सोमवार, ५ सप्टेंबर, २०११

शिक्षक दिन सोहळा, 5 सप्टेंबर 2011, औरंगाबाद



शिक्षणसेवकांच्या मानधन वाढीचा निर्णय आठवड्याभरात
राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळ्यात मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

शिक्षण क्षेत्रात शिक्षण सेवकांचे योगदान मोठे असून त्यांच्या मानधनात वाढ करण्यासाठी  सातत्याने मागणी होत असून त्याबाबत आठवड्याभरात सकारात्मक निर्णय  घेऊ, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज 5 सप्टेंबर रोजी शिक्षकदिनी औरंगाबाद येथे केले.
राज्याच्या शालेय शिक्षण क्रीडा विभागाच्यावतीने देण्यात येणारे राज्य आदर्श शिक्षक सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार मुख्यमंत्री  पृथ्वीराज चव्हाण यांचे हस्ते जगद्गुरु संत तुकाराम महाराज नाट्यमंदिर, सिडको येथे प्रदान करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. सोहळ्यास राज्याचे महसूल मंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा, उच्च तंत्र  शिक्षणमंत्री राजेश टोपे, शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान, शिक्षक-आमदार विक्रम काळे, महापौर अनिता घोडेले, जिल्हा परिषद अध्यक्षा लता पगारे, शिक्षण विभागाचे प्रधान सचिव सुमीत मलिक आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी 96 शिक्षक-शिक्षिकांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार तर आठ शिक्षिकांना सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा दहा हजार रुपयांचा धनादेश आणि मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच सहावा वेतन आयोग लागू झाल्यापासून बंद    झालेली आदर्श पुरस्कारप्राप्त शिक्षकांना दोन आगावू वेतनवाढी देण्याची मागणीही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मान्य केली.
यावेळी  बोलताना मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले की, आपला देश ज्ञानधिष्ठित अर्थव्यवस्थेच्या जोरावरच महाशक्ती होईल. नैसर्गिक साधनसंपत्तीला असणाऱ्या मर्यादा लक्षात घेता बौद्धिक विकासाचा मार्ग आर्थिक प्रगतीसाठी गरजेचा ठरला आहे. समाजाचा बौद्धिक विकास घडविण्याची जबाबदारी शिक्षकांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. शिक्षकांशिवाय  शैक्षणिक सुधारणा होऊ शकत नाही.
भविष्यात भारताला चीनशी स्पर्धा करावयाला लागणार असून शिक्षण क्षेत्रातही चीन भारतापेक्षा खूप पुढे  गेला आहे. पंतप्रधान मनमोहनसिंग  यांना शिक्षणाबाबत खूप जिव्हाळा आहे. आपल्याकडे सध्या फक्त 12 टक्के विद्यार्थी उच्च शिक्षणापर्यंत पोहचू शकतात. जगातल्या दोनशे उत्कृष्ठ विश्वविद्यालयांपैकी एकही भारतात नाही असे सांगून मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले की, ही परिस्थिती बदलण्यासाठी शासन मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करीत आहे. उत्कृष्ठ शास्त्रज्ञ घडवायचे आहेत,  त्यासाठी सर्व  प्रकारच्या सुविधा देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. इन्स्पायर अवॉॅर्ड सारखे उपक्रम राबवले जात आहेत. चौदा वर्षापर्यंत शिक्षण मिळणे हा प्रत्येक बालकाचा अधिकार आहे.  त्यासाठी सर्व  शिक्षण अभियान राबविण्यात येत आहे.  यातूनच शिक्षणाचे सार्वत्रिकरण होईल.
मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले की, इतर क्षेत्रांच्या मागण्या असतानाही राज्याच्या विकास खर्चामधील मोठा वाटा आपण शिक्षणावर खर्च करत आहोत. सर्वांपर्यंत शिक्षण पोहोचवतानाही शिक्षणाची गुणवत्ता कशी वाढवता येईल यासाठी राज्यकर्त्यांची शासनाची जबाबदारी मोठी आहे. अध्यापक  शिक्षकांचे प्रशिक्षण, शैक्षणिक संशोधन, तंत्रज्ञानाचा वापर  असे प्रयत्न करण्यात येत आहेत.
यावेळी मुख्यमंत्री चव्हाण यांनी शिक्षण सेवक हे पदनाम बदलण्याचा शासन विचार करीत असून यासाठी गुरुजनांचा आदर राखला जाईल, असे पदनाम सुचविण्याचेही  आवाहन केले.
यापूर्वी बोलताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शिक्षकांना देण्यात येणारे पुरस्कार हे सर्वच शिक्षकांचा प्रातिनिधीक गौरव आहे असे  सांगितले  तर शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांनी  शिक्षण  क्षेत्रासाठी राज्य शासनाने राबविलेल्या विविध उपक्रमांची  माहिती दिली. तसेच  कायम विना अनुदानित मधील  "कायम"  हा शब्द वगळण्यात आल्यानंतरही  शाळांच्या मूल्यांकनाची कार्यवाही झाली नव्हती, ती लवकरच करण्यात येईल, असे सांगितले.
पुरस्कार प्रदान सोहळयासाठी राज्यभरातून शिक्षक शिक्षिका उपस्थित होते. पुरस्कारासाठी प्रत्येक जिल्ह्यातून दहा हजार प्राथमिक  शिक्षकांमधून एक पाच हजार माध्यमिक शिक्षकांमधून एक अशी निवड करण्यात आली. तसेच राज्याच्या आठही शैक्षणिक विभागातून एक याप्रमाणे आठ शिक्षिकांची सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. पुरस्कारप्राप्त एकशे चार शिक्षकांमध्ये प्राथमिकचे सदोतीस, माध्यमिकचे अडोतीस, आदिवासी विभागातील अठरा, विशेष शिक्षक दोन, अपंग शिक्षक एक तर सावित्रीबाई फुले पुरस्कारासाठी आठ जणांची निवड करण्यात आली होती.
कार्यक्रमास आमदार सर्वश्री संजय शिरसाट, संजय वाघचौरे, सतीश चव्हाण, कल्याण काळे, प्रदीप जैस्वाल, एम.एम. शेख, माजी आमदार धोंडीराम  राठोड, विभागीय आयुक्त भास्कर मुंढे, महापालिका आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, शिक्षण संचालक गंगाधर म्हमाणे तसेच  पुरस्कार सोहळ्यासाठी राज्यभरातून आलेले पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे  असंख्य कुटुंबिय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
------------------

           
           

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा