गुरुवार, ३० ऑगस्ट, २०१२


यंदाचा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार
आत्माराम भेंडे यांना जाहीर
मुंबई, दि. 30 ऑगस्ट :  ज्येष्ठ नाट्यकर्मी श्री. आत्माराम भेंडे यांना यावर्षीचा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री, संजय देवतळे यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार निवडीसंदर्भात झालेल्या बैठकीत श्री. आत्माराम भेंडे यांची निवड करण्यात आली.
        मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि सांस्कृतिक कार्य मंत्री संजय देवतळे यांनी श्री. आत्माराम भेंडे यांचे अभिनंदन केले आहे. या पुरस्काराचे वितरण लवकरच दिमाखदार समारंभात करण्यात येईल.
        महाराष्ट्र शासनातर्फे मराठी नाट्यक्षेत्रातील ज्येष्ठ व श्रेष्ठ कलाकारास देण्यात येणाऱ्या या रंगभूमी जीवन गौरव पुरस्काराचे रोख रुपये 5 लक्ष, मानचिन्ह आणि मानपत्र असे स्वरुप आहे.
        गेली सहा दशकांहून अधिककाळ मराठी रंगभूमीवर अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता  म्हणून कार्यरत असणाऱ्या आत्माराम भेंडे यांनी इंडियन नॅशनल थिएटर मधून आपली कारकीर्द सुरु केली. विनोदी अभिनेते आणि लेखक बबन प्रभू यांच्याबरोबर त्यांनी अनेक दर्जेदार विनोदी, फार्सिकल नाटकं दर्शकांना दिली. बबन प्रभू-आत्माराम भेंडे या जोडीने दिनूच्या सासूबाई राधाबाई, झोपी गेलेला जागा झाला, पिलूचं लग्न आदी अनेक नाटके गाजविली. अभिनेता म्हणून भेंडे साहेबांनी मन पाखरु पाखरु, प्रिती परी तुजवरती, तरुण तुर्क म्हातारे अर्क, तुज आहे तुजपाशी, पळा पळा कोण पुढे पळे अशा नाटकांतून आपले अभिनय कौशल्य दाखविले.
        मराठी रंगभूमीप्रमाणेच हिंदी, इंग्रजी रंगभूमीवरही त्यांनी कर्तृत्व गाजविले. तसेच दूरदर्शन मालिकाही त्यांनी दिग्दर्शित केल्या आहेत.
        त्यांना आतापर्यंत नाट्यदर्पण, शंकरराव घाणेकर, नाट्यभूषण, चिंतामणराव कोल्हटकर, नटसम्राट नानासाहेब फाटक तसेच 2006-07 साली महाराष्ट्र शासनाच्यावतीने राज्य सांस्कृतिक राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.
        व्यावसायिक रंगभूमीवर वैशिष्ट्यपूर्ण नाट्यमुद्रा उमटविणारे ज्येष्ठ रंगकर्मी कै. प्रभाकर पणशीकर यांना 2006 मध्ये पहिल्या पुरस्काराने गौरविण्यात आले तर आतापर्यंत श्रीमती विजया मेहता (2007), श्री. भालचंद्र पेंढारकर (2008), श्री. मधुकर तोरडमल (2009), श्रीमती सुलभा देशपांडे (2010) आणि श्रीमती सुधा करमरकर (2011) यांना या पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे.
0000000

बुधवार, २९ ऑगस्ट, २०१२


कसाबच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब
झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांना समाधान

मुंबई, दि. 29: मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील दोषी अजमल कसाब याच्या फाशीच्या शिक्षेवर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याबद्दल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले आहे.
अजमल कसाबला विशेष दहशतवाद विरोधी कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली होती.  त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने देखिल शिक्कामोर्तब केले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष होते आणि अपेक्षेप्रमाणे ही फाशीची शिक्षा कायम ठेवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला, याचे स्वागत मुख्यमंत्र्यांनी केले आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर राज्य सरकार त्याचप्रमाणे केंद्राने देखिल योग्य पध्दतीने न्यायालयीन यंत्रणेच्या माध्यमातून या घटनेची  चौकशी केली  हे महत्वाचे आहे. यापुढील कार्यवाही वेगाने व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
------0-----



राज्यातील दुष्काळी परिस्थिती
15 सप्टेंबरपूर्वी नजर पैसेवारीची प्रक्रिया पूर्ण करणार

राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा आज राज्य मंत्रिमंडळाने घेतला. 15 सप्टेंबर पूर्वी नजर पैसेवारीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतरच दुष्काळाबाबत द्यावयाच्या सवलतींविषयी निर्णय घेण्यात येईल. सरकारने यापुर्वीच 123 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला असून आवश्यकतेप्रमाणे टँकरने पाणीपुरवठा, पुरेशा कामांची उपलब्धता, किमान 250 जनावरे असल्यास छावणी सुरु करणे, असे निर्णय घेण्यात आले आहेत. दुष्काळी भागात पाणीपुरवठा योजनांसाठी हगणदारी मुक्तीची अट एक वर्ष शिथिल करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. राज्यातील साखर कारखान्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात गुरांच्या जास्तीत जास्त छावण्या उघडाव्यात असे आवाहनही करण्यात आले आहे.
5 जिल्ह्यात 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस
        28 ऑगस्ट च्या आकडेवारीनुसार राज्यातील 5 जिल्ह्यांमध्ये 100 टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला असून 11 जिल्ह्यात 76 ते 100 टक्के, 16 जिल्ह्यात 50 ते 75 टक्के आणि 3 जिल्ह्यात 50 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे.
धरणात 54 टक्के पाणी साठा
        राज्यातील धरणात 54 टक्के पाणी साठा असून गेल्या वर्षी याच सुमारास 67 टक्के पाणी साठा होता.  कोकणातील धरणांमध्ये 85 टक्के पाणी साठा असून मराठवाड्यातील धरणांमध्ये 9 टक्के पाणी साठा आहे. इतर ठिकाणची परिस्थिती पुढील प्रमाणे आहे.
नागपूर 75 टक्के, अमरावती 60 टक्के, नाशिक 42 टक्के, पुणे 62 टक्के आणि इतर धरणे 82 टक्के.
टँकर्स
        राज्यातील 1417 गावे आणि 6179 वाड्यांना 1939 टँकर्सनी पाणी पुरवठा करण्यात येत आहे.  गेल्या वर्षी याच सुमारास केवळ 67 टँकर्स पाणी पुरवठा करीत होते. 
गुरांच्या 130 छावण्या
        राज्यात 130 छावण्यांमधून 62,245 जनावरांना चारा देण्यात येत आहे. अहमदनगर जिल्ह्यात 96, नाशिक जिल्ह्यात 2, सातारा जिल्ह्यात 31 आणि सांगली जिल्ह्यात 1 अशा छावण्या सुरु आहेत. 
रोहयो
        राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतंर्गत 33857 कामे सुरु असून 2 लाख 5 हजार 479 मजुरांची उपस्थिती आहे. 
पॅकेजचा खर्च
कापूस, सोयाबीन व धान उत्पादकांना 2 हजार कोटींचे अर्थसहाय्य मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी 1663 कोटी 72 लाख इतका निधी जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आला आहे.
केंद्राची मदत
        टंचाई परिस्थितीबाबत केंद्र शासनाला विनंती करण्यात आली असून 2 हजार 281 कोटी 37 लाख इतक्या निधीची मागणी करण्यात आली आहे.  केंद्र शासनाने आतापर्यंत 574 कोटी रुपये इतकी मदत दिली आहे. पाणी पुरवठा योजनेकरिता 130 कोटी इतका निधी तर चारा डेपोकरिता 240 कोटी 14 लाख व जनावरांच्या छावण्याकरिता 15 कोटी 15 लाख रुपये इतका निधी वितरित करण्यात आला आहे.
-----0----