मिहान प्रकल्पाच्या कामास वेग येण्यासाठी दुसऱ्या धावपट्टीची गरज - मुख्यमंत्री
नागपूर, दि. 16 : नागपुरातील महत्वाकांक्षी आंतरराष्ट्रीय प्रवाशी व माल वाहतूक हब विमानतळाची दुसरी धावपट्टी होण्याची आवश्यकता आहे. त्याशिवाय मिहान प्रकल्पास वेग येणार नाही. यासाठी लोकप्रतिनिधी व प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज रामगिरी येथे आयोजित मिहान प्रकल्पग्रस्तांच्या मदतीसंदर्भात आयोजित बैठकीत केले.
या बैठकीस पालकमंत्री शिवाजीराव मोघे, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री मुकुल वासनिक, रोहयो मंत्री डॉ. नितीन राऊत, पर्यावरण व सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे, वित्त राज्यमंत्री राजेंद्र मुळक, खासदार विलास मुत्तेमवार, खासदार विजय दर्डा, खासदार अविनाश पांडे, खासदार दत्ता मेघे, आमदार दिनानाथ पडोळे, आमदार एस.क्यू. जमा,आमदार वामन कासावार, माजी मंत्री अनिस अहमद, मिहानचे उपाध्यक्ष यु.पी.एस.मदान, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव जंत्रे, विभागीय आयुक्त तथा मिहानचे सहव्यवस्थापकीय संचालक प्रविण दराडे, जिल्हाधिकारी सौरभ राव तसेच शिवनगाव येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी उपस्थित होते.
मिहान प्रकल्पातील विशेष आर्थिक क्षेत्रात इन्फोसिस, मारुती सुझुकी, हुंडई हे उद्योग येण्यासाठी त्यांच्या प्रमुखांशी चर्चा करण्यात येईल. विदर्भाचा विकास होण्यासाठी मिहान प्रकल्प महत्वाचा असून या प्रकल्पात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील असेही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी खासदार विलास मुत्तेमवार, खासदार विजय दर्डा, आमदार एस.क्यू. जमा, शिवनगाव प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी बाबा डवरे यांनी काही विधायक सूचना केल्या.
*****
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा