शनिवार, २३ जून, २०१२



मुख्यमंत्र्यांनी केली श्री.भुजबळ यांच्यासमवेत मंत्रालयाची पाहणी
राज्याचे प्रशासन नव्या जोमाने
फिनिक्स पक्ष्याप्रमाणे उभे राहील
                                         -- मुख्यमंत्री

   मुंबई, दि. 23 : आगीच्या आपत्तीमुळे मंत्रालयाचे तीन मजले भस्मसात झाले असले तरी या राखेच्या ढिगाऱ्यातूनच राज्याचे प्रशासन नव्या जोमाने आणि उभारीने फिनिक्स पक्ष्याप्रमाणे उभे राहील, असा ठाम आत्मविश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज व्यक्त केला.
   मुख्यमंत्री श्री. चव्हाण आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी आज सायंकाळी मंत्रालयाच्या सर्व मजल्यांची पाहणी केली त्यानंतर ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अजितकुमार जैन, सचिव आशिषकुमार सिंह, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव शामल मुखर्जी, अधिक्षक अभियंता उल्हास देबडवार, विद्युत विभागाचे मुख्य अभियंता वळेकर, मुख्य अग्निशमन अधिकारी एस.व्ही.जोशी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी पी.एस.रहांदळे व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
   श्री. चव्हाण यांनी आज विधानभवनातील मुख्यमंत्री कार्यालयात दिवसभर थांबून कामकाज पाहिले. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. तसेच नवीन प्रशासकीय भवनातील दुसऱ्या मजल्यावर सुरु केलेल्या मुख्य सचिव कार्यालयात वरिष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन आगीच्या दुर्घटनेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर सायंकाळी 4 ते 5 या वेळात त्यांनी मंत्रालयातील तळमजल्यापासून सहाव्या मजल्यापर्यंत सर्व मजल्यांची पाहणी केली.
   मंत्रालयाच्या तळमजला ते तिसऱ्या मजल्यापर्यंत सर्व कार्यालये व तेथील साहित्य सुरक्षित आहे. मात्र आग विझवतांना मारलेले पाणी या मजल्यांवर आल्यामुळे सर्वत्र ओल आली आहे. ती साफ करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या चार मजल्यांचा विद्युत पुरवठा उद्या सायंकाळपर्यंत सुरु करण्यात यश येईल. त्यामुळे या मजल्यांवरील सर्व कार्यालयांमध्ये कामकाज सुरु करण्यास कोणतीही अडचण येणार नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
   चार, पाच व सहा या मजल्यांवरील सर्व साहित्य भस्मसात झाले असले तरी इमारतीचे स्ट्रक्चर उत्तम स्थितीमध्ये असल्याचा निर्वाळा तज्ज्ञांनी दिला आहे. जळालेले सर्व सामान काढण्याचे कामही युद्धपातळीवर सुरु आहे.  मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे कार्यालय मंत्रालयाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावर जागा उपलब्ध करुन लवकरात लवकर सुरु करण्याचा मनोदय मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखविला.
0 0 0 0



स्व.मोहन मोरे व स्व.तुकाराम मोरे
यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

   मुंबई, दि.23 : मंत्रालयात गुरुवारी लागलेल्या महाभयंकर आगीच्या दुर्घटनेत कर्तव्यावर असतांना मृत्युमुखी पडलेले मुख्यमंत्री सचिवालयातील कर्मचारी मोहन मोरे आणि कामानिमित्त आलेले निवृत्त चोपदार तुकाराम मोरे यांच्या कुटुंबियांची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या वतीने आज मुख्यमंत्र्यांचे सहसचिव दत्तात्रय थोरात, विशेष कार्य अधिकारी डॉ. प्रमोद शिंदे आणि स्वीय सहाय्यक गजानन आवलकर यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि कुटुंबियांचे सांत्वन केले.
   आगीच्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले स्व. मोहन मोरे यांच्या मीरा रोड येथील निवासस्थानी जाऊन श्री. थोरात यांनी त्यांची पत्नी, मुलगा संकेत आणि मुलगी यांचे सांत्वन केले. तसेच, स्व. तुकाराम मोरे यांच्या विरार येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या पत्नी, मुलगा शाम आणि दोन मुली यांचे सांत्वन केले. या दुर्घटनेमुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यात मुख्यमंत्री व्यस्त राहिल्यामुळे त्यांना मोरे कुटुंबियांची भेट घेणे शक्य झाले नाही. तथापि, परिस्थिती थोडीशी पूर्वपदावर येताच मुख्यमंत्री स्वत: या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. मोरे कुटुंबियांच्या दु:खात संपूर्ण मंत्रिमंडळ आणि राज्याचे प्रशासन सहभागी आहे. मोरे कुटुंबियांना शक्य ती सर्व मदत मुख्यमंत्र्यांच्यावतीने लवकरच जाहीर केली जाईल व संपूर्ण प्रशासन त्यांच्या पाठीशी राहील, याची ग्वाही श्री.थोरात यांनी कुटुंबियांना दिली.
0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा