चव्हाण यांच्या हस्ते आज 10 लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा व युवक कल्याण मंत्री पद्माकर वळवी, क्रीडा राज्यमंत्री भास्कर जाधव, प्रधान सचिव संजय कुमार, हॉकीपटू धनराज पिल्ले, क्रीडा विभागाचे सहसंचालक नरेंद्र सोपल आदी मान्यवर उपस्थित होते.
युवराजला राज्य शासकीय सेवेत वर्ग 2 च्या राजपत्रित अधिकारी पदावर नोकरी देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांनी यावेळी सांगितले. उदयोन्मुख खेळाडुंना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यास शासन कटीबद्ध आहे. राज्यात क्रीडाविषयक सुविधा उपलब्ध करून देणे, तालुका, जिल्हा व विभाग स्तरावर क्रीडा संकुलांची उभारणी करणे आदी कामांना गती देण्यात आली आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा