कण्हेरखेड येथे टुरिझम कॉम्प्लेक्स विकसित करणार - मुख्यमंत्री
सातारा, दि. 29 : लाभलेला ऐतिहासिक वारसा आणि स्मृती जतन करण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून टुरिझम कॉम्प्लेक्स निर्माण करुन कण्हेरखेडच्या पर्यटन विकासाला गती दिली जाईल अशी घोषणा, मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे बोलताना केली.
कोरेगांव तालुक्यातील कण्हेरखेड येथे स्व. श्रीमंत महाराज माधवरावजी शिंदे यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण, राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत कण्हेरखेड नळपाणी पुरवठा योजनेचे भूमीपूजन आणि सांस्कृतिक भवन इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले, त्याप्रसंगी आयोजित समारंभात ते बोलत होते. समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री जोतिरादित्य शिंदे हे होते तर समारंभाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री रामराजे नाईक निंबाळकर होते. समारंभास वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, महाराष्ट्र कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष आनंदराव पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष ज्योती जाधव आदी उपस्थित होते.
कण्हेरखेड गावाला शिंदे घराण्यामुळे फार मोठी परंपरा आणि ऐतिहासिक वारसा लाभला असल्याचे स्पष्ट करुन मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, कण्हेरखेडच्या शिंदे घराण्याने देशात केलेली कामगिरी तसेच मराठ्यांच्या साम्राज्य स्थापनेसाठी केलेले काम कौतुकास्पद असून त्यांच्या स्मृती जोपासण्याबरोबरच ऐतिहासिक 16 खांबी स्मृतिस्तंभ, राणोजींचा वाडा अन्य ऐतिहासिक वास्तुंचे जतन करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून पर्यटन कॉम्प्लेक्स निर्माण करण्यासाठी पर्यटन आराखडा तयार करण्यात येईल.
कण्हेरखेडसाठी 24x7 पाणीपुरवठा योजना-मुख्यमंत्री
कण्हेरखेड गावासाठी 24x7 पाणीपुरवठा योजना राबविली जाईल, यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने शासनास पाठवावा अशी सूचना करुन मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले, कण्हेरखेड गावासाठी शासनाने मंजूर केलेल्या 60 लाखाच्या नळपाणीपुरवठा योजनेची भरावी लागणारी 10 टक्के लोकवर्गणीच्या रक्कमेची जबाबदारी शिंदे घराण्याने उचलून वचनपूर्ती केली आहे. शासनाच्या वतीने कण्हेरखेड 24x7 योजना राबवून 24 तास मीटरने पाणी देण्याचा संकल्प असल्याचेही ते म्हणाले.
याप्रसंगी बोलताना केंद्रीय वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री जोतिरादित्य शिंदे म्हणाले, कण्हेरखेड गावाशी माझं जिव्हाळ्याचे नातं असून कण्हेरखेडच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उन्नतीसाठी केंद्र शासनाबरोबरच मी आणि माझे घराणेही कटीबध्द राहील.
याप्रसंगी पालकमंत्री रामराजे नाईक- निंबाळकर, वनमंत्री डॉ. पतंगराव कदम आदींनीही आपले विचार व्यक्त केले. प्रारंभी कण्हेरखेडच्या सरपंच अर्चना शिंदे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. शेवटी विजय शिंदे यांनी आभार मानले. समारंभास आमदार सर्वश्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, बाळासाहेब पाटील, प्रभाकर घार्गे, माजी खासदार लक्ष्मणराव पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष शंकरराव जगताप जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव आदी उपस्थित होते.
000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा