भारतीय संगीताला जगात तोड नाही
- मुख्यमंत्री
मुंबई, दि. 28 : भारतीय संगीताला जगात तोड नाही म्हणूनच पाश्चात्य संगीताचे अनुकरण न करता भारतीय संगीत जोपासण्याची आणि त्याला प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केले.
ज्येष्ठ गायक, गीतकार संगीतकार यशवंत देव यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते आज रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे प्रदान करण्यात आला. राज्य शासनाच्या सांस्कृतिक संचालनालयाने आयोजित करण्यात या पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री संजय देवतळे, जलसंपदा मंत्री सुनील तटकरे, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, राज्यमंत्री फौजिया खान, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव आनंद कुलकर्णी, सांस्कृतिक कार्य संचालक आशुतोष घोरपडे, खासदार एकनाथ गायकवाड, आमदार नितीन सरदेसाई आणि संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या संगीत क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचा असलेला गानसम्राज्ञानी लता मंगेशकर पुरस्कार पंडित यशवंत देव यांना मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करुन मुख्यमंत्री म्हणाले की, देव यांनी आपल्या वडिलांकडून मिळालेल्या संगीत साधनेचा वारसा समर्थपणे पुढे नेला आणि एक उत्तम संगीतकार, सुरेल गायक आणि शब्दांची जाण असलेला कवी अशी आपली ओळख निर्माण केली. त्यांनी आपल्या वैशिष्टयपूर्ण गायनाने आणि संगीताने भारतीय संगीत सृष्टीत स्वत:चे आगळे-वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांचा चाहता वर्ग केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर सबंध भारतात विखुरलेला आहे असे सांगून ते पुढे म्हणाले की, कलावंत हा समाजाचा अत्यंत महत्वाचा घटक असून राज्याची खरी संपत्ती असते. त्यांचा मानसन्मान तसेच आदर राखण्यासाठी त्यांना सर्वप्रकारच्या सोयी व सुविधा प्रदान करण्यासाठी शासनाने नेहमीच पुढाकार घेतला आहे. संगीत क्षेत्रात नवनवीन प्रयोग होत राहावेत आणि रसिकांना सुमधूर गाणी ऐकायला मिळावीत, अशा शुभेच्छा मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांनी श्री. देव यांच्या संगीत क्षेत्रातील पुढील वाटचालीस दिल्या.
संगीत क्षेत्रात दीर्घकाळ सेवा करणाऱ्या यशवंत देव यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करुन उपमुख्यमंत्री म्हणाले की, चिरंतन संगीताचा वारसा देव यांनी जपला आहे. माणूस आपल्या कर्तव्याशी किती समरस असतो हे गायक व गीतकार या विविध भूमिका पार पाडणाऱ्या यशवंत देव यांच्यावरुन दिसून येते. अर्थपूर्ण शब्दांना सुरेल संगीताची साथ असेल तर ते गाणे अवीट होतो. त्यांची गाणी ऐकत असंख्य पिढ्या तृप्त झाल्या आणि त्यांची स्वरबद्ध गाणी अजूनही रसिकांच्या ओठांवर रेंगाळत आहे. संगीत हे चित्तवृत्ती पल्लवीत करण्यासाठी असते. धका-धकीच्या जीवनात संगीताचा आनंद घेण्यासाठी रसिक आजूनही आसूसलेले आहेत. देव यांची गाणी यशवंत होऊन मराठी माणसाच्या मनात सदैव गूंजत राहोत, अशा शुभेच्छा श्री. पवार यांनी यावेळी दिल्या.
सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे म्हणाले की, गीत, संगीत व गायन या तिन्ही क्षेत्रात श्री. देव यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. त्यांचे संगीत हे हृदयाला भिडणारे असून रसिकांना मंत्रमुग्ध करणारे आहे.
यावेळी यशवंत देव यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा