मंगळवार, १ ऑक्टोबर, २०१३

 विदर्भातील मागासलेपणा दूर करण्यासाठी
औद्योगिक विकासाला प्रोत्साहन - पृथ्वीराज चव्हाण
   अमरावती दि. 1:- महाराष्ट्राला प्रत्येक क्षेत्रात स्वयमपूर्ण करण्याचे काम हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यानी केले असून त्यानी घेतेलेल्या निर्णयाचा अभ्यास करुन राज्याच्या समतोल विकासाचे धोरण स्विकारताना विदर्भातील मागासलेपणा दूर करतानाच औद्योगिक विकासाला प्रोत्साहन देण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हा यांनी आज येथे केले.
          महाराष्ट्र विधान मंडळाच्या विद्यमानाने स्व. वसंतराव नाईक जन्मशताब्दी वर्षानिमित्त विभागीय स्तरावरील परिसंवाद व प्रदर्शन कार्यक्रम संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रंसगी मुख्यमंत्री बोलत होते.  
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख होते तर प्रमुख पाहूणे म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.  व्यासपीठावर   विधानसभाचे उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके, अन्न व औषध प्रशासन मंत्री मनोहरराव नाईक, कृषी मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार आनंदराव अडसूळ, आमदार सर्वश्री विरेन्द्र जगताप, रवि राणा, रावसाहेब शेखावत, केवलराम काळे, संदीप बाजोरीया, श्री. खोटरे, प्रकाश डहाके, प्रवीण पोटे, गिरीष बापट, अभिजीत अडसूळ, विभागीय आयुक्त डी. आर. बनसोड, विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे, महापौर वंदना कंगाले, जिल्हा परिषद अध्यक्षा सुरेखाताई ठाकरे, माजी खासदार सदाशिवराव ठाकरे, विधानमंडळाचे अतिरिक्त सचिव उत्तमसिंह चव्हाण आदि लोकप्रतिनिधी, प्रगतीशील शेतकरी, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
विदर्भ, मराठवाड्याचा मागासलेपणाचा  अभ्यास करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या विजय केळकर समितीचा अहवाल येत्या एक महिन्यात प्राप्त होणार असून अहवालातील  शिफारसीचा   अभ्यास करुन शिफारसींची अंमलबजावणी करण्यात येईल, असे  मुख्यमंत्री म्हणाले.
 राज्यासमोर कोरडवाहू शेतीचा शाश्वत विकास व सहकार चळवळीचे बळकटीकरण करण्याचे आव्हान असल्याचे सांगून  सिंचनाच्या सुविधा वाढविण्यासाठी विकेंद्रीत जलसाठे निर्माण करण्याची आवश्यकता आहे. 1972 मध्ये  राज्यात भीषण दुष्काळ पडला असताना तत्कालीन मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांनी दुष्काळावर मात करण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय घेताना प्रत्येक हाताला काम मिळावे यासाठी रोजगार हमी योजना राबविली. त्यासोबतच पाणी साठविण्यासाठी जलसंधारणाचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबवून राज्याला दुष्काळी परिस्थितीतून बाहेर काढतानाच अन्न् धान्याच्या बाबतीतही स्वयंपूर्ण केले. या त्यांच्या निर्णयामुळे महाराष्ट्राला सुजलाम - सुफलाम करण्यासाठी नवी दिशा मिळाल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
  ते पुढे म्हणाले, पाणी हे सार्वजनिक मालमत्ता आहे. त्यामुळे त्याचे न्याय्य पद्धतीने वापर करणे आवश्यक असल्यामुळे पुढील तीन वर्षात ऊस उत्पादकांनी ठिबक पद्धतीचा वापर करुन पाणी वाचविण्याला प्राधान्य देण्याची सूचनाही त्यांनी केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी वसंतराव नाईक यांनी पंचायत राज संकल्पना प्रत्यक्ष राबविली. त्यामुळे सत्तेचे विकेंद्रीकरण होऊन सशक्त महाराष्ट्र घडविण्यास मदत झाली आहे.  विदर्भातील मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन होत असतानाच येथेच प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी सहकारी कायद्यात सुधारणा सुचविण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांना दुग्धव्यवसायासोबतच शेती व्यवसायालाही प्रोत्साहन मिळावे यासाठी पतधोरणामध्ये बदल करून राष्ट्रीयकृत बँकामार्फत जास्तीत जास्त पतपुरवठा करण्यात येत आहे.  

  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले, की  राज्यातील शेतकरी आणि शेती दोन्हीही जगले पाहिजे. त्यासोबतच औद्योगिक विकासही व्हावा. यासाठी वसंतराव नाईक यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली. शेतकरी हा त्यांचा श्वास होता, तर शेती हा वसंतराव नाईक यांचा प्राण होता. त्यांच्या कार्याची कायम आठवण ठेवून महाराष्ट्राला प्रगती पथावर नेण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.  
शासनाने जन्मशताब्दी सोहळ्यासाठी अर्थसंकल्पात 100 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री म्हणाले, नवीन पिढीने त्यांच्या कार्यातून प्ररेणा घेऊन आधुनिक पद्धतीने शेती करायला हवी. तसेच शेतकऱ्यांचा प्रतिनिधी कसा असावा, याचा आदर्श त्यांनी राज्यासमोर ठेवला आहे. त्यामुळे राज्यातील सर्व शेतकरी कधीही त्यांना विसरणार नाही, असेही आपल्या भाषणात त्यांनी यावेळी सांगितले.
 विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांनी स्व. वसंतराव नाईक यांनी सामान्य कार्यकर्त्याविषयी असलेली तळमळ व्यक्त केली.  वसंतराव नाईक यांचे कार्य आणि सामाजिक बांधिलकी, दुष्काळाचा सामना कसा करावा याचे उत्कृष्ट मार्गदर्शन केले असून अन्नधान्यामध्ये राज्य्‍ स्वयंपूर्ण व्हावे, यासाठी हायब्रीड ज्वारीचे संशोधन व त्याचे उत्पादन घेऊन देशासमोर आदर्श निर्माण केला होता. विदर्भाच्या विकासाला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले असून कृषी, सिंचन, सहकार आदी क्षेत्रात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचेही यावेळी त्यांनी सांतिगले.


प्रारंभी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी वसंतराव नाईक यांच्या जीवन कार्याची माहिती देणाऱ्या लघुपटाच्या डीव्हीडीचे विमोचन मुख्यमंत्र्यांच्याहस्ते झाले. हा माहितीपट महाराष्ट्र विधानमंडळाच्यावतीने शंकर बारवे यांनी दिग्दर्शीत केला आहे. महानायक वसंत तू या चित्रपटाच्या पोष्टरचे विमोचन यावेळी करण्यात आले. या चित्रपटाची निर्मिती तुकाराम बिडकर, बळीराम राठोड, अनंत खेडकर आदी करणार आहेत.
 प्रारंभी विधानसभेचे उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके यांनी स्वागत करुन प्रास्ताविक भाषणात स्व. वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित परिसंवाद व प्रदर्शनाबाबत माहिती दिली. राज्याचे कृषी व पणन मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वसंतराव नाईक यांनी शेती व अन्नधान्याच्या क्षेत्रात नवीन क्रांती करून स्वयंपूर्ण करण्यासोबतच चार कृषी विद्यापीठांची निर्मिती केली. शेतीला जोडधंदा देऊन शेतकऱ्यांना स्वयंपूर्णतेचा संदेश दिल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन आमदार  यशोमतीताई ठाकूर यांनी, तर आभार प्रदर्शन आमदार  विरेंद्र जगताप यांनी केले.
                                                       ----000-----


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा