शनिवार, २४ सप्टेंबर, २०११

निष्ठावंत, ध्येयवादी नेतृत्व हरपले : मुख्यमंत्री



निष्ठावंत, ध्येयवादी नेतृत्व हरपले : मुख्‍यमंत्री
मुंबई, दि. 23 : काँग्रेसचे अत्यंत धोरणी व दूरदृष्टी असलेले ज्येष्ठ नेते वसंत साठे आपल्यातून निघुन गेले आहेत. त्यांच्या जाण्याने काँग्रेस पक्षातील आणि देशातील एक निष्ठावंत, ध्येयवादी नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शोकसंवेदना व्यक्त केली आहे.
      श्री. साठे यांच्या निधनामुळे काँग्रेसने अगदी जुन्या फळीतला एक महत्वाचा दुवा  गमावला, असे श्री. चव्हाण यांनी शोकसंदेशात म्हटले आहे. दिवंगत पंतप्रधान श्रीमती इंदिराजी गांधी यांचे ते अत्यंत निकटवर्ती आणि विश्वासु म्हणुन प्रसिद्ध होते. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांनी 1942च्या चलेजाव आंदोलनात उडी घेतली. उच्चविद्याविभुषित असलेल्या श्री. साठे यांनी सुरुवातीच्या काळात कामगार चळवळीत काम केले. समाजवादी पक्षात काही काळ राहिल्यावर 1964 साली त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अखेरपर्यंत ते काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले. ओघवत्या वक्तृत्वाची देणगी त्यांना लाभली होती. 1972 साली अकोल्यातून लोकसभेवर निवडून गेल्यावर त्यांच्या कर्तृत्वाला मोठी संधी मिळाली. श्रीमती इंदिराजी गांधी यांच्या अत्यंत प्रतिकुल काळातही त्यांनी त्यांची साथ सोडली नाही. 1980 साली श्रीमती इंदिराजींच्या मंत्रिमंडळात माहिती व नभोवाणी मंत्रीपदाची त्यांची कामगिरी ऐतिहासिक म्हणून नोंद झाली आहे. दूरदर्शनचे रंगीत प्रसारण सुरु करुन लघुशक्ति प्रसारण केंद्रांचे जाळेच त्यांनी देशभरात निर्माण केले. केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांनी अनेक खाती सांभाळली आणि प्रत्येकावर स्वत:चा ठसा उमटविला. सदा हसतमुख आणि आनंदी असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. राजकारणातील निवृत्तीनंतरही त्यांनी स्वत:ला लेखनात गुंतवुन ठेवले होते. त्यांच्या जाण्याने आपण सर्वांनी जुन्या पिढीतील एक दुवा गमावला आहे, असे श्री. चव्हाण यांनी म्हटले आहे.
0000000000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा