शनिवार, १५ मार्च, २०१४


वाढदिवस साजरा न करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय
फ्लेक्स, बॅनर्स न लावता गारपीटग्रस्तांना
मदत करण्याचे हितचिंतकांना आवाहन
मुंबई, दि. 15 : राज्यात गारपीटीमुळे निर्माण झालेली गंभीर समस्या लक्षात घेऊन यावर्षी आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला आहे. श्री. चव्हाण आपल्या वाढदिवशी, दि. 17 मार्च रोजी मुंबईमध्ये उपलब्ध नसतील. वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचे फ्लेक्स, बॅनर्स, जाहिराती, पुष्पहार व गुच्छ यावर खर्च न करता ती रक्कम गारपीटग्रस्तांची मदत करण्यात खर्च करावी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
        याबाबत आज प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री. चव्हाण यांनी म्हटले आहे की, गेली दोन वर्षे राज्यात सलग भीषण दुष्काळाचे संकट आले होते. यातून शेतकरी सावरतो न सावरतो, तोच गारपीटीने त्याला उद्ध्वस्त केले आहे. राज्यातील ही परिस्थिती लक्षात घेता वाढदिवसासारखा समारंभ करणे औचित्याला धरुन होणार नाही. त्यामुळे हा निर्णय घेतला असुन हितचिंतकांनी गारपीटग्रस्तांची मदत करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही श्री. चव्हाण यांनी केले आहे.
00000000

          बहुमुखी प्रतिभेचा अष्टपैलू कलावंत गमावला :मुख्यमंत्री         
मुंबई, दिनांक 15: ज्येष्ठ गीतकार व कवी सुधीर मोघे यांच्या निधनाने महाराष्ट्राने बहुमुखी प्रतिभेचा एक अष्टपैलू कलावंत गमावला असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री  पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
आपल्या शोकसंदेशात मुख्यमंत्री म्हणतात, सुधीर मोघे यांच्या भावस्पर्शी गीतांना मराठी मनाच्या भावविश्वात आगळेवेगळे स्थान आहे. अनेक चित्रपटातून अजरामर ठरलेली त्यांची गीते आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. त्यांची प्रतिभा केवळ गीतलेखनापुरती मर्यादित नव्हती. ते तितकेच प्रतिभासंपन्न संगीतकारही होते. पटकथालेखन असो वा संवादलेखन, त्यांनी विविध क्षेत्रात आपला वेगळा व स्वतंत्र ठसा उमटवला होता. यासोबतच रंगमंचीय अविष्कारही ते तेवढ्याच समर्थपणे करत. सर्वोत्कृष्ट गीतलेखनासाठीचा राज्य शासनाचा पुरस्कार त्यांनी चार वेळा पटकावला होता. त्यांची उणीव मराठी रसिकांना चित्रपटसृष्टीला सदैव जाणवेल.
                                 ---------------------- 

शनिवार, १ मार्च, २०१४

चितळे समितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर
मुंबई, दि. 1 : जलतज्ज्ञ माधव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या विशेष चौकशी समितीचा अहवाल आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सादर करण्यात आला. ही समिती विविध पाटबंधारे विकास महामंडळातील सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रस्ताव, सिंचन क्षमता व सिंचित क्षेत्र यांच्या तपासणीसाठी 31 डिसेंबर 2012च्या शासन निर्णयानुसार स्थापन करण्यात आली होती.
माधव चितळे यांनी आज मुख्यमंत्र्यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेऊन हा अहवाल दिला. तो दोन खंडात असून 1361 पानी आहे. या अहवालाची सारांश टिपणी (Executive Summery) सादर करण्यासाठी श्री. चितळे यांनी 15 दिवसांची मुदत वाढ देण्याची केलेली विनंती मुख्यमंत्र्यांनी मान्य केली. आज अहवाल सादर करते वेळी समितीचे सदस्य ए. के. डी. जाधव, वि. म. रानडे, कृष्णा लव्हेकर, हे सदस्य उपस्थित होते.
पार्श्वभूमी :
·              विशेष चौकशीची मुदत सुरवातीला जून 2013 अखेरपर्यंत होती.
·              त्यानंतर या चौकशी समितीला प्रथम 31 डिसेंबर 2013 आणि त्यानंतर 28 फेब्रुवारी 2014 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.
·              या समितीच्या एकूण 30 बैठका झाल्या.
·              समितीने 19 पाटबंधारे प्रकल्पांना भेटी दिल्या. त्याचप्रमाणे लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, शासकीय अधिकारी यांच्याशी चर्चा केली.

00000