राज्याच्या पोलीस महासंचालकपदी
के. सुब्रमण्यम् यांची नियुक्ती
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी संजीव दयाळ ;
पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालकपदी प्रवीण दीक्षित
मुंबई, दि. 28 : राज्याच्या पोलीस महासंचालकपदी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक के. सुब्रमण्यम् यांची तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी संजीव दयाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. दयाळ यांच्या रिक्त झालेल्या जागेवर प्रधान सचिव प्रवीण दीक्षित यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलीस महासंचालक अजित पारसनीस हे 30 सप्टेंबर 2011 रोजी सेवानिवृत्त होत असून त्यांच्या जागेवर नवे पोलीस महासंचालक म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक के.सुब्रमण्यम् यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी रिक्त होणा-या पदावर पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव दयाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. दयाळ यांच्या रिक्त होणा-या जागी गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) प्रवीण दीक्षित यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे.
श्री. सुब्रमण्यम् हे 1976 च्या भारतीय पोलीस सेवेच्या तुकडीतील अधिकारी असून आतापर्यंत त्यांनी विविध पदांवर महत्त्वाच्या जबाबदा-या सांभाळल्या आहेत. नांदेड येथे प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी म्हणून सेवेचा प्रारंभ केलेल्या श्री. सुब्रमण्यम् यांनी इस्लामपूर, कामठी (नागपूर) येथे पोलीस उपविभागीय अधिकारी, पुण्याचे पोलीस उपायुक्त, चंद्रपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस महासंचालक कार्यालयात पोलीस उपमहानिरीक्षक, मुंबईचे दक्षिण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त, लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि महासंचालक पदांवर काम केले आहे. दरम्यानच्या काळात सीबीआयमध्ये पोलीस अधिक्षक, पोलीस उपमहानिरीक्षक आणि गृह विभागात प्रधान सचिव म्हणूनही प्रतिनियुक्तीवर श्री. सुब्रमण्यम यांनी काम पाहिले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकपदी संजीव दयाळ
संजीव दयाळ हे भारतीय पोलीस सेवेतील 1977च्या तुकडीचे अधिकारी असून त्यांनी आतापर्यंत पोलीस उपायुक्त, सह पोलीस आयुक्त, मुंबईचे पोलीस आयुक्त तसेच प्रतिनियुक्तीवर दिल्ली येथेही विविध पदांवर काम पाहिले आहे.
0000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा