कॉ.माधवराव गायकवाड यांनी न्यायिक मार्गाने
प्रदीर्घ लढा देऊन खंडकऱ्यांचे प्रश्न सोडविले
-मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
श्रीरामपूर दि.30- कॉ.माधवराव गायकवाड यांनी महाराष्ट्रातील खंडकरी,शेतकरी यांच्या जमिनी परत मिळाव्यात म्हणून गेली 50 वर्षे सातत्याने न्यायिक मार्गाने लढा देऊन खंडकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावला. कॉ.गायकवाड यांनी वैधानिक मार्गाने दिलेला हा लढाअनुकरणीय आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री श्री.पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
श्रीरामपुर येथील तहसिल कार्यालयाच्या जवळील कुस्ती आखाडा मैदानावर राज्य खंडकरी,शेतकरी कृति समितीचे नेते कॉ.श्री.माधवराव गायकवाड व त्यांच्या सहकार्यांच्या सत्कारानिमित्त आयोजित कृतज्ञता सोहळा मुख्यमंत्री श्री.पृथ्वीराज चव्हाण यांच्याहस्ते संपन्न झाला यावेळी ते बोलत होते.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कॉ.गायकवाड यांना 5 लाख रुपयांचा धनादेश आणि मानपत्र अर्पण करण्यात आले. मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्रातील खंडकरी शेतकरी यांच्या जमिनी परत करण्यासाठी कॉ.गायकवाड यांनी गेली 50 वर्षे सातत्याने लढा देऊन प्रदीर्घ लढा जीवंत ठेवला. आयुष्यात काही क्वचित क्षण असतात त्यापैकी हा एक क्षण होय. कॉ. माधवरावांनी या लढयाचे यशस्वी नेतृत्व करतांना आपले कर्तृत्व पणाला लावले. कम्युनिस्ट पक्षाचा संबंध रक्तरंजित लढयाशी जोडला जातो. पण हा लढा घटनेच्या चौकटीत राहुन संयमाने दिलेला लढा होय. राज्य मंत्रिमंडळातील सदस्य महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री विखे पाटील, वनमंत्री पतंगराव कदम व इतर सदस्यांनी आपापल्या परीने याकामी सहकार्य केले. हा न्याय्य लढा निकाली लागला पाहिजे ही शासनाची भुमिका आहे. 30 ऑगस्ट रोजी मा. सुप्रिम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला. अजुनही शेवटचा टप्पा बाकी आहे. जमिनीचे वाटप करावयाचे आहे. या संदर्भातील प्रक्रिया लवकरात लवकर पुर्ण करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
कॉ.माधवराव गायकवाड यांची कन्या श्रीमती साधनाताई गायकवाड यांनी यावेळी कॉ.गायकवाड यांचे भाषण वाचून दाखविले. शेतकरी बंधु भगिनिंनो आज आपण आनंद साजरा करण्यासाठी जमलो आहोत. 59 वर्षे सर्वजण मिळून संघर्ष करुन आतूरतेने वाट पाहतो तो दिवस आज आहे. माझ्याबरोबर काम करणाऱ्या 2 पिढ्या माझ्यासोबत हा आनंद सोहळा पाहण्यासाठी नाहीत याचे मला दु:ख होत आहे. नव्या पिढीला आनंद देण्यात यशस्वी झालो. खंडकरी शेतकऱ्यांच्यावतीने हा कृतज्ञता सोहळा करण्यात येत आहे त्याबद्दल आयोजकांचे आभार.
00000