परदेशी उद्योगांसाठी प्राधान्याने पायाभूत सुविधा
-- मुख्यमंत्री
मुंबई, दि. 24 : राज्यातील उद्योग क्षेत्रात गुंतवणुकीच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून, परदेशी गुंतवणूकदारांना सर्व पायाभूत सुविधा प्राधान्याने उपलब्ध करुन देण्यात येतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल येथे केले.
इंडो-जर्मन चेंबर ऑफ कॉमर्सच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. जर्मनीचे भारतातील महावाणिज्य दूत डॉ. लिपोल्ड हेल्डमन, मर्क कंपनीच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष डॉ. कार्ल लुडविग, जर्मनीच्या आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहार विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वॉकर ट्रायर, बॉश लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व्ही. के. विश्वनाथन आदी यावेळी उपस्थित होते.
देशातील औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की राज्यात उच्च –तंत्रज्ञानावर आधारित उद्योगधंदे, बांधकाम, यंत्रनिर्मिती आदी उद्योगांचे स्वागत करण्यात येईल. भारत आणि जर्मन दोन देशांत सांस्कृतिक देवाण घेवाण अनेक वर्षांपासून सुरु आहे. देशातील जर्मनीच्या गुंतवणुकीचे प्रमाण इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात जास्त आहे.
डॉ. हेल्डमेन म्हणाले की, भारत आणि जर्मनी यांचे सांस्कृतिक संबंध दृढ असून इंडो-जर्मन चेंबर आँफ कॉमर्समुळे आर्थिक संबंधही वृध्दिंगत होत आहेत. जैव तंत्रज्ञानात जर्मन राष्ट्र आघाडीवर असून, जर्मनीमधील अनेक उद्योजक भारतात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत.
भारतात गुंतवणूक केलेल्या जर्मनीतील 100 कंपन्यांची माहिती असलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाला दोन्ही देशांतील कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
0 0 0 0 0