माजी केंद्रीय मंत्री वसंत साठे यांना अखेरचा निरोप
मुख्यमंत्री चव्हाणांनी घेतले त्यांच्या निवास्थानी अंत्यदर्शन
नवी दिल्ली,दि.24 सप्टेंबर-जेष्ठ कॉग्रेस नेते,माजी केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्री वसंत साठे यांचे काल रात्री आठ वाजताच्या सुमारास दिल्लीत निधन झाले.निधनाचे वृत्त समजताच शनिवारी गुडगांव भागातील सुशांत लोक कॉलनीतील ए-108 या निवास्थानी त्यांच्या अत्यंदर्शनासाठी नेते,पक्षकार्यकर्ते व मराठी भाषा संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी एकच गर्दी केली.राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही दिल्ली येथे येऊन साठे यांच्या निवास्थानी जाऊन त्यांचे अत्यंदर्शन घेतले व त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.वसंत साठे यांचे पुत्र सुभाष साठे यांचे सोबत त्यांनी बापूसाहेब यांच्या सोबतच्या आठवणींना उजाळा दिला.वसंत साठे यांनी देहदानाची इच्छा व्यक्त केली होती.त्यांचे डोळे प्राणज्योत मालवताच काढून लागोलाग एका अंध व्यक्तीला लावण्यातही आले,ही माहिती सुभाष यांनी देताच,साठे साहेबांच्या तत्वासाठी निग्रह आणि सामाजिक जाणीव सर्वांसाठीच आदराची होती, असे उद् गार मुख्यमंत्र्यांनी आदरांजली व्यक्त करताना काढले.
मुख्यमंत्री यांच्यासोबत यावेळी राज्याचे येथील निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव बिपीन मलिक,आमदार कृपाशंकर सिंह,आमदार निलेश पारवेकर,युवक कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांनीही अंत्यदर्शन घेतले. वसंत साठे यांचे दिल्लीत मराठी सांस्कृतिक जीवनाशी अतूट नाते होते.
त्यांचे निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री विलासराव देशमुख,सामाजिक न्याय मंत्री मुकुल वासनिक,ओडिशा राज्याचे राज्यपाल मुरलीधर भंडारे,सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती वी.एस.सिरपूरकर,भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी,माजी केंद्रीय मंत्री एन केपी साळवे,मोतिलाल व्होरा,माखनलाल फोतेदार,कॉग्रेस नेते मोहनप्रकाश,भाजपा प्रवक्ता प्रकाश जावडेकर उपस्थित होते.महामहिम राष्ट्रपति प्रतिभाताई देवीसिंग पाटील,उपराष्ट्रपती ड़ॉ.हामीद अन्सारी,राज्यपाल के.शंकरनारायणन यांच्यावतीनेही त्यांच्या मृतदेहावर यावेळी पुष्पचक्र अर्पण कारण्यात आले.कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावतीने अहमद पटेल यांनी पुष्पचक्र अर्पण केले.सोनियाजी यांनी दिलेला शोक संदेश त्यांच्या पुत्राकडे देण्यात आला.महाराष्ट्रातील व राजधा्नीतील त्यांच्या शेकडो चाहत्यांनी व जुने सहकाऱ्यांनी दूरध्वनीवरून आपल्या संवेदना व्यक्त केल्या.दुपारी 3 वाजता कॉग्रेसचे खासदार राहूल गांधी व राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा गिरीजा व्यास यांनी त्यांच्या पार्थीवाचे दर्शन एम्स हॉस्पिटलमधे जाऊन घेतले.त्यांच्या इच्छेनुसार त्यांचे पार्थिव एम्स रूग्णालयाच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
...........................
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
नवीन टिप्पण्या अनुमत नाहीत.