महाराष्ट्र शासनाकडून सिक्कीम राज्याला
भूकंपग्रस्तांसाठी 10 कोटी रुपयांची मदत
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची घोषणा
मुंबई, दि. 22 : सिक्कीममधील भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र शासनाकडून 10 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री निधीतून ही मदत दिल्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केली.
सिक्कीममध्ये दि. 18 सप्टेंबर रोजी झालेल्या भूकंपामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्त हानी झाली आहे. ही घटना अत्यंत दु:खद असून या दुदैवी घटनेप्रती मुख्यमंत्र्यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. या आपत्तीमधून सिक्कीमची जनता लवकरच सावरेल. ज्या ज्या वेळी देशात कोठेही मानवनिर्मित किंवा नैसर्गिक आपत्ती येते, अशावेळी धावुन जाण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र शासन सिककीमच्या जनतेच्या पाठीशी खंबीरपणे पाठीशी राहील, असे मुख्यमंत्री चव्हाण यांनी म्हटले आहे.
00000
पतौडी यांच्या निधनाने क्रिकेटचा बादशहा गेला - मुख्यमंत्री
मुंबई, दि.22 : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार मन्सूर अली खान पतौडी यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘क्रिकेटचा बादशहा गेला’ अशा शब्दात तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.
मुख्यमंत्री आपल्या शोक संदेशात म्हणतात, ‘पतौडी यांनी 40 क्रिकेट कसोटी सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले होते, तर एकूण 46 कसोटी सामन्यात ते खेळले होते. ते एक आघाडीचे फलंदाज होते. प्रेक्षकांच्या मागणीला दाद देऊन ते खेळत असत. या त्यांच्या वैशिष्ट्यामुळे क्रिकेटप्रेमींमध्ये ते अत्यंत लोकप्रिय होते. त्यांना अर्जुन पुरस्काराने, तसेच पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांच्या निधनाने क्रिकेटचा बादशहा गेला आहे. क्रिकेटमधुन निवृत्त झाल्यावर त्यांनी स्वत:ला सामाजिक कार्यात गुंतवुन घेतले होते. अनेक सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून त्यांनी समाजोपयोगी कार्य केले’
--00--
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
नवीन टिप्पण्या अनुमत नाहीत.