सोमवार, ५ सप्टेंबर, २०११

शिक्षक दिन सोहळा, 5 सप्टेंबर 2011, औरंगाबाद



देशाला आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी
कुशल मनुष्यबळ निर्माण करावे - मुख्यमंत्री
        गुणात्मक दर्जेदार शिक्षणाव्दारे देशाला आर्थिक महासत्ता बनविण्यासाठी उच्च शिक्षित, चांगले मनुष्यबळ तयार  करण्याचे हे आव्हान शिक्षकानी  स्वीकारावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी औरंगाबाद येथे  5 सप्टेंबर 2011 रोजी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात उच्च तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कार 2010-2011  प्रदान कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उच्च तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे, महसूल खार जमीन तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री डी.पी. सावंत, राज्यमंत्री फौजिया खान, महापौर अनिता घोडेले उपस्थित होत्या.          
श्री. चव्हाण म्हणाले की, शिक्षक हे पिढी घडवितात, समाजाला दिशा देतात. राज्यात  साक्षरतेचे प्रमाण आज 90 टक्क्याहून अधिक आहे. शिक्षणाचे सार्वत्रिकरण मोठ्या प्रमाणावर होत आहे. शिक्षण क्षेत्रात संख्यात्मक बदल मोठ्या प्रमाणावर होत असतांनाच गुणवत्ता वाढविण्याचे आव्हान सर्वांसमोर आहे. राज्यातील शैक्षणिक क्षेत्राचा संख्यात्मक गुणात्मक आलेख उंचावत असून  शिक्षण क्षेत्रात राज्य प्रथम क्रमांकावर नेण्यासाठी शासन कटिबध्द असल्याचेही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात  आजच्या बदलत्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ज्ञान ही महत्वपूर्ण बाब आहे. तंत्रज्ञानात सातत्याने बदल होत आहे. 3-जी तंत्रज्ञान आले आहे. लवकरच 4-जी तंत्रज्ञानही येईल. मोबाईल स्वरुपही बदलेल. 2010 ते 2020 हे दशक नाविन्यपूर्ण कल्पनांचे (इन्होवेशन डिकेड) दशक आहे. त्यादृष्टीने नाविन्यपूर्ण कल्पनांचा शोध सातत्याने घ्यावा लागेल.
शैक्षणिक क्षेत्रासाठी पायाभूत सुविधा सकारात्मक वातावरणासाठी शासन कटिबध्द आहे. संशोधन क्षेत्रात अधिक प्रगती करण्याची गरज आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या स्तरापर्यंत नेण्याचे आव्हान आहे. आज  आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेला आपण सामोरे जात आहोत. देशातील मनुष्यबळाच्या बौद्धिक कौशल्यांच्या  विकासाव्दारेच  देश आर्थिक महासत्ता बनणे  आहे. विज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांची अभिरुची वाढविण्यासाठी त्यांना इन्स्पायर ऍ़वार्ड यासारख्या शिष्यवृत्ती योजनांव्दारे शासन भरीव मदत करीत आहे. देश ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्थेच्या जोरावरच महासत्ता होऊ शकेल.
यावेळी बोलतांना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण  यांनी औरंगाबाद येथे नॅशनल लॉ स्कूल होईल अशी घोषणा केली तसेच केंद्र शासनाची अलिगढ विद्यापीठाच्या शाखेसाठी औरंगाबाद येथे त्यांची टीम बोलावून घेऊन उपलब्ध जागेची पाहणी केली जाईल, त्यांना जागा पसंत पडल्यास याबाबतही निर्णय घेतला जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
             उच्च तंत्रशिक्षण मंत्री  राजेश टोपे म्हणाले की, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणाराच आदर्श शिक्षक होतो. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रेरित करण्याच्या भूमिकेवर भर द्यावा. भौतिक साधनसंपदेपेक्षाही  बौध्दिक संपदा महत्वपूर्ण आहे. आज शिक्षणाचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला असून गुणवत्ता वाढविण्याचे टिकविण्याचे आव्हान सर्वांसमोर आहे. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात रोजगारक्षम शिक्षणाची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असून त्यासाठी आजच्या काळाशी सुसंगत असे अभ्यासक्रम असणे महत्वपूर्ण आहे. हे अभ्यासक्रम जागतिक दर्जाचे विद्यार्थी केंद्रीत असणेही गरजेचे आहे. यावेळी औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, तरुण विद्यार्थ्यांना घडविण्याचे अत्यंत महत्वपूर्ण आव्हानात्मक कार्य शिक्षक करीत असतात. विद्यापीठ महाविद्यालयांमधून अष्टपैलू संशोधन क्षेत्रात  अधिकाधिक रस घेणारे  विद्यार्थी  घडविणे गरजेचे आहे. राज्यातील उच्च शिक्षण दर्जेदार असल्याचे प्रतिपादनही महसूलमंत्री थोरात यांनी केले.
            उच्च तंत्रशिक्षण  राज्यमंत्री डी.पी. सावंत म्हणाले की, विद्यार्थ्यांमधील   जिज्ञासु वृत्ती शिक्षकांनी वाढीस लावणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाढीस लावण्याचे कार्यही शिक्षकांनी करावे. बदलत्या काळानुसार शिक्षकांची भूमिका महत्वपूर्ण असून पिढी सक्षम बनविण्याचे कार्य शिक्षक करीत असतात.
यावेळी आमदार प्रितमकुमार शेगावकर, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार एम.एम. शेख, आमदार कल्याण काळे, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार संजय वाघचौरे, विभागीय आयुक्त भास्कर मुंढे, महानगरपालिका आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विजय पांढरीपांडे,  उच्च तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव संजयकुमार, डॉ. सुभाष महाजन, डॉ. पी.आर. गायकवाड, एस.जी. देवडकर  उपस्थित होते.
            पुरस्कारप्राप्त शिक्षक :- डॉ. उषा मुकुंदन,  डॉ. भारत भूषण शर्मा, डॉ. लॉरेन्स देवदास, डॉ. किशोर पवार, डॉ. कला आचार्य, डॉ. जोसेफ बेनजामिन, डॉ. प्रदीप जोशी, डॉ. विजयकुमार उबाळे, डॉ. मधुकर देशमुख, डॉ.  कारंडे, डॉ. सुरेशचंदे मेहेरोत्रा, डॉ. रामदेवराव कल्याणकर, डॉ. महाजन, डॉ. फुलसिंग रघुवंशी, डॉ. रुबिनालाल, माधुरी जोशी,  डॉ. कमलेंदरसिंग, डॉ. प्रकाश खोडके, विलास हरलापूर, डॉ. गजानन सराटे, मोहन हमपाली, अरविंदकुमार बंदवार, प्रमोद तारळकर, धनाजी भोंग, निवृत्ती राणे, श्री. डुम्पलवार, प्रकाश ओईबे, अनिल कदम, अनुपमा चव्हाण, मनोहर पायगुडे, सुरेश बारी, पांडुरंग कोले, प्रमोद भंडारे, मुक्तेश्वर सारवे, प्रो. ए.एस. दारोकर आणि ए.बी. देशमुख.
                                                                        -------------


३ टिप्पण्या:

  1. आपण नमूद केल्‍याप्रमाणे
    मंत्रिमंडळ निर्णय
    दि. 11-11-2010 ते 26-8-2011 या कालावधीतील मंत्रिमंडळ बैठकांचे निर्णय दि. 5 सप्टेंबरच्या पोस्टवर एकत्रित उपलब्ध आहेत.
    दि. 5/9/2011 च्‍या पोस्‍टवर एकत्रित मंत्रिमंडळ निर्णय आढळून येत नाहीत.

    उत्तर द्याहटवा
  2. श्री. गिरीश, 5 सप्टेंबरला 3 पोस्टस आहेत. पहिली...शिक्षक दिन सोहळा, औरंगाबाद (देशाला आर्थिक महासत्ता....), दुसरीही शिक्षक दिनाची....(मानधनवाढीचा निर्णय) अशी आहे. तिसरी पोस्ट एकत्रित मंत्रिमंडळ निर्णयांची आहे. जर आपल्या संगणकावर दिसली नाही तर शेवटच्या पोस्टवर ...टिप्पणी (ण्या)...यावर क्लिक करा, नंतर सर्वात खाली ...जरा जुनी पोस्ट...वर क्लिक करा. यु कॅन सी ईट.

    उत्तर द्याहटवा