मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांचे कार्य
नव्या पिढीला प्रेरणादायी - मुख्यमंत्री
औरंगाबाद,दि. 17 --- मराठवाडा मुक्ती लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे कार्य नव्या पिढीला प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केले.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त येथील महापालिकेच्या सिद्धार्थ उद्यानातील हुतात्मा स्मृतीस्तंभाजवळ ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी दोन मिनीटे स्तब्धता पाळून आदरांजली वाहण्यात आली. तसेच पोलीस दलाच्या वतीने तीन वेळा हवेत बंदुकीच्या फैरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या कार्यक्रमाला उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी -पदाधिकारी आदिंची भेट घेऊन मराठवाडा मुक्ती दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पालकमंत्री बाळासाहेब थोरात आणि राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, भारतीय लढ्यातील मराठवाडा मुक्तीलढा हा महत्त्वपूर्ण आ णि खडतर होता. मराठवाड्यातील जनतेने हा लढा बुलंद केला. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखालील या लढ्यात गोविंदभाई श्रॉफ, आशाताई वाघमारे, दिगंबरराव ?बिंदू, आ.कृ वाघमारे यांच्यासारख्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचा उल्लेख करुन या लढ्यात प्राणांची आहुती दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
मुख्यमंत्री म्हणाले की, भारत देश स्वतंत्र झाला तरी मराठवाडा हा निजामाच्या राजवटीखाली होता. निजामाच्या जुलमी सत्तेला हटविण्यासाठी मराठवाड्यातील जनतेने तीव्र लढा उभारला, प्राणांची आहुती दिली. या लढ्यात महिलांचेही मोठे योगदान होते.
यावेळी पालकमंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, खासदार चंद्रकांत खैरे, महापौर अनिता घोडेले, जि.प. अध्यक्षा लताताई पगारे, आ. प्रदीप जैस्वाल, आ. अब्दुल सत्तार, आ. कल्याण काळे, आ. संजय शिरसाठ, आ. संजय वाघचौरे, आ. किशनचंद तनवाणी, आ. एम.एम. शेख, माजी आमदार केशवराव औताडे, विभागीय आयुक्त भास्कर मुंढे, पोलीस आयुक्त संजयकुमार, जिल्हाधिकारी कुणाल कुमार, महापालिका आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर आदिंनीही हुतात्मा स्मृतीस्तंभास पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. या कार्यक्रमाला माजी मंत्री ड. प्रीतमकुमार शेगांवकर, स्वातंत्र्यसैनिक, नागरिक, विविध लोकप्रतिनिधी, अधिकारी-पदाधिकारी, निमंत्रित आदिंची उपस्थिती होती.
------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा