मंगळवार, २६ जून, २०१२



अभियांत्रिकी कौशल्य पणाला लावून
आपत्तीच्या प्रसंगी काम करणार
अभियंत्यांचा मुख्यमंत्र्यांना विश्वास

मुंबई, दिनांक 26 जून : मंत्रालयाला लागलेल्या आगीनंतर आता कर्मचारी झपाट्याने कामाला लागले असून अभियंता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी  आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली आणि कुठल्याही प्रकारची जबाबदारी सोपविल्यास ती वेळेत पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला. 
मुख्यमंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले आणि अशा अडचणीच्या प्रसंगी इतरही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या अभियंत्यांसारखा निर्धार व्यक्त करून या पुनर्निर्माणाच्या कामी मदत करावी असे आवाहन केले.  महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा महासंघाचे अध्यक्ष इंजि.राजेंद्र पवार, उपाध्यक्ष इंजि.ए.व्ही.देवधर, अधीक्षक अभियंता श्री.देबडवार त्याचप्रमाणे इतर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
शासनाच्या अभियंत्यांवर जी जबाबदारी सोपविली जाईल ती संपूर्ण अभियांत्रिकी कौशल्य पणाला लावून, गुणवत्ता राखून आणि वेळेच्या मर्यादेत पूर्ण करण्याच्या या अभियंत्यांच्या निर्धारामुळे प्रशासनाचे मनोबल निश्चितपणे वाढेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
00000

सोमवार, २५ जून, २०१२

संकटातून सावरत नेहमीपेक्षा
अधिक जोमाने कामाला लागुया
मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई, दिनांक 25 जून : मंत्रालय ही केवळ राज्याचा गाडा हाकणारी एक इमारत नाही, तर सगळ्या देशाचे नेतृत्व करणाऱ्या  महाराष्ट्राचे शक्ती केंद्र आणि राज्याचा स्वाभिमान आहे. आणि हे केंद्र ज्या मुंबईत आहे त्या महानगराचा जगात एक लौकिक आहे. मुंबईवर एक ओरखडा जरी निघाला तर देशात काय, जगात त्याची प्रतिक्रिया उमटते आणि म्हणूनच इतर कुठल्याही संकटातून जसे आपण सावरून कामाला सुरुवात करतो, तशीच सुरुवात करून आपल्याला नेहमीपेक्षा अधिक जोराने कामाला लागूया, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला केले आहे.
           चार दिवसांपुर्वी आपल्या राज्याचा मानबिंदु असलेल्या या मंत्रालयाच्या पवित्र इमारतीतील अग्नीतांडव बहुतेकांनी पाहिले आणि काहीजणांनी अनुभवलेही आहे. दिनांक २१ जूनच्या भयंकर अशा आगीच्या घटनेनंतर स्वत:ला सावरत सर्व अधिकारी व कर्मचारी पुन्हा एकदा जोमाने कामावर हजर होत आहेत, ही प्रबळ इच्छा केवळ कौतुकास्पद नाही तर नेतृत्वगुण दाखविणारी आहे, असे सांगून श्री.चव्हाण यांनी  या दुर्घटनेत ५ जणांनी जीव गमावले आहेत,  त्यांनाही श्रद्धांजली वाहिली.

परिस्थिती पूर्वपदावर
आगीची भीषण घटना घडून गेल्याला आज ४ दिवस पूर्ण होत हेत. कशामुळे आग लागली, ती इतकी वेगाने कशी पसरली, त्याला कोण जबाबदार आहे, या प्रश्नांची उत्तरे मिळतीलच. तो एक वेगळा भाग आहे, असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आगीवर नियंत्रण मिळविल्यानंतर दिवस रात्र ज्या झपाट्याने आपण परिस्थिती पूर्वपदाला आणली आहे, त्या प्रयत्नांना सगळे जग दाद देत आहे.

मुंबईने यापूर्वी अनेक मानव निर्मित आणि नैसर्गिक संकटाचा सामना केला आहे. या संकटातूनदेखील निर्धाराने मार्ग काढायचा आहे. ज्या दिवशी ही आग लागली त्यादिवशी फायर ब्रिगेड, पोलीस यांच्या जोडीने मंत्रालयातले अगदी चतुर्थ श्रेणी कर्मचारी सुध्दा मदत कामात धावपळ करीत होते. इमारतीवरचा तिरंगा व्यवस्थित उतरविण्याचे भान या कर्मचाऱ्यांनी ठेवले, जखमीना रुग्णालयात पोहचविण्याचे काम देखील केले. आपत्ती आल्यानंतर स्वत:ची सुटका करताना सहकाऱ्यांना देखील मदत केली आहे.

सुरक्षिततेचे निकष पाळायलाच हवेत

ही घटना आपल्याला बरेच काही शिकवून जाणारी आहे. मंत्रालयाची ही इमारत बरीच जुनी असली तरी तिचे मूळ बांधकाम मजबूत आहे. मात्र वरचेवर या ठिकाणी कामाच्या गरजेप्रमाणे आपण अंतर्गत बदल करीत गेलो, हे करताना काळजी घेणे, महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक होते, असे सांगून श्री.चव्हाण पुढे म्हणाले की, आपत्तीत अधिक जबाबदारीने आणि समयसूचकतेने वागणे आवश्यक आहे. यापुढच्या काळात आकस्मिक संकटांच्यादृष्टीने सुरक्षिततेचे सर्व निकष पाळुन, नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काटेकोर काळजी घेणे आवश्यक आहे.

ष्ट झालेल्या अभिलेखांचे पुनर्गठण

सर्वात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे फाईल्स आणि डाटा रिकव्हरी. नष्ट झालेल्या अभिलेखांचे पुनर्गठण करण्याबरोबरच सर्वसामान्य जनतेचे टपाल स्वीकारणे, स्थलांतरित कराव्या लागणाऱ्या विभागांची वा कक्षांची  माहिती संबंधितांना मिळेल याची  व्यवस्था करणे, ही कामे प्राधान्याने करावी लागणार आहेत.

मंत्रालयातील जो भाग सुस्थितीत आहे विशेषत: विस्तारित इमारत, सी-3 (मुख्य) आणि 4 मुख्य भाग या ठिकाणी जमिनीवरील पाणी काढणे, कचरा हटविणे, वीज पुरवठा सुरळीत करणे, फलक लावणे, खिडक्यांची तावदाने लावणे, जी कार्यालये इतरत्र स्थलांतरित झाली आहेत, त्या कार्यालयांचे टपाल मंत्रालयात स्वीकारण्याची व्यवस्था करणे अशी विविध कामे करायची आहेत.

प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष सेल

राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष सेल तयार करण्यात येणार आहे. जनतेशी संबंधीत असलेल्या व आगीत नष्ट झालेल्या कागदपत्रांसंदर्भात तातडीने विशेष सेल तयार करण्याचे आदेश मी यापूर्वीच दिले असून आगीत नुकसान झाल्याने जी कार्यालये स्थलांतरित करावी लागणार आहेत, त्यांच्याबाबतही फर्निचर व माहिती तंत्रज्ञान उपकरणे बसविणे, यापासून अभ्यागतांच्या प्रवेशाची व्यवस्था करणे आपल्या विभागाचे संपर्क कार्यालय जे.जे. गेट येथील शेडमध्ये पूर्ण क्षमतेने सुरु करणे आवश्यक आहे.

आगीचे काम दाखवून काम थांबणार नाही

काही विभागांचे संपर्क कक्ष कालपासून सुरु झाले आहेत. या संपर्क कक्षात क्षेत्रिय कार्यालय तसेच टपाल स्वीकारून अभ्यागतांना आवश्यक ती माहिती द्यावी लागणार आहे. कुठल्याही परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांचे काम अडणार नाही, प्रशासन थांबणार नाही,आगीचे कारण दाखवून काम थांबणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी, असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, कार्यक्षमतेची खरी परीक्षा संकटकाळीच होते. एका संकटावर थोडीशी का होईना, पण मात करुन आपण आज एक नवी सुरुवात करीत आहोत. या ठिकाणी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या एका काव्यपंक्तीची आठवण येते.....कविवर्य म्हणतात,

अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत अन् आशा....

किनारा तुला पामराला..

या संकटालाही आपण असेच म्हणुया.

आमची जिद्द, आमचा आत्मविश्वास दुर्दम्य आहे, एखाद्या संकटामुळे तो कोलमडुन पडणारा नाही. हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा, फुले-शाहु-आंबेडकर या प्रात:स्मरणीय त्रयीचा आहे.

पूर्व दिव्य ज्यांचे त्यांना रम्य भावी काल,

रात्रीच्या गर्भात वसे उद्याचा उष:काल ......

या दुर्घटनेमुळे कामकाजावर, प्रशासनावर कोणताही परिणाम होणार नाही, याची आपण सर्वांनी पराकोटीची दक्षता घेऊया.  लोकल्याणकारी राज्य म्हणजे काय असते, याचे अत्यंत उत्तम असे उदाहरण घालुन देण्याचे काम करूया, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, महाराष्ट्राचे भाग्यविधाते प्रथम मुख्यमंत्री स्व. यशंवतरावजी चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षात ही महाभयंकर दुर्घटना घडली, हे दुर्दैवाचे आहे. म्हणुनच या संकटावर मात करुन यापुढच्या काळात नव्या जोमाने, एकदिलाने आणि राष्ट्रभावनेने प्रेरित होऊन आपण सगळे पुढे जाऊया आणि एक नवा महाराष्ट्र घडवुया असेही मुख्यमंत्र्यांनी शेवटी म्हटले आहे.

