मंगळवार, ६ सप्टेंबर, २०११

सामंजस्य करार : दि. 6 सप्टेंबर 2011



'' राजीव गांधी जीवनदायी ''ची अंमलबजावणी
प्रभावीपणे करुन देशात ओळख निर्माण करावी
                                     -मुख्यमंत्री
मुंबई, दि. 6: राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करुन आरोग्य विभाग आणि नॅशनल इन्शुरन्स कंपनी यांनी देशात या योजनेची ओळख निर्माण करावी, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे केले.
राज्यातील 2 कोटी नागरिकांना विविध आजारांवर मोफत उपचार करता येणारी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना राज्यात लवकरच सुरु करण्यात येणार आहे. या योजनेतील पहिला टप्पा म्हणून आज महाराष्ट्र शासन आणि नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. यांच्या मध्ये सह्याद्री अतिथीगृह येथे सामजंस्य करार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्यावेळी श्री. चव्हाण बोलत होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना ही लोकांना उत्तम आरोग्य सेवा मोफत देणारी क्रांतीकारी योजना असून ती यशस्वी करण्यासाठी शासकीय यंत्रणा आणि नॅशनल इन्शुरन्स कंपनी यांनी समन्वयाने काम करावे. या योजनेची सर्व सामान्य जनतेला माहिती होण्यासाठी प्रयत्न करावेत. रुग्णालयांनीही शिबिरे आयोजन करुन लोकांचा सहभाग घ्यावा. सुरुवातीला मुंबई शहर, मुंबई उपनगर, नांदेड, धुळे, रायगड, गडचिरोली, सोलापूर व अमरावती या आठ जिल्हयात राबविण्यात येणारी ही योजना लवकरच राज्यभर राबविण्यात येणार आहे. ही योजना राबविण्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय कामे त्वरेने पूर्ण करावी अशा सूचनाही श्री. चव्हाण यांनी यावेळी दिल्या.
महाराष्ट्र शासनाच्यावतीने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. के. वेकंटेशन यांनी तर कंपनीच्या वतीने उपमहाव्यवस्थापक डी.आर. सुबोध यांनी  करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या प्रसंगी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी, आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया, सचिव भूषण गगराणी, नॅशनल इन्शुरन्स कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक एन.एस.आर. चंद्रप्रसाद, जनरल मॅनेजर एस. युगंधर राव, सुबीर भट्टाचार्य उपस्थित होते.
हृदय रोग, मूत्रपिंड, प्रत्यारोपण, मेंदू व मज्जासंस्था विकार या आजारावरील शस्त्रक्रिया आणि कर्करोग या आजारावरील उपचार व शस्त्रक्रियांसाठी जीवनदायी आरोग्य योजना सूरु आहे. या योजनेतील मर्यादित आजार व उत्पन्न मर्यादेमूळे योजनेचा लाभ मर्यादित लाभार्थ्यांना मिळत असल्यामूळे विमा कंपनीच्या सहभागाने विविध आजार आणि अधिक लोकांना आरोग्य सेवा देणारी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सूरु करण्यात येत आहे. यामध्ये  लाभधारक कुटुंबाचा विम्याचा हप्ता शासनामार्फत भरण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ ज्याचे वार्षिक उत्पन्न 1 लाख व 1 लाखापेक्षा कमी आहे अशा व्यक्तींना व त्याच्या कुटुंबाला  या योजनेचा लाभ होणार आहे. या योजनेत एकूण 972 मेडिकल प्रोसिजरचा समावेश आहे. प्रत्येक कुटुंबाला प्रतिवर्ष 1 लाख 50 हजार इतक्या खर्च मर्यादेत उपचार करण्यात येणार आहेत. या योजनेत लाभ धारकाला त्यांच्या इच्छेनुसार रुग्णालय निवडण्याची मुभा राहणार आहे. लाभधारकाला आरोग्य कार्ड देण्यात येणार आहे. सर्व काम संगणकीकृत पद्धतीने होणार आहे.
0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा