बुधवार, ९ ऑक्टोबर, २०१३

मंत्रिमंडळ निर्णय
इंदिरा आवास योजनेत घरकुलांसाठीचे अर्थसहाय्य वाढविले
 निर्णय :  इंदिरा आवास योजनेतील घरकुलाची किंमत एक लाख रुपये करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने घेतला. केंद्र शासनाने घरकुलांचे अनुदान 45 हजार रुपयांवरुन 70 हजार रुपये इतके केले आहे. त्याअनुषंगाने राज्य शासनाने आपल्या हिश्याव्यतिरिक्त 25 हजार रुपये प्रति घरकूल अतिरिक्त अनुदान मंजूर करण्याचा निर्णयही झाला. केंद्र शासनाने प्रति घरकुल निश्चित केलेले अनुदान 70 हजार रुपये, राज्याचा अतिरिक्त हिस्सा 25 हजार रुपये आणि  मजुरीच्या स्वरूपात लाभार्थी हिस्सा पाच हजार अशी मिळून राज्यातील ग्रामीण भागातील घरकुलांची  किंमत एकूण एक लाख रुपये निश्चित करण्यात आली. 
निर्णयाचा लाभ :  या निर्णयाचा लाभ ग्रामीण भागातील मुक्त वेठबिगार,  दारिद्र्य रेषेखालील बिगर अनुसुचित जाती जमाती, अल्पसंख्याक व सर्वसाधारण घटकातील दारिद्र्यरेषेखालील बेघर/कच्चे घर असलेल्या लाभार्थ्यांना मिळेल.  
पार्श्वभूमी : केंद्र शासनाने 1 एप्रिल 2013 पासून इंदिरा आवास योजनेच्या घरकुलाची किंमत  70 हजार रुपये इतकी केली आहे.  हे लक्षात घेता व बांधकाम साहित्य आणि मजुरीमध्ये वाढ झाल्याने घरकुलाच्या अनुदानात वाढ करण्याची मागणी लोकप्रतिनिधी, तसेच लाभधारकांकडून करण्यात येत होती.  ही बाब विचारात घेता 2013-14 या वर्षापासून अतिरिक्त अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. 
            महाराष्ट्र राज्य हे अशा प्रकारचे अतिरिक्त अनुदान देणारे देशातील निवडक राज्यांपैकी एक आहे.
-----०-----
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील अधिकाऱ्यांची पदे लोकसेवा आयोगामार्फत भरणार
 निर्णय : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील गट-अ व गट-ब मधील पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाने घेतला.
निर्णयाचा लाभ : या निर्णयामुळे महासंचालनालयातील सरळ सेवेच्या कोट्यातील गट अ मधील संचालक (माहिती),  उपसंचालक (माहिती), उपसंचालक (प्रदर्शने), वरिष्ठ सहाय्यक संचालक/ जिल्हा माहिती अधिकारी/ वरिष्ठ उप संपादक/जनसंपर्क अधिकारी, संशोधन अधिकारी, तसेच गट ब मधील अधिपरीक्षक (पुस्तके व प्रकाशने), सहाय्यक संचालक (माहिती) आणि माहिती अधिकारी ही पदे आयोगामार्फत भरण्यात येतील.
पार्श्वभूमी : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील उपरोक्त पदे ही सेवाप्रवेश नियमाप्रमाणे सरळसेवेने आणि पदोन्नतीने भरण्यात येतात.  प्रचलित नियमानुसार लोकसेवा आयोगाच्या कक्षेतून त्यांना वगळण्यात आले आहे.  राज्य शासनातील अन्य सर्व विभागांची गट अ आणि गट ब संवर्गातील राजपत्रित पदे लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येतात.  त्यामुळे महासंचालनालयाच्या या पदांनाही आयोगाच्या कार्यकक्षेत आणण्याबाबत मंत्रिमंडळाने मान्यता दिली. 
            या निर्णयानुसार सामान्य प्रशासन विभागामार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोग (विचारविनिमयातून सूट) विनियम, 1965 च्या परिशिष्टामध्ये आवश्यक सुधारणा करण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
----0----
       पिण्याच्या पाण्याच्या 5 प्रस्तावांना मंजुरी
निर्णय :
        जलसंपदा विभागाच्या प्रकल्पातून घरगुती पिण्याच्या पाण्याच्या 5 प्रस्तावांना आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत  मान्यता देण्यात आली.   हे प्रस्ताव पुढील प्रमाणे आहेत.

अ.क्र.
पाणी आरक्षणाची मागणी  करणा-या संस्थेचे नांव
पाणी मागणी (दलघमी)
पाणी वापराचा प्रकार
(घरगुती)
जलाशयाचे नाव
मंजूर केलेले  पाणी आरक्षण(दलघमी)
1
2
3
4
5
6
1
वाढीव  औसा पाणी पुरवठा योजना नगर परिषद औसा ता. औसा जि.लातुर
2.83
घरगुती
निम्न तेरणा प्रकल्प
2.83
2
राष्ट्रीय पेयजल योजना संख,ता.जत,जि.सांगली गावच्या 9 वाडी वस्तीसाठी नवीन नळ पाणी पुरवठा  योजना
0.1771
घरगुती
भिवर्गी ल.पा. तलाव
0.1771
3
राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम अंतर्गत पाथरवाडी चुकारवाडी पाणी पुरवठा योजना ता. रेणापूर जि.लातूर
0.0411
घरगुती
पाथरवाडी साठवण तलाव
0.0411
4
राष्ट्रीय पेयजल योजना बाज,ता.जत.जि.सांगली येथील नवीन नळ पाणी पुरवठा योजना
0.2357
घरगुती
बेळुंखी  ल.पा.तलाव
0.2357
5
पुरक पांगरी नळ पाणी  पुरवठा  योजना ता. बार्शी,जि.सोलापूर
0.22
घरगुती
पाथरी ल.पा.प्रकल्प
0.22

----०----
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदांना निवडश्रेणी लागू करण्याचा निर्णय
 निर्णय :
        अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संवर्गातील  त्या त्या वेळी मंजूर पदांपैकी 33.33% पदे निवडश्रेणीत रुपांतरीत करण्यास आज मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्याचप्रमाणे उप मुख्य कार्यकारी अधिकारी संवर्गातील मंजूर पदांपैकी 20% पदांऐवजी 33.33% पदे देखील निवडश्रेणीत रुपांतरीत करण्यास मान्यता देण्यात आली.
निर्णयाचा लाभ :
            ग्राम विकास विभागाअंतर्गत महाराष्ट्र विकास सेवेतील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी / उप आयुक्त / प्रकल्प संचालक संवर्गातील अधिकाऱ्यांना आणि उप मुख्य कार्यकारी अधिकारी / गट विकास अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळेल.
पार्श्वभूमी :
            महाराष्ट्र विकास सेवेतील उप मुख्य कार्यकारी अधिकारी / गट विकास अधिकारी संवर्गातील काही अधिकाऱ्यांना पद उपलब्धतेनुसार 8 ते 12 वर्षांनंतर निवडश्रेणी उप मुख्य कार्यकारी अधिकारी ही वेतनश्रेणी  (वेतनश्रेणी रुपये 15600-39100 ग्रेड पे 6600) मिळते आणि त्यानंतर 6 ते 7 वर्षांनंतर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संवर्गातील पदावर पदोन्नती मिळते.  त्यानंतर महाराष्ट्र विकास सेवेतील अधिकाऱ्यांना पुढे कोणतीही पदोन्नतीची संधी उपलब्ध नाही. त्यामुळे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी या संवर्गातील कुंठीतता दूर करण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संवर्गातील मंजूर पदांच्या 33.33% पदांना निवडश्रेणी वेतनश्रेणी (वेतनश्रेणी रुपये 37400-67000 ग्रेड पे 8700) मंजूर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. तसेच, उप मुख्य कार्यकारी अधिकारी संवर्गातील कुंठीतता दूर करण्यासाठी सदर संवर्गातील मंजूर पदांच्या 20% ऐवजी 33.33% पदांना निवडश्रेणी वेतनश्रेणी (वेतनश्रेणी रुपये 15600-39100 ग्रेड पे 6600) मंजूर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.
------०-----
राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयासाठी पदांना मंजुरी
 निर्णय : कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय या संस्थेसाठी एकूण 69 पदे नव्याने निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली. या पदांसाठी 3 कोटी 6 लाख 82 हजार असा वार्षिक खर्च येईल.
निर्णयाचा लाभ : या संस्थेत हृदयरोग शस्त्रक्रीया विभागासाठी 27, हृदयरोग चिकित्सा विभागासाठी 25, रक्तपेढी विभागासाठी 17 अशी एकूण 69 पदे निर्माण करण्यात येतील.  यामध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक तसेच प्रयोगशाळा सहाय्यक, कनिष्ठ लिपिक, अधिपरिचारिका अशी पदे आहेत. ही पदे निर्माण आरोग्यसेवा अधिक सक्षम होण्यास मदत होईल.
पार्श्वभूमी : कोल्हापूर येथील ही संस्था आरोग्य सेवा विभागाकडून वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाकडे ऑक्टोबर 2007 मध्ये हस्तांतरीत झाली आहे.  महाविद्यालयाच्या निरनिराळ्या विभागांमार्फत रुग्णांना देण्यात येणाऱ्या सेवांचा विचार करता उपलब्ध कर्मचारी अपुरे असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.
------०------
आदिवासी विकास विभागाच्या अंमलबजावणी यंत्रणेची पुनर्रचना; नवीन पदांना मंजुरी
 निर्णय : आदिवासी विकास विभागाच्या अंमलबजावणी यंत्रणेची पुनर्रचना करून नवीन पदे मंजूर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. या निर्णयामुळे शिक्षण कक्ष बळकटीकरणासाठी 849 पदे, प्रत्येक अनुदानित आश्रमशाळांसाठी एक स्त्री अधीक्षक अशी 556 पदे,  त्याचप्रमाणे अनुदानित आश्रमशाळांसाठी पहारेकरी आणि सुरक्षा रक्षकांची 556 पदे अशी एकंदर 1961 पदे निर्माण करण्यात येतील. यासाठी एकूण 36 कोटी 65 लाख एवढा आर्थिक भार येईल.
निर्णयाची पार्श्वभूमी : आश्रमशाळेच्या व्यवस्थापनावर लक्ष ठेवणे, मुलांसाठी अन्नधान्य व इतर साहित्यांचा पुरवठा वेळेवर करणे, आश्रमशाळांची दुरुस्ती या बाबींवर लक्ष ठेवणे प्रकल्प अधिकाऱ्यांना अडचणीचे होत होते.  मुंबई उच्च न्यायालयाने या संदर्भातील याचिकेवर दिलेल्या आदेशानुसार प्रशासकीय यंत्रणेची पुनर्रचना करण्याचा निर्णय झाला.  यावर मंत्रिमंडळ उपसमिती देखिल स्थापन करण्यात आली होती. 
सध्या विभागाच्या नियंत्रणाखाली 552 शासकीय आश्रमशाळा, 556 अनुदानित आश्रमशाळा आणि 476 आदिवासी मुला-मुलींची वसतीगृहे आहेत.
------०------
नागपूर येथे महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी स्थापन करण्यास मान्यता
 निर्णय : औरंगाबाद आणि मुंबई पाठोपाठ नागपूर येथे देखील महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी स्थापन करण्याचा निर्णय आज घेण्यात आला.  या युनिव्हर्सिटीसाठी 204 कोटी रुपये अनावर्ती तसेच 7 कोटी 20 लाख आवर्ती खर्च अपेक्षित आहे. 
निर्णयाची पार्श्वभूमी : कायद्याच्या क्षेत्रात नागपूरचे महत्व अनन्यसाधारण आहे. नागपूरने देशाला अनेक कायदेपंडितांची देणगी दिली आहे.  हे शहर देशाचे मध्यवर्ती ठिकाण असल्याने नागपूर येथे महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी स्थापन करण्यास यापूर्वीच तत्वत: मान्यता देण्यात आली होती. या युनिव्हर्सिटीत विद्यार्थ्यांची संख्या 100 ते 120 अशी असेल व इतर राज्यातील व परदेशातील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या आधारे जास्तीत जास्त शुल्क आकारले जाईल.
------०-----
विदर्भ सधन सिंचन विकास कार्यक्रमाकरिता नवीन मुख्य अभियंता कार्यालय स्थापन करणार
 निर्णय : नागपूर व अमरावती विभागात 2012-2013 ते 2016-2017 या 5 वर्षाच्या कालावधीत विदर्भ सधन सिंचन विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी एक स्वतंत्र मुख्य अभियंता कार्यालय नागपूर येथे सुरु करण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
निर्णयाचा लाभ : सद्या या कार्यक्रमातंर्गत सर्व तांत्रिक बाबी  पुणे येथील मुख्य अभियंता यांच्या कार्यालयामार्फत हाताळल्या जात आहेत.  विदर्भ सधन सिंचन विकास योजनेमुळे कामांची व्याप्ती फार मोठ्या प्रमाणावर वाढलेली असल्याने तेथे स्वतंत्र मुख्य अभियंता कार्यालय स्थापन करण्याने कामांना गती मिळणार आहे.  या कार्यालयात मुख्य अभियंता यांच्या व्यतिरिक्त इतर 6 अन्य पदे देखील निर्माण करण्यात आली आहेत.

-----०-----

शनिवार, ५ ऑक्टोबर, २०१३

चितळे समितीच्या कार्यकक्षेत बदलाचा प्रश्नच नाही
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे स्पष्टीकरण
मुंबई, दि. ५ : राज्यातील सिंचन प्रकल्पांच्या सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्तावांची व अन्य बाबींची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या डॉ. माधवराव चितळे विशेष चौकशी समितीची कार्यकक्षा यापूर्वीच निश्चित करण्यात आली आहे. तिच्यापासून बाजुला जाण्याचा किंवा त्यात बदल करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,  असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
याबाबत प्रसारमाध्यमांमघ्ये गेले काही दिवस येत असलेल्या वृत्तांमुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांनी हे निवेदन प्रसिद्धीसाठी दिले आहे.
जलसंपदा विभागाच्या दि. ३१ डिसेंबर २०१२च्या शासन निर्णयात ‘सदर चौकशीत अनियमितता झाल्याचे आढळल्यास त्याबाबत जबाबदारी निश्चित करणे व योग्य कारवाई सूचविणे’ असे कार्यकक्षा परिच्छेद क्र. २.९ मध्ये म्हटले आहे.
राज्यातील सिंचनक्षमता व उपसा सिंचन योजनांची उपयुक्तता वाढविण्यासाठी उपाययोजना सुचविणे, प्रकल्पांच्या गुणवत्ता वाढीसाठी उपाय सुचविणे, प्रकल्प ठरलेल्या मुदतीत व खर्चात पुर्ण करण्यासाठी काय करता येईल, ते सूचविणे, अशा अनेक बाबींचाही समितीच्या कार्यकक्षेत समावेश आहे. राज्याच्या हिताच्यादृष्टीने भविष्यकालिन नियोजन आणि दिशाही महत्वाची आहे, असे श्री. चव्हाण यांनी म्हटले आहे.
यासंबंधी एका जनहित याचिकेच्या अलिकडेच झालेल्या सुनावणीत राज्याच्या महाअधिवक्त्यांनी असे स्पष्ट केले आहे की, ‘चितळे समितीला अन्य स्त्रोतांकडून माहिती मिळविण्यास शासन निर्णय प्रतिबंध करीत नाही. विशेष चौकशी समिती जलसंपदा विभाग किंवा पाटबंधारे विभागाची महामंडळे यांच्याकडून योग्य वाटेल ती माहिती मागवू शकते. तसेच शासनाचे विभाग किंवा महामंडळे यांच्याव्यतिरिक्त अन्य व्यक्तीकडूनही माहिती मागविण्याची समितीला मुभा आहे.’
                                    0000                                          (पूर्ण)


माहितीसाठी पार्श्वभूमी :
विधीमंडळाच्या नागपूर येथील २०१२च्या हिवाळी अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांबाबत व राज्याच्या सिंचन क्षमतेबाबत विस्तृत चर्चा झाली. विरोधी पक्षांनी याबाबत केलेल्या चौकशीच्या  मागणीनंतर राज्य सरकारने या समितीची स्थापना केली. ही समिती  डॉ. माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आली असून श्री. ए. के.डी. जाधव, सेवानिवृत्त अति. मुख्य सचिव – वित्त, श्री. कृष्णा लव्हेकर, सेवानिवृत्त आयुक्त – कृषि, श्री. वि. म. रानडे, सेवानिवृत्त सचिव – लाभक्षेत्र विकास, जलसंपदा विभाग यांची सदस्य म्हणुन नेमणूक करण्यात आली आहे. या समितीची रचना, कार्यकक्षा स्पष्ट करणारा शासन निर्णय दि. ३१ डिसेंबर २०१२ रोजी जलसंपदा विभागाने काढला. हा शासन निर्णय स्वयंस्पष्ट असून त्यात समितीची कार्यकक्षा स्पष्ट शब्दात मुद्देसुदपणे सागितली आहे. ती पुढीलप्रमाणे :
(2) समितीची कार्यकक्षा :
2.1)        निर्मित सिंचन क्षमता व प्रत्यक्ष सिंचीत क्षेत्र तसेच बिगर सिंचन पाणी वापर याची तपासणी करणे, प्रत्यक्ष सिंचित क्षेत्रापैकी विहिरीद्वारे, शेततळ्यांद्वारे, जलसंधारण विभागामार्फत व जलसंपदा विभागामार्फत प्रत्यक्ष सिंचित क्षेत्र कमी असण्याची कारणे तपासणे.
2.2)       महामंडळांनी सुधारित प्रशासकीय मान्यता दिलेल्या प्रकल्पांच्या किंमतीतील वाढ व त्याची कारणे प्रचलित नियम व अधिकारानुसार सुसंगत असल्याची तपासणी करणे.
2.3)       प्रकल्पांच्या विलंबांच्या कारणांची तपासणी करणे.
2.4)      मूळ प्रशासकीय मान्यतेच्या तुलनेत प्रकल्पांच्या व्याप्तीमध्ये झालेल्या बदलाची कारणमिमांसा तपासणे व अशा व्याप्ती बदलामुळे किंमतीत झालेल्या वाढीची तपासणी करणे.
2.5)       उपसा सिंचन योजनांची उपयुक्तता वाढविण्यासाठी उपाययोजना सुचविणे.
2.6)       जलसंपदा विभागातील प्रकल्प कामांच्या गुणवत्ता वाढीसाठी (Quality Enhancement) उपाययोजना सुचविणे.
2.7)      प्रकल्प ठरलेल्या मुदतीत व खर्चात पूर्ण करण्याकरिता उपाययोजना सुचविणे.
2.8)       सिंचन क्षेत्रात वाढ होण्यासाठी उपाययोजना सुचविणे.
2.9)        सदर चौकशीत अनियमितता झाल्याचे आढळल्यास त्याबाबत जबाबदारी निश्चित करणे व योग्य कारवाई सूचविणे.
                                                     0000
·        संदर्भ : शासन निर्णय क्र.सुप्रमा २०१२/(७१८/२०१२)/मोप्र-२, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई – ४०००३२. दि. ३१ डिसेंबर २०१२. 
·        मा. उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल झालेल्या श्री. घाटूळे विरूद्ध महाराष्ट्र शासन (जनहित याचिका क्र. 165/2012) या जनहित याचिकेच्या अलिकडैच झालेल्या सुनावणीवेळी राज्याच्या महाअधिवक्ता (ॲडव्होकेट जनरल) यांनी केलेले निवेदन.
·        अधिक माहितीसाठी संपर्क : मा. मुख्यमंत्री यांचे जनसंपर्क अधिकारी.                                            

                                                   ०००००

मंगळवार, १ ऑक्टोबर, २०१३

 विदर्भातील मागासलेपणा दूर करण्यासाठी
औद्योगिक विकासाला प्रोत्साहन - पृथ्वीराज चव्हाण
   अमरावती दि. 1:- महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रात स्वयमपूर्ण करण्याचे काम हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यानी केले असून त्यानी घेतेलेल्या निर्णयाचा अभ्यास करुन राज्याच्या समतोल विकासाचे धोरण स्विकारताना विदर्भातील मागासलेपणा दूर करतानाच औद्योगिक विकासाला प्रोत्साहन देण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हा यांनी आज येथे केले.
          महाराष्ट्र विधान मंडळाच्या विद्यमानाने स्व. वसंतराव नाईक जन्मशताब्दी वर्षानिमित्त विभागीय स्तरावरील परिसंवाद व प्रदर्शन कार्यक्रम संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रंसगी मुख्यमंत्री बोलत होते.  
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख होते तर प्रमुख पाहूणे म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.  व्यासपीठावर   विधानसभाचे उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके, अन्न व औषध प्रशासन मंत्री मनोहरराव नाईक, कृषी मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार आनंदराव अडसूळ, आमदार सर्वश्री विरेन्द्र जगताप, रवि राणा, रावसाहेब शेखावत, केवलराम काळे, संदीप बाजोरीया, श्री. खोटरे, प्रकाश डहाके, प्रवीण पोटे, गिरीष बापट, अभिजीत अडसूळ, विभागीय आयुक्त डी. आर. बनसोड, विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, महापौर वंदना कंगाले, जिल्हा परिषद अध्यक्षा सुरेखाताई ठाकरे, माजी खासदार सदाशिवराव ठाकरे, विधानमंडळाचे अतिरिक्त सचिव उत्तमसिंह चव्हाण आदि लोकप्रतिनिधी, प्रगतीशील शेतकरी, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
विदर्भ, मराठवाड्याचा मागासलेपणाचा  अभ्यास करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या विजय केळकर समितीचा अहवाल येत्या एक महिन्यात प्राप्त होणार असून अहवालातील  शिफारसीचा   अभ्यास करुन शिफारसींची अंमलबजावणी करण्यात येईल, असे  मुख्यमंत्री म्हणाले.
 राज्यासमोर कोरडवाहू शेतीचा शाश्वत विकास व सहकार चळवळीचे बळकटीकरण करण्याचे आव्हान असल्याचे सांगून  सिंचनाच्या सुविधा वाढविण्यासाठी विकेंद्रीत जलसाठे निर्माण करण्याची आवश्यकता आहे. 1972 मध्ये  राज्यात भीषण दुष्काळ पडला असताना तत्कालीन मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांनी दुष्काळावर मात करण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेताना प्रत्येक हाताला काम मिळावे यासाठी रोजगार हमी योजना राबविली. त्यासोबतच पाणी साठविण्यासाठी जलसंधारणाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबवून राज्याला दुष्काळी परिस्थितीतून बाहेर काढतानाच अन्न् धान्याच्या बाबतीतही स्वयंपूर्ण केले. या त्यांच्या निर्णयामुळे महाराष्ट्राला सुजलाम - सुफलाम करण्यासाठी नवी दिशा मिळाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
  ते पुढे म्हणाले, पाणी हे सार्वजनिक मालमत्ता आहे. त्यामुळे त्याचे न्याय्य पद्धतीने वापर करणे आवश्यक असल्यामुळे पुढील तीन वर्षात ऊस उत्पादकांनी ठिबक पद्धतीचा वापर करुन पाणी वाचविण्याला प्राधान्य देण्याची सूचनाही त्यांनी केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी वसंतराव नाईक यांनी पंचायत राज संकल्पना प्रत्यक्ष राबविली. त्यामुळे सत्तेचे विकेंद्रीकरण होऊन सशक्त महाराष्ट्र घडविण्यास मदत झाली आहे.  विदर्भातील मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन होत असतानाच येथेच प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी सहकारी कायद्यात सुधारणा सुचविण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना दुग्धव्यवसायासोबतच शेती व्यवसायालाही प्रोत्साहन मिळावे यासाठी पतधोरणामध्ये बदल करून राष्ट्रीयकृत बँकामार्फत जास्तीत जास्त पतपुरवठा करण्यात येत आहे.  

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले, की  राज्यातील शेतकरी आणि शेती दोन्हीही जगले पाहिजे. त्यासोबतच औद्योगिक विकासही व्हावा. यासाठी वसंतराव नाईक यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली. शेतकरी हा त्यांचा श्वास होता, तर शेती हा वसंतराव नाईक यांचा प्राण होता. त्यांच्या कार्याची कायम आठवण ठेवून महाराष्ट्राला प्रगती पथावर नेण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.  
शासनाने जन्मशताब्दी सोहळ्यासाठी अर्थसंकल्पात 100 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री म्हणाले, नवीन पिढीने त्यांच्या कार्यातून प्ररेणा घेऊन आधुनिक पद्धतीने शेती करायला हवी. तसेच शेतकऱ्यांचा प्रतिनिधी कसा असावा, याचा आदर्श त्यांनी राज्यासमोर ठेवला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शेतकरी कधीही त्यांना विसरणार नाही, असेही आपल्या भाषणात त्यांनी यावेळी सांगितले.
 विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांनी स्व. वसंतराव नाईक यांनी सामान्य कार्यकर्त्याविषयी असलेली तळमळ व्यक्त केली.  वसंतराव नाईक यांचे कार्य आणि सामाजिक बांधिलकी, दुष्काळाचा सामना कसा करावा याचे उत्कृष्ट मार्गदर्शन केले असून अन्नधान्यामध्ये राज्य्‍ स्वयंपूर्ण व्हावे, यासाठी हायब्रीड ज्वारीचे संशोधन व त्याचे उत्पादन घेऊन देशासमोर आदर्श निर्माण केला होता. विदर्भाच्या विकासाला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले असून कृषी, सिंचन, सहकार आदी क्षेत्रात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचेही यावेळी त्यांनी सांतिगले.


प्रारंभी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी वसंतराव नाईक यांच्या जीवन कार्याची माहिती देणाऱ्या लघुपटाच्या डीव्हीडीचे विमोचन मुख्यमंत्र्यांच्याहस्ते झाले. हा माहितीपट महाराष्ट्र विधानमंडळाच्यावतीने शंकर बारवे यांनी दिग्दर्शीत केला आहे. महानायक वसंत तू या चित्रपटाच्या पोष्टरचे विमोचन यावेळी करण्यात आले. या चित्रपटाची निर्मिती तुकाराम बिडकर, बळीराम राठोड, अनंत खेडकर आदी करणार आहेत.
 प्रारंभी विधानसभेचे उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके यांनी स्वागत करुन प्रास्ताविक भाषणात स्व. वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित परिसंवाद व प्रदर्शनाबाबत माहिती दिली. राज्याचे कृषी व पणन मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वसंतराव नाईक यांनी शेती व अन्नधान्याच्या क्षेत्रात नवीन क्रांती करून स्वयंपूर्ण करण्यासोबतच चार कृषी विद्यापीठांची निर्मिती केली. शेतीला जोडधंदा देऊन शेतकऱ्यांना स्वयंपूर्णतेचा संदेश दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन आमदार  यशोमतीताई ठाकूर यांनी, तर आभार प्रदर्शन आमदार  विरेंद्र जगताप यांनी केले.
                                                       ----000-----