00000

शनिवार, २३ जून, २०१२



मुख्यमंत्र्यांनी केली श्री.भुजबळ यांच्यासमवेत मंत्रालयाची पाहणी
राज्याचे प्रशासन नव्या जोमाने
फिनिक्स पक्ष्याप्रमाणे उभे राहील
                                         -- मुख्यमंत्री

   मुंबई, दि. 23 : आगीच्या आपत्तीमुळे मंत्रालयाचे तीन मजले भस्मसात झाले असले तरी या राखेच्या ढिगाऱ्यातूनच राज्याचे प्रशासन नव्या जोमाने आणि उभारीने फिनिक्स पक्ष्याप्रमाणे उभे राहील, असा ठाम आत्मविश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज व्यक्त केला.
   मुख्यमंत्री श्री. चव्हाण आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी आज सायंकाळी मंत्रालयाच्या सर्व मजल्यांची पाहणी केली त्यानंतर ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अजितकुमार जैन, सचिव आशिषकुमार सिंह, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव शामल मुखर्जी, अधिक्षक अभियंता उल्हास देबडवार, विद्युत विभागाचे मुख्य अभियंता वळेकर, मुख्य अग्निशमन अधिकारी एस.व्ही.जोशी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी पी.एस.रहांदळे व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
   श्री. चव्हाण यांनी आज विधानभवनातील मुख्यमंत्री कार्यालयात दिवसभर थांबून कामकाज पाहिले. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. तसेच नवीन प्रशासकीय भवनातील दुसऱ्या मजल्यावर सुरु केलेल्या मुख्य सचिव कार्यालयात वरिष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन आगीच्या दुर्घटनेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर सायंकाळी 4 ते 5 या वेळात त्यांनी मंत्रालयातील तळमजल्यापासून सहाव्या मजल्यापर्यंत सर्व मजल्यांची पाहणी केली.
   मंत्रालयाच्या तळमजला ते तिसऱ्या मजल्यापर्यंत सर्व कार्यालये व तेथील साहित्य सुरक्षित आहे. मात्र आग विझवतांना मारलेले पाणी या मजल्यांवर आल्यामुळे सर्वत्र ओल आली आहे. ती साफ करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या चार मजल्यांचा विद्युत पुरवठा उद्या सायंकाळपर्यंत सुरु करण्यात यश येईल. त्यामुळे या मजल्यांवरील सर्व कार्यालयांमध्ये कामकाज सुरु करण्यास कोणतीही अडचण येणार नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
   चार, पाच व सहा या मजल्यांवरील सर्व साहित्य भस्मसात झाले असले तरी इमारतीचे स्ट्रक्चर उत्तम स्थितीमध्ये असल्याचा निर्वाळा तज्ज्ञांनी दिला आहे. जळालेले सर्व सामान काढण्याचे कामही युद्धपातळीवर सुरु आहे.  मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे कार्यालय मंत्रालयाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावर जागा उपलब्ध करुन लवकरात लवकर सुरु करण्याचा मनोदय मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखविला.
0 0 0 0



स्व.मोहन मोरे व स्व.तुकाराम मोरे
यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

   मुंबई, दि.23 : मंत्रालयात गुरुवारी लागलेल्या महाभयंकर आगीच्या दुर्घटनेत कर्तव्यावर असतांना मृत्युमुखी पडलेले मुख्यमंत्री सचिवालयातील कर्मचारी मोहन मोरे आणि कामानिमित्त आलेले निवृत्त चोपदार तुकाराम मोरे यांच्या कुटुंबियांची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वतीने आज मुख्यमंत्र्यांचे सहसचिव दत्तात्रय थोरात, विशेष कार्य अधिकारी डॉ. प्रमोद शिंदे आणि स्वीय सहाय्यक गजानन आवलकर यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि कुटुंबियांचे सांत्वन केले.
   आगीच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले स्व. मोहन मोरे यांच्या मीरा रोड येथील निवासस्थानी जाऊन श्री. थोरात यांनी त्यांची पत्नी, मुलगा संकेत आणि मुलगी यांचे सांत्वन केले. तसेच, स्व. तुकाराम मोरे यांच्या विरार येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या पत्नी, मुलगा शाम आणि दोन मुली यांचे सांत्वन केले. या दुर्घटनेमुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात मुख्यमंत्री व्यस्त राहिल्यामुळे त्यांना मोरे कुटुंबियांची भेट घेणे शक्य झाले नाही. तथापि, परिस्थिती थोडीशी पूर्वपदावर येताच मुख्यमंत्री स्वत: या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. मोरे कुटुंबियांच्या दु:खात संपूर्ण मंत्रिमंडळ आणि राज्याचे प्रशासन सहभागी आहे. मोरे कुटुंबियांना शक्य ती सर्व मदत मुख्यमंत्र्यांच्यावतीने लवकरच जाहीर केली जाईल व संपूर्ण प्रशासन त्यांच्या पाठीशी राहील, याची ग्वाही श्री.थोरात यांनी कुटुंबियांना दिली.
0 0 0 0