विमा योजनेतंर्गत चालणारी रुग्णालये केंद्राला हस्तांतरीत करण्यास गती
मुख्यमंत्र्यानी घेतली केंद्रीय कामगार मंत्र्याची भेट
नवीदिल्ली 9 सप्टेंबर 2011 :- केंद्र व राज्यशासनाच्या सहयोगाने राज्य कर्मचारी विमा योजनेअंतर्गत चालविली जाणारी महाराष्ट्रातील रुग्णालये केंद्र शासनाकडे पूर्णपणे हस्तांतरीत करण्याच्या राज्यमंत्रिमंडळाच्या निर्णयास पुन्हा एकदा गती निर्माण झाली आहे. शुक्रवारी राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व आरोग्यमंत्री सुरेश शेटटी यांनी केंद्रीय कामगारमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांची श्रमशक्ती भवनात भेट घेवून या प्रश्नाचा पाठपुरावा केला.
राज्य कर्मचारी विमा योजनेअंतर्गत चालविली जाणारी महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व चौदाही रुग्णालये केंद्र शासनाकडे हस्तांतरीत केली जावीत, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला होता. त्यासाठी राज्य व केंद्र शासनामध्ये सामंजस्य करार (MOU) होणे गरजेचे आहे. या संदर्भात मुख्यमंत्री यांनी खरगे तसेच केंद्रीय कामगार व आरोग्य खात्याच्या वरिष्ठ अधिका-यांसमवेत शुक्रवारी अर्धा तास चर्चा केली. हा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने राज्य व केंद्राचे संबंधित वरिष्ठ अधिका-यांनी पुढील आठवडयामध्ये मुंबईमध्ये बैठक घेऊन सर्वमान्य तोडगा सूचवावा, असे निर्देश खरगे यांनी दिले.या बैठकीमध्ये राज्यशासनातर्फे राज्याचे सार्वजनिक आरोग्य खात्याचे सचिव तथा अतिरिक्त मुख्यसचिव जयंत बांठीया, कामगार विभागाच्या प्रधान सचिव कविता गुप्ता तसेच बिपीन मलिक, निवासी आयुक्त, महाराष्ट्र सदन यांनी भाग घेतला.
याच बैठकीमध्ये राज्याची राजीव गांधी जीवनदायी योजना आणि केंद्रशासनाची राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना या दोहोतील पुनरावृत्ती टाळून त्यामध्ये सांगड कशी घालता येईल यावरही विचार करण्यात आला. याबाबतही केंद्र व राज्यशासनाच्या अधिका-यांनी एकत्र बसून सर्वमान्य तोडगा सूचवावा असे निर्देश केंद्रीय मंत्र्यानी दिले.
**************
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा