लोकशाहीचे व्यापक फायदे मिळण्यासाठी
निवडणूक आणि न्यायिक सुधारणा आवश्यक
- मुख्यमंत्री
मुंबई, दि. 23 : वैविध्याने नटलेल्या आपल्या देशात संसदीय लोकशाहीची पाळेमुळे चांगलीच रुजली आहेत. मात्र लोकशाहीचे फायदे सर्वसामान्यांना सर्वांशाने मिळण्यासाठी मोठ्या प्रमाणात निवडणूक विषयक आणि न्यायप्रक्रिया विषयक सुधारणा होण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केले.
टाइम्स ऑफ इंडिया आणि सेलो पेन इंडिया ट्रस्ट आयोजित 'टाइम्स एनआयई न्यूज मेकर्स मीट 2011-12' या कार्यक्रमात श्री.चव्हाण बोलत होते. मुंबईच्या विविध शाळा व माध्यमिक विद्यालयातील 900 मुलांच्या उपस्थितीत श्री.चव्हाण यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली. कार्यक्रमास टाइम्सच्या बाची करकरीया, उपाध्यक्ष मुकेश वालिया, ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल मारपकवार, गौरव राठोड आदी मान्यवर उपस्थित होते. मुंबईसह राज्यातील सर्व नागरिकांना उत्तम नागरी सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की तुम्ही देशाचे भवितव्य आहात. तुम्ही आणि मी एकत्र येऊन राज्याच्या तसेच देशाच्या प्रगतीसाठी काम करुया, येणारी आव्हाने स्वीकारण्यासाठी कठोर परिश्रमांची आवश्यकता असून येणाऱ्या प्रत्येक संधीचा फायदा घेतला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
अद्वैत मेहता या विद्यार्थ्याने 'लोकशाहीचे फायदे तळागाळापर्यंत आणि वेळेत पोचताना दिसत नाहीत, असे का होते?' या प्रश्नावर श्री.चव्हाण म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर आपण अत्यंत विचारपूर्वक संसदीय लोकशाही राज्यपध्दती स्वीकारली, ती बरीचशी ब्रिटीश पध्दतीवर आधारित आहे. आपला देश खंडप्राय आहे. समस्या अनेक आहेत. मात्र असे असले तरी आपल्याकडे प्रशासनाची एक व्यापक व्यवस्था आहे, ती अधिक आदर्श, जबाबदार, पारदर्शक आणि उत्तरदायी बनविण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. प्रशासन व्यवस्थेमधील त्रुटींमुळे सामान्यांना लोकशाहीचे फायदे मिळण्यात थोडा विलंब होतो. यासाठी मोठ्या प्रमाणात निवडणूकविषयक सुधारणांचा कार्यक्रम राबविला गेला पाहिजे, असे मला वाटते. तसेच, दोषी व्यक्तिला लवकरात लवकर आणि कायद्यानुसार योग्य शिक्षा होण्यासाठी न्यायप्रणालीमध्येही सुधारणांची गरज आहे. असे झाल्यास लोकशाहीचे फायदे स्पष्टपणे दिसून येतील.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकपाल विधेयकाबाबत केलेल्या उपोषणाला आणि आंदोलनाला देशभरात व्यापक प्रतिसाद मिळाला याचे कारण काय, असा प्रश्न विचारला असता श्री.चव्हाण म्हणाले, उपोषण हा खूप चांगला मार्ग आहे. महात्मा गांधी तो आत्मशुध्दीसाठी वापरीत असत श्री.हजारे यांच्या उपोषणाला प्रतिसाद मिळण्याचे कारण जनतेला व्यवस्थेबद्दलचा रोष व्यक्त करण्याची एक संधी मिळाली हेच आहे. प्रशासनामध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणणे ही गरज आता अधोरेखित झाली आहे. अलिकडे उघड झालेल्या भ्रष्टाचाराच्या काही प्रकरणांमुळे राजकीय नेत्यांची विश्वासार्हता प्रश्नचिन्हांकीत झाली, हे वास्तव आहे. मात्र ही परिस्थिती आपण सगळे मिळून नक्कीच बदलू शकतो. लोकपाल विधेयक हा या प्रक्रियेतील फक्त एक टप्पा आहे, असे मी मानतो.
अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर राजकारणात येण्याचा आपला अजिबात विचार नव्हता. कुटुंबाला मोठी राजकीय पार्श्वभूमी असूनही मी त्यापासून अलिप्त होतो. परंतु, स्व.राजीव गांधी यांच्या प्रेरणेमुळे मी राजकारणात आलो. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी, तंत्रज्ञानाबाबत व्यापक दृष्टीकोन असलेले स्व.राजीव गांधी आणि अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत काँग्रेस पक्षाला नवी उभारी देणाऱ्या पक्षाध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी, उत्तम अर्थतज्ज्ञ असलेले, शांत व सुस्वभावी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांची प्रेरणा माझ्या आजपर्यंतच्या प्रवासामागे आहे, असे श्री. चव्हाण यांनी सांगितले. महाराष्ट्र हे देशातील एक आघाडीचे राज्य असून त्याचा सर्वांगाने विकास करणे, प्रशासनात विश्वासार्हता वाढविणे, यासाठी आपण काम करणार असल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
भारताची अर्थव्यवस्था वेगाने विकसित होत आहे. मात्र निर्माण होणाऱ्या संपत्तीचे विषम वाटप हे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेसमोरील मोठे आवाहन आहे. संपत्तीचे समाज वाटप होऊन गरीब-श्रीमंतांमधील दरी कमी होत जाऊन संपणे खूप महत्त्वाचे आहे. केंद्र सरकारने आखलेल्या अनेक योजना, दिशादर्शक धोरणे यामुळे भविष्यात असे होऊ शकेल, अशी अपेक्षाही श्री. चव्हाण यांनी व्यक्त केली.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनिश गावंडे, पीया सुतारीया, अनुरोध वेणुगोपाळ, श्रीरंग जावडेकर, तेजस श्रीनिवासन, सरन मोईन सुलेमान, अलिया जब्बार या विद्यार्थ्यांना बेस्ट टाईम्स एनआयआरई हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी विविध शाळेतील मुलांनी विचारलेल्या राजकीय सामाजिक, आर्थिक, विकास विषयक आणि अन्य विषयावरील प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी समर्पक उत्तरे देऊन विद्यार्थ्यांची मने जिंकली.
श्रीमती बाची करकरीया यांनी कार्यक्रमाचा समारोप कराताना मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रेक्षागृहात मुलांमध्ये मिसळून अनौपचारीक गप्पा केल्या आणि छायाचित्रही काढून घेतली. खुद्द मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांचे चेहरे उजळून निघाले होते.
000