मंगळवार, २७ सप्टेंबर, २०११

पाकिस्तानचे वाणिज्य मंत्री मखदुम मुहम्मद अमीन फईम यांची भेट



महाराष्ट्र आणि पाकिस्तानमध्ये व्यापारी संबंध
सुधारण्यास पुष्कळ वाव - मुख्यमंत्री
         मुंबई, दि.27 : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुरळीत होण्यासाठी दोन्ही देशात पूर्ण क्षमतेने व्यापार सुरु होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्र आणि  पाकिस्तानदरम्यान व्यापारी संबंध वाढविण्यासाठी खुप वाव आहे. विशेषत: वस्त्रप्रावरणे, कापूस, साखर याची महाराष्ट्रातून पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात निर्यात होऊ शकतो, असे प्रतिपादन  मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे सांगितले.
          पाकिस्तानचे वाणिज्य मंत्री मखदुम मुहम्मद अमीन फईम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने फिक्कीच्या सदस्यांसमवेत मुख्यमंत्र्यांची आज भेट घेतली, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड, वित्त विभागाचे प्रधान सचिव सुधीर श्रीवास्तव, कृषी विभागाचे प्रधान सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अजितकुमार जैन, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी सुमित मलिक, उद्योग विभागाचे सचिव के. क्षत्रपति, फिक्कीचे अध्यक्ष हर्ष मरिवाला, फिक्कीच्या उपसचिव अंबिका शर्मा, संचालक वैजयंती पंडित आदी मान्यवर उपस्थित होते.
          मुंबई आणि कराची दरम्यान सद्या जो व्यापार सुरु आहे, तो प्रत्यक्ष क्षमतेपेक्षा खुपच कमी आहे. तो पूर्ण क्षमतेने सुरु झाल्यास त्याचा दोन्ही देशांच्या आर्थिक  विकासासाठी फायदा होईल, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, मात्र यासाठी उभय बाजुंनी ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे. पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग दोन्ही देशातील संबंध सुधारण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र यासाठी उभय बाजुंनी सकारात्मक भूमिका घेण्याची गरज आहे. महाराष्ट्र राज्य देशातील दुसरे मोठे औद्योगिक राज्य असून राज्यात  व्यापार, कृषी उत्पन्न, माहिती तंत्रज्ञान आदी क्षेत्रात विपुल संधी आहेत. राज्यात बीटी कापूस आणि भात उत्पादनात क्रांती झाली आहे. अलिकडच्या काही वर्षात साखरेचे उत्पन्न अतिरिक्त झाले आहे. पाकिस्तान महाराष्ट्रातुन मोठ्या प्रमाणात साखर आयात करु शकेल.
          मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, मुंबईत फिल्म उद्योगाची मोठ्या प्रमाणात गुंतवणूक असून पाकिस्तानचे भारतीय चित्रपट क्षेत्राशी संबंधही सुरळीत झाले पाहिजेत. दोन्ही देशातील चेंबर ऑफ कॉमर्सने एकत्रित येऊन काम करण्याची गरज आहे.
          श्री. फईम म्हणाले की, दोन्ही देशात संवाद निर्माण होऊन परस्परातील गैरसमज दूर होऊन त्यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित व्हावे यासाठी पाकिस्तानी शिष्टमंडळ भारतातील काही प्रमुख शहरांना भेटी देत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित होऊन परस्परात व्यापार सुरु झाल्यास त्याचा विकासाला फार मोठा फायदा होईल. मात्र ही प्रक्रिया अधिक जोमाने सुरु होणे आवश्यक आहे.
          पाकिस्तान शिष्टमंडळात वाणिज्य सचिव जफर महमूद, पाकिस्तानी उच्चायुक्त सईद मलीक, पाकिस्तानी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष हाजी गुलाम अली, माजी अध्यक्ष तारिक सईद, तसेच पाकिस्तानी उद्योग क्षेत्रातील मान्यवर यांचा समावेश होता. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा