बुधवार, ४ सप्टेंबर, २०१३

मंत्रिमंडळ निर्णय
राज्यातील मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी १० कोटी रुपये
राज्यातील मदरशांच्या पायाभूत सोयीसुविधा, शिक्षकांसाठी मानधन आणि विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती याचा समावेश असलेल्या मदरसा आधुनिकीकरण योजनेला राज्य मंत्रिामंडळाने आज मान्यता दिली. या योजनेसाठी चालुवर्षी  10 कोटी रुपये निधी  मंजूर करण्याचा निर्णयही घेण्यात आला. 
न्यायमूर्ती सच्चर समितीने केलेल्या शिफारशींच्या अनुषंगाने मदरशांमध्ये शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणणे शक्य व्हावे, म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. मदरशांमध्ये शिक्षण घेत असलेली मुले अत्यंत गरीब, अनाथ तसेच तलाकपिडीत महिलांची असतात.  या मुलांना आधुनिक शिक्षण मिळण्यासाठी या योजनेतून मदत होणार आहे.  त्यामुळे त्यांच्या  शैक्षणिक गुणवत्तेत वाढ होऊन रोजगार क्षमता देखील वाढू शकेल.
राज्यात एकंदर 1 हजार 889 मदरसे असून पहिल्या वर्षी 200 मदरशांची या अनुदानासाठी निवड होणार आहे.  तीन वर्षे पूर्ण झालेल्या मदरशांना यात प्राधान्य देण्यात येईल.  नोंदणी झालेल्या मदरशांना  तीन प्रमुख बाबींसाठी अनुदान देण्यात येणार आहे.
१)     मदरशांना पायाभूत सुविधांसाठी अनुदान – मदरसा इमारतींचे नुतनीकरण, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रसाधनगृहे, प्रयोगशाळा इत्यादी बाबींसाठी 2 लाख रुपये इतक्या मर्यादेपर्यंत अनुदान देण्यात येईल.  तसेच ग्रंथालयासाठी एकदाच 50 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान देण्यात येणार आहे.
२)     शिक्षकांच्या मानधनासाठी अनुदान – मदरशांमध्ये पारंपरिक धार्मिक शिक्षणाबरोबरच विज्ञान, गणित, समाजशास्त्र, हिंदी, मराठी व इंग्रजी शिकवण्यासाठी 3 शिक्षकांचे मानधन देण्यासाठी अनुदान देण्यात येईल.  (डीएड शिक्षकांना 6 हजार रुपये व बीएड/बीएस्सी बीएड शिक्षकांना 8 हजार रुपये)
३)     विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती – मदरशांमध्ये रहाणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी जे विद्यार्थी जवळच्या शाळेत 9 वी 10 वी मध्ये शिकतात अशा 600  विद्यार्थ्यांना दरवर्षी 4 हजार रुपये  व अकरावी व बारावी तसेच आयटीआय मधील 400 विद्यार्थ्यांना 5 हजार रुपये प्रमाणे  शिष्यवृत्ती देण्यात येईल.
10 वी परीक्षेला विद्यार्थ्यांना न बसविणाऱ्या मदरशांचे अनुदान बंद करण्यात येईल, असे देखील बैठकीत ठरले.
-----०-----
मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी सुकन्या योजना राबविणार
            राज्यातील  स्त्री-भ्रुण हत्या रोखणे, मुलींचे शिक्षण आरोग्य सुधारणे, बालविवाह रोखणे, भविष्यासाठी आर्थिक तरतूद करणे, मुलीच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे, या व्यापक दृष्टीकोनातून सर्व गटातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबात जन्मणाऱ्या मुलीसाठी सुकन्या योजना या नावाने नवीन योजना राबविण्यास मंत्रीमंडळ बैठकीत आज  मान्यता देण्यात आली.  ही योजना 1 जानेवारी 2014 पासून राबविण्यात येईल.
दारिद्रय रेषेखालील कुटुंबात जन्मणाऱ्या प्रत्येक मुलींच्या नांवे (दोन अपत्यांपर्यंत)  21,200 रुपये मुलीच्या जन्माच्या एक वर्षाच्या़ आत आयुर्विमा महामंडळाच्या योजनेत गुंतवून तिच्या वयाची 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर एकूण 1 लाख  रुपये इतकी रक्कम देण्यात येईल. अतिरिक्त लाभ म्हणून या योजनेसह  केंद्र शासनाच्या आम आदमी विमा योजना त्यात समाविष्ट शिक्षा सहयोग योजनेचासुध्दा लाभ देण्यात येणार आहे.  आम आदमी  विमा योजनेत या मुलीच्या नावे जमा केलेल्या रकमेतून (कॉर्पस रुपये 21 हजार 200) नाममात्र 100 रुपये प्रतिवर्षी इतका हप्ता जमा करून या मुलीच्या कमावत्या पालकाचा विमा उतरविला जाईल.  पालकाचा मृत्यू झाल्यास खालील प्रमाणे रक्कम देण्यात येईल.
नैसर्गिक मृत्यू 30 हजार रुपये, अपघातामुळे मृत्यू/कायमचे अपंगत्व 75 हजार रुपये, दोन डोळे अथवा दोन अवयव अथवा एक डोळा व एक अवयव अपघातामुळे निकामी झाल्यास 75 हजार रुपये आणि एक डोळा किंवा एक अवयव अपघातामुळे निकामी झाल्यास 37 हजार 500 रुपये.
त्याचप्रमाणे आम आदमी विमा योजनेत समाविष्ट असलेल्या शिक्षा सहयोग योजनेत त्या मुलीला 600 रुपये इतकी शिष्यवृत्ती प्रती 6 महिने, इयत्ता 9 वी ते 12 वी मध्ये ही मुलगी शिकत असताना दिली जाईल.  या योजनेचा लाभ ही बालिका 18 वर्षापर्यंत अविवाहित असणे त्याचप्रमाणे 10 वी उत्तीर्ण आणि वडील महाराष्ट्राचे रहिवाशी असणे आवश्यक आहे.
या योजनेतील 576 कोटी रुपये एवढा निधी अनुसुचित जातींसाठी, वार्षिक 106 कोटी रुपये इतका निधी विशेष घटक योजनांतर्गत व अनुसुचित जमातीसाठी वार्षिक 167 कोटी रुपये आदिवासी उपयोजनेंतर्गत आणि सर्वसाधारण गटासाठी वार्षिक 303 कोटी रुपये निधी महिला व बाल विकास विभागांतर्गत उपलब्ध करून देण्यात येईल.
-----०-----
कमी पाऊस झालेल्या तीन जिल्ह्यांमध्ये
जनावरांच्या छावण्या ३० सप्टेंबर पर्यंत सुरु ठेवणार
राज्यात पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी अद्यापही पुरेसा पाऊस न पडल्यामुळे जनावरांच्या छावण्या 30 सप्टेंबरपर्यंत पुढे सुरु ठेवण्याबाबत आज मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला.
पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर व दौंड, सातारा जिल्ह्यात फलटण, माण, खटाव तसेच सांगली जिल्ह्यात जत, आटपाडी, कवठेमहांकाळ व तासगाव आणि सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, मंगळवेढा व पंढरपूर या 13 तालुक्यात जनावरांच्या 228 छावण्या अजूनही सुरु आहेत.  या छावण्यांमध्ये सुमारे 1 लाख 75 हजार जनावरे आहेत.  या 13 तालुक्यात सरासरी पावसाच्या तुलनेत 59 ते 112 टक्के इतका पाऊस झाला आहे.  राज्यात सरासरी 1 हजार 157 मि.मी. पाऊस पडतो, परंतु उपरोक्त तालुक्यांमध्ये 227 ते 496 मि.मी. या दरम्यान पाऊस झाला आहे.  हे तालुके अवर्षणप्रवण क्षेत्रात येतात यामुळे यापूर्वी मंत्रिमंडळाने 31 ऑगस्टच्या पुढे या छावण्या चालू ठेवण्यास मान्यता दिली होती. 
विभागीय आयुक्तांची शिफारस त्याचप्रमाणे तालुक्यांचे पर्जन्यमान लक्षात घेता या छावण्या पुढे चालू ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
राज्यात 355 तालुक्यांपैकी 15 तालुक्यात 50 ते 75 टक्के, 55 तालुक्यात 75 ते 100 टक्के आणि 285 तालुक्यात 100 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला.
धरणातील पाणी साठा 78 टक्के
राज्यातील विविध जलाशयात सध्या 78 टक्के पाणी साठा झाला आहे. गेल्या वर्षी याच सुमारास 57 टक्के पाणी साठा होता.
आजची  स्थिती पुढीलप्रमाणे:- कोकण 92 टक्के (गतवर्षी 88 टक्के), मराठवाडा 46 टक्के (गतवर्षी 10 टक्के), नागपूर 92 टक्के (गतवर्षी 78 टक्के), अमरावती 92 टक्के (गतवर्षी 66 टक्के), नाशिक 64 टक्के (गतवर्षी 46 टक्के), पुणे 87 टक्के (गतवर्षी 63 टक्के) इतर धरणांमध्ये 94 टक्के (गतवर्षी 87 टक्के). 
पेरणीची कामे वेगात
राज्यात खरीपाचे सरासरी क्षेत्र 134.69 लाख हेक्टर असून, 140.86 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.  कोकण, कोल्हापूर व पुणे विभागात भात पुर्नलागवडीची कामे पूर्ण झाली आहेत. खरीप ज्वारी, बाजरी, मका, पिके फुलोरा अवस्थेत आहेत तर तूर, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन ही  पिके शेंगा धरण्याच्या अवस्थेत आहेत.  कोकणात अतिवृष्टीमुळे भाताच्या पिकाचे नुकसान झाले असून नागपूर विभागातही अतिवृष्टीमुळे काही प्रमाणात क्षेत्र बाधीत झाले आहे.
टँकर्सच्या संख्येत किंचीत वाढ
एकंदर 823 गावे आणि 4320 वाड्यांना 1042 टँकर्स पाणी पुरवठा करीत आहेत. गेल्या वर्षी याच सुमारास 1939 टँकर्स होते. गेल्या आठवड्याच्या तुलनेत टँकर्सच्या संख्येत किंचीत वाढ झाली आहे.
टंचाई परिस्थितीत लोकांना गावातच रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टीने महाराष्ट्र राज्य ग्रामीण रोजगार हमी योजनेखाली एकूण 11 हजार 105 कामे सुरु असून या कामावर 78 हजार 991 मजूर काम करीत आहेत.
----0----





मंगळवार, ३ सप्टेंबर, २०१३

यंदाचा ऊस गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून
ऊस उत्पादकांना ठिबकच्या वापरासाठी
प्रोत्साहीत करणे गरजेचे -मुख्यमंत्री
मुंबई, दि. ३ : यंदाच्या वर्षाचा ऊस गाळप हंगाम १ नोव्हेंबर २०१३ पासून सुरु करण्याचा निर्णय मंत्री समितीच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ऊस उत्पादनासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केल्यास साखरेच्या सरासरी उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच पाण्याचीही मोठ्या प्रमाणात बचत होणार आहे. त्यामुळे राज्यातील साखर कारखान्यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना ठिबकचा वापर करण्यास प्रोत्साहीत करावे, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी याप्रसंगी केले.    
मागील वर्षातील ऊस गाळपाचा आढावा आणि चालू वर्षातील ऊस गाळप हंगामाचे धोरण ठरविण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली येथील सह्याद्री राज्य अतिथीगृहात आज ही बैठक झाली. बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, वने मंत्री पतंगराव कदम, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे, कृषी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे, राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष आमदार विजयसिंह मोहिते-पाटील, कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल, सहकार विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे प्रधान सचिव क्षत्रपती शिवाजी, जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिव मालिनी शंकर, साखर आयुक्त विजयकुमार सिंघल यांच्यासह साखर संघाचे सदस्य, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, उस उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केल्यास साखरेच्या सरासरी उत्पन्नात प्रती हेक्टरी साधारण २० टनाची वाढ होऊ शकते. त्यामुळे हा कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे. राज्यातील साखर कारखाने, साखर कारखाना संघ यांनी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना ठिबकचा वापर करण्यास प्रोत्साहीत करावे. येत्या ३ वर्षात संपूर्ण ऊसाचे पीक ठिबकवरच कसे उत्पादीत होईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहेत, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. ठिबक सिंचनासाठी केंद्र शासनाकडून अनुदान मिळते. पण सध्या हे अनुदान अपुरे असल्याने ते वाढवून मिळावे अशी मागणी केंद्राकडे करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना ठिबकच्या वापरास प्रोत्साहीत करण्यासाठी शेतकरी, कारखाना, नाबार्डसारख्या बँका आणि शासन यांच्या सहभागातून योजना आखता येईल का, याविषयी कृषी आणि सहकार विभागाने विचार करावा. तसेच सहउत्पादने घेणाऱ्या कारखान्यांना परचेस टॅक्समध्ये ज्याप्रमाणे सवलत दिली जाते, त्याप्रमाणे ठिबकच्या वापरासाठी प्रयत्न करणाऱ्या साखर कारखान्यांनाही परचेस टॅक्समध्ये सवलत देता येईल का याचा विचार करावा, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
याप्रसंगी साखर उद्योगातील विविध समस्या, यंदाच्या हंगामाचे नियोजन, पुढील काळातील धोरण आदी विषयांवर चर्चा झाली.  
००००००

            
क्रीडा विद्यापीठाची आणि व्यवसाय प्रशिक्षण
विद्यापीठाची राज्यात लवकरच स्थापना: राज्यपाल
मुंबई, दि. ३ : महाराष्ट्राने देशाला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय दर्जाचे अनेक उत्तम खेळाडु दिले आहेत. क्रीडाविश्वातील महाराष्ट्राची ही पताका कायमची फडकत ठेवण्यासाठी आणि होतकरु खेळाडुंना शास्त्रशुद्ध शिक्षण मिळण्यासाठी राज्यात स्वतंत्र क्रीडा विद्यापीठाची स्थापना लवकरात लवकर करण्यात यावी. तसेच उद्योजकांना स्थानिक लोकांमधूनच कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी राज्यात व्यवसाय प्रशिक्षण आणि कौशल्य विकास विद्यापीठाची स्थापनाही तातडीने व्हावी, असे निर्देश राज्यपाल आणि राज्यामधील विद्यापीठांचे कुलपती श्री. के. शंकरनारायणन यांनी आज दिले.
       राज्यातील कृषी विद्यापीठे वगळता अन्य विद्यापीठांच्या कुलगुरुंची परिषद आज मुंबईत राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री विजयकुमार गावित, सार्वजनिक आरोग्य मंत्री सुरेश शेट्टी, उच्च व तंत्र आणि वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री डी.पी.सावंत, वित्त राज्यमंत्री राजेंद्र मुळक, मुख्य सचिव जयंत कुमार बाँठिया आणि राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांचे कुलगुरु यावेळी उपस्थित होते.
या विद्यापीठाच्या निर्मितीसंदर्भात मी यापूर्वीही राज्य शासनाला सूचना केल्या असल्याचे सांगून राज्यपाल म्हणाले की राज्यात कुशल मनुष्यबळ निर्माण होण्यासाठी या विद्यापीठाला चालना देणे अतिशय गरजेचे आहे. राज्यात येणारी परदेशी गुंतवणूक लक्षात घेता उच्च शिक्षणाचाही अधिक विस्तार होणे आवश्यक आहे. राज्य शासनाने विद्यापीठांना यासाठी सर्वतोपरी सहाय्य करावे. जागतिक स्पर्धेत टिकून रहावयाचे असेल तर राज्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा वाढला पाहिजे. शासनाने डॉ. अनिल काकोडकर, डॉ. राम ताकवले, डॉ. अरुण निगवेकर यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या समित्यांचे अहवाल आता प्राप्त झाले आहेत. या समित्यांनी केलेल्या सूचनांवर त्वरीत अंमलबजावणी करावी अन्यथा राज्यातील उच्च शिक्षणावर त्याचा विपरित परिणाम होऊ शकेल असं मत राज्यपालांनी यावेळी व्यक्त केले.
राज्यातील अनेक महाविद्यालयात पुरेसे प्राध्यापक नसल्याकडे लक्ष वेधून अशा महाविद्यालयाविरुध्द गंभीर कारवाई करण्यात यावी असे निर्देश यावेळी राज्यपालांनी दिले. नुकतेच मुंबई विद्यापीठात व्हर्च्युअल क्लासरुमचे उद्घाटन करण्यात आले. व्हर्च्युअल क्लासरुममुळे नामवंत प्राध्यापकांची आणि शास्त्रज्ञांची व्याख्याने ग्रामीण भागातील मुलांपर्यंत पोहचून शिक्षणाचा दर्जा सुधारण्यास निश्चितच मदत होणार आहे. बरीच महाविद्यालये नॅकचे मानांकन घेण्यास पुढे येत नाहीत.  कुलगुरुंनी अशा महाविद्यालयांना नियमित तपासणीसाठी आणि नॅकचे मानांकन घेण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे.
महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या वाढत चाललेल्या घटना आणि गुन्हेगारी याबद्दल चिंता व्यक्त करुन राज्यातील महाविद्यालयांच्या परिसरात विद्यार्थिंनी आणि महिला कर्मचारी यांच्यासाठी सुरक्षित आणि आश्वासक वातावरण असल्याचा विश्वास निर्माण करावा, असे आवाहन राज्यपाल के. शंकरनारायणन् यांनी केले. महिला अत्याचारांच्या प्रत्येक प्रकरणांचा गांभीर्याने विचार व्हावा. तसेच विद्यापीठांमधील महिला अत्याचार निवारण केंद्रे तातडीने कार्यरत व्हावीत. विद्यापीठांनी आणि महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना नैतिकतेचे धडे द्यावेत. ज्यामुळे विद्यार्थ्यांमधून उद्याचे चांगले नागरिक तयार होतील, अशा सूचनाही राज्यपालांनी यावेळी केल्या.
जागतिक स्पर्धेचे आव्हान : मुख्यमंत्री
          जागतिक स्पर्धेचे आव्हान पेलेल, असा विद्यार्थी घडविण्याचे आव्हान विद्यापीठांनी पेलावे, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सर्व कुलगुरुंना केले. ते म्हणाले की, विद्यापीठांनी आपले विविध अभ्यासक्रम तयार करताना आणि विद्यार्थी घडवताना जागतिक परिस्थितीचे भान ठेवले पाहिजे. परदेशातील विश्वविद्यालयांतून मिळणारे शिक्षण, तेथील अभ्यासक्रमांचा दर्जा पाहिला असता आपली विद्यापीठे यात कोठे आहेत, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. जगातील पहिल्या दोनशे विद्यापीठांमध्ये भारतातील एकाही विद्यापीठाचा समावेश होत नाही, ही आत्मपरिक्षणाची बाब आहे. सर्व कुलगुरुंनी याबाबत गांभिर्याने विचार करावा आणि आपल्या विद्यापीठातून बाहेर पडणारा विद्यार्थी जागतिक प्लॅटफॉर्मवर कसा टिकेल, हे पहावे.
          हे घडायचे असेल तर विद्यापीठांमध्येच एक सशक्त स्पर्धेचे वातावरण निर्माण झाले पाहिजे.  मला असे वाटते की, आपण जर उपक्रमशीलतेवर आधारित ज्ञानाधिष्ठित समाजाची निर्मिती करु शकलो नाही तर आपल्या विकासावरही मर्यादा येतील. आपल्या देशात नैसर्गिक साधनसंपत्तीची वानवा आहे. आपल्या राष्ट्रीय उत्पन्नापैकी फार मोठी रक्कम तेलाच्या आयातीवर खर्च होते. त्याचा परिणाम आपल्या विकासकामांवर होतो. मात्र बुद्धीसामर्थ्याच्या जोरावर आपण ही तफावत भरुन काढु शकतो. मात्र यासाठी त्या दर्जाचे शिक्षण देऊन विद्यार्थी घडविण्याची जबाबदारी विद्यापीठांची आहे आणि त्यांनी ती पार पाडावी, असे श्री. चव्हाण म्हणाले.
उपक्रमशीलता अहवाल बनवावा
          आजच्या विद्यापीठांमध्ये पठडीतील शिक्षण दिले जाते, असे सांगून श्री. चव्हाण म्हणाले की, विद्यापीठांनी आता पारंपरिक चौकटीबाहेर येऊन उपक्रमशील झाले पाहिजे. आज जागतिक बाजारपेठेत नवनवीन गॅजेटस् येत आहेत. यापैकी एकही गॅजेट देशात बनविले जात नाही. उपक्रमशीलता आणि नवीन संशोधनाचे नेतृत्व जपानकडुन चीनकडे चालले आहे. या सर्वाचा विचार झाला पाहिजे. यासाठी विद्यापीठांनी दरवर्षी उपक्रमशीलता अहवाल प्रसिद्ध करावा, असे आवाहन त्यांनी केले. जागतिक अर्थव्यवस्था हेलकावे खात आहे. मंदीचे वातावरण जगभर आहे. या परिस्थितीत नोकऱ्या कमी होणार आहेत. ज्या आहेत, त्या मिळविण्यासाठी उच्च दर्जा अणि पात्रता हाच निकष राहणार आहे. यादृष्टीने आपल्या विद्यापीठातून बाहेर पडणारा विद्यार्थी कोठे उभा आहे, याकडे कुलगुरुनी पहावे, असे श्री. चव्हाण म्हणाले.
मुंबई विद्यापीठासाठी दोन कोटी
          मुंबई विद्यापीठातील ‘प्रवीणचंद गांधी अध्यासना’साठी राज्य शासनाच्या दोन कोटी रुपये अनुदानाची घोषणा मुख्यमंत्र्यांनी आजच्या बैठकीत केली. इंडियन मर्चंटस् चेंबरने संस्थापक प्रविणचंद गांधी यांच्या नावे मुंबई विद्यापीठामध्ये अध्यासन सुरु करावे, यासाठी दोन कोटी रुपये देण्याची घोषणा आपल्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केली होती. त्यावेळी दिलेल्या आश्वासनानुसार मुख्यमंत्र्यांनी मॅचिंग ग्रँट म्हणुन तेवढीच रक्कम आज जाहीर केली.
उद्योगांकडुन देणग्या घ्याव्या
          राज्य शासनाकडुन विद्यापीठांना देण्यात येणाऱ्या आर्थिक निधीला मर्यादा आहेत. वातावरणातील बदलांमुळे दुष्काळ आणि अतिवृष्टीसारखे प्रकार घडत आहेत. यामुळे सरकारचा बराचसा निधी मदतकार्य, पॅकेज यासाठी वापरावा लागतो. यासाठी विद्यापीठांनी माजी विद्यार्थी संघटना, उद्योगपती यांच्याकडुन मदतरुपाने निधी मिळण्यासाठी एखादी यांजना तयार करावी. अनेक उद्योग यासाठी पुढे येण्यासाठी उत्सुक आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
संशोधनाचा फायदा व्हावा
मा. राज्यपालांच्या निर्देशानुसार राज्यात लवकरच व्यवसाय प्रशिक्षण आणि कौशल्य विकास विद्यापीठाची, तसेच क्रीडा विद्यापीठाची स्थापन लवकरात लवकर करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितली.  राज्यातील विद्यापीठामध्ये संशोधन कार्याला विशेष प्रोत्साहन दिले पाहिजे. जागतिक स्पर्धेत टिकून राहील असे नविन संशोधन राज्याच्या विद्यापीठांमध्ये झाले पाहिजे. हे संशोधन केवळ पेटंट घेण्यापुरते मर्यादित न ठेवता या संशोधनाचा आर्थिक फायदा संशोधक, विद्यापीठ आणि राज्याला मिळाला पाहिजे.  राज्यातील महाविद्यालयांचा दर्जा सुधारण्यासाठी राज्यातील विद्यापीठांमध्ये एकसूत्रता आणणे आवश्यक आहे. विद्यापीठांना अभ्यासक्रम, परीक्षा पध्दती निवडीचे स्वातंत्र्य असले तरी त्यासाठी कांही ठराविक पध्दती असावी अशी भावना यावेळी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
विद्यापीठ कायद्यात लवकरच सुधारणा : टोपे
उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी राज्यात नियुक्त केलेल्या तीनही समित्यांच्या अहवालानुसार विद्यापीठ कायद्यात करण्यात येणाऱ्या सुधारणांच्या मसुद्यास अंतिम स्वरुप देण्यात आले असून एक महिन्यात हा मसुदा मंत्रीमंडळ बैठकीत ठेवण्यात येईल आणि हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडण्यात येईल, अशी माहिती  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी दिली. विद्यार्थींनींच्या सुरक्षितेसाठी प्रत्येक महाविद्यालयात कार्यरत असलेल्या विशाखा सेल्सचे  अधिक बळकटीकरण  करण्यात येईल, असेही श्री.टोपे यांनी यावेळी सांगितले. 
स्वयंसहायित विद्यापीठांबाबत सात-आठ प्रस्ताव आले असल्याचे सांगून श्री. टोपे पुढे म्हणाले एक-दोन दिवसात या प्रस्तावांचे छाननी पूर्ण होईल. केंद्र शासनाने तंत्र शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी सुरु केलेला उपक्रम, तसेच राष्ट्रीय उच्च शिक्षा अभियान (रुसा) राज्यात राबविले जाईल. उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी चांगल्या दर्जाच्या प्राध्यापकांची आवश्यकता आहे.त्यासाठी यशदा मध्ये 2000 शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. सर्व विद्यापीठांनी व्यवसाय प्रशिक्षणाचा डिप्लोमा सुरु करावा अशी सुचनाही यावेळी श्री.टोपे यांनी केली.
अवयवदानाबाबत सजगता यावी : शेट्टी
या बैठकीत अवयव दान अभियान तसेच थॅलासिमिया या आजारासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. त्यावेळी विद्यार्थ्यांची अवयवदान अभियानात भरीव मदत होऊ शकेल, असे मत श्री.सुरेश शेट्टी यांनी व्यक्त केले. एनएसएसच्या माध्यमातून या अभियानाविषयी विद्यार्थ्यांमध्ये सजगता निर्माण करता येईल, असेही श्री. शेट्टी यावेळी सांगितले. राजीव गांधी जीवनदायी योजनेंतर्गत थॅलासिमिया या आजारावर एक लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या लोकांना मोफत औषधोपचार करण्यात येतात, असे सांगून श्री शेट्टी पुढे म्हणाले, सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत या अभियानासंदर्भात तसेच थॅलासिमिया या आजाराबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यासाठी व्याख्याने आयोजित करण्यात येतील.
उच्च व तंत्र शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी राज्यपालांनी केलेल्या बहुमोल मार्गदर्शनाबद्दल आभार मानून प्रधान सचिव संजयकुमार यांनी बैठकीत झालेल्या विचार विनिमयाबद्दल समाधान व्यक्त केले. या मंथनातून प्राप्त झालेल्या सूचनांवर आणि परीक्षा निकालाबाबत राज्य शासनाने नेमलेल्या अगरवाल समितीचा अहवाल शासनाला प्राप्त झाला असून याबद्दलची कार्यवाही तातडीने करण्यात येईल, असे श्री. संजयकुमार यांनी यावेळी सांगितले.
वैद्यकीय शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव टी.सी. बेंजामिन, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव संजयकुमार, अन्य वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

                                                     *****