सोमवार, ३ सप्टेंबर, २०१२



पाणलोट क्षेत्र विकासाच्या कामांमध्ये
ग्रामस्थांचा सहभाग मोलाचा : मुख्यमंत्री

          मुंबई, दि. 3 सप्टेंबर : राज्यावरील दुष्काळाचे संकट कायमस्वरुपी नष्ट करण्यासाठी जलसंधारणाच्या आणि पाणलोट क्षेत्र विकासाच्या कामांमध्ये ग्रामस्थांचा आणि ग्रामपंचायतींचा सहभाग खूप मोलाचा ठरणार आहे.  आदर्श गावसारख्या संकल्पनेतून विविध प्रकल्प राबवून हे करणे शक्य आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज केले.
        आदर्श गांव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष श्री.पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखालील हिवरे बाजार येथील एका शिष्टमंडळाने श्री.चव्हाण यांची आज भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.  श्री.पवार यांनी श्री.चव्हाण यांच्यासमोर टंचाईसदृश परिस्थितीत करावयाचे नियोजन आणि उपाययोजना यांच्याबाबत सादरीकरण केले.
        मुख्यमंत्री म्हणाले गेली सलग दोन वर्षे राज्याला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. फक्त महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या अनेक राज्यामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे.  पावसाचे प्रमाण प्रत्येक वर्षी कमी होत आहे आणि पाऊस पडण्याचे पारंपरिक वेळापत्रक बिघडत चालले आहे.  यामुळे पावसाचे पाणी शक्य तेथे अडवून जमिनीत जिरवणे आणि उपलब्ध पाण्याचा वापर विचारपूर्वक करणे हेच उपाय योजावे लागणार आहेत. रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जलसंधारण आणि पाणलोट विकासाची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली आहेत.  हिवरे बाजार मॉडेल म्हणून प्रसिध्द असलेले खोल सलग समपातळी चर (डीप सीसीटी) राज्यातील प्रत्येक पाणलोट क्षेत्रात खोदून पाणी संचयाचे प्रयत्न करण्याची शक्यता अजमावून पाहिली जाईल. 
        मृदसंधारण, जलसंधारण, पाणलोटांचा विकास, ठिबक सिंचनासारख्या सुक्ष्म सिंचन पध्दतींचा जास्तीत जास्त वापर, विंधन विहिरींवर व त्यांच्या खोलीवर नियंत्रण, नालाबंडिंग, सिमेंटचे पक्के बंधारे आदी उपाय योजून पाणी टंचाईवर मात करणे शक्य आहे.  मात्र, या सगळ्या प्रक्रियेत ग्रामपंचायत आणि स्थानिक ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेणे जरुरीचे आहे असे श्री.चव्हाण म्हणाले.
        श्री.पोपटराव पवार यांनी प्रत्येक पाणलोटात पर्जन्यमापक यंत्र बसविण्याची मागणी केली.  यामुळे तालुक्यात वेगवेगळ्या भागात नेमका किती पाऊस पडला याची माहिती मिळून जलसंधारणांच्या कामांचे नियोजन करणे सुलभ होईल.  पाण्याचा ताळेबंद आणि पीक नियोजन या बाबींचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करावा अशीही मागणी त्यांनी केली. 
-----0-----

मंत्रालय लोकशाही दिनी 3 अर्जांवर सुनावणी
        मुंबई, दि. 3 : खासगी संस्थेला शैक्षणिक संस्था सुरु करण्यासाठी जमीन देतांना सर्व शासकीय बाबी तपासून निर्णय घ्यावा, अशा सूचना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे दिल्या.
            दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी मंत्रालयात लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो.  आज आयोजित केलेल्या लोकशाही दिनी आलेल्या अर्जावर सुनावणी करताना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी मुख्य सचिव जयंत कुमार बाँठिया, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अजितकुमार जैन, सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव पी.एस. मीना, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव गौतम चॅटर्जी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
            शैक्षणिक संस्था सुरु करण्यासंदर्भात जमीन मिळावी या संदर्भातील अर्जावर सुनावणी करताना मुख्यमंत्री म्हणाले की, ज्या ठिकाणी जागा मागण्यात आली आहे. त्या ठिकाणी शैक्षणिक संस्था सुरु करण्याची आवश्यकता आहे का ? अर्जदारांचा प्रोजेक्ट संदर्भातील संपूर्ण प्रस्ताव तसेच अन्य बाबींची तपासणी करुन जागा देताना नियमानुसार निर्णय घ्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 
आजच्या लोकशाही दिनी एकूण तीन अर्जावर सुनावणी झाली. या पैकी दोन अर्ज महसूल विभागांसंबधी होते. तर एक अर्ज गृहनिर्माण विभागासंबंधी होता. या सर्व प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी सखोल माहिती घेतली. अर्जदारांची बाजू समजून घेतली व आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिले.
000

शनिवार, १ सप्टेंबर, २०१२



अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या
कार्याचा मुख्यमंत्र्यांकडून गौरव

          मुंबई, दि. 1: नागरी जीवन अधिक संपन्न करण्याच्या दृष्टीने नगरपालिकांच्या सेवा सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठी अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था करीत असलेले कार्य महत्त्वपूर्ण आहे असे गौरवोद्‌गार मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल येथे काढले.
          अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा (ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट) पदवीदान समारंभ काल अंधेरी येथील मेयर्स हॉलमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित झाला त्यावेळी ते बोलत होते.
          वाढत्या नागरिकरणामुळे नगरपालिका प्रशासनाला नवनवीन आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. नागरिक आपल्या हक्कांबाबत अधिक जागरुक होत आहेत. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाकडून त्यांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने नगरपालिकांच्या क्षमतावर्धनासाठी ही संस्था करीत असलेले मार्गदर्शनाचे आणि प्रशिक्षणाचे कार्य उपयुक्त असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
          अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे स्वरुप अखिल भारतीय असले तरी या संस्थेने जागतिक पातळीवर आपले स्थान निर्माण केले आहे. केवळ देशातीलच नव्हे, तर जगभरातील पालिका सदस्य व कर्मचारी या संस्थेच्या शैक्षणिक संकुलात प्रशिक्षण अथवा विचार-विनिमयासाठी येत असतात. नगर प्रशासनासाठी उपयुक्त असे विविध अभ्यासक्रम व उपक्रम संस्थेतर्फे आयोजित केले जातात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासाशी या संस्थेने आपली बांधिलकी गेल्या 86 वर्षांपासून जपली आहे.
          मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीला पदवी प्राप्त करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन या नामांकित संस्थेत त्यांनी घेतलेले प्रशिक्षण नगर नियोजनाच्या कार्यात भविष्यात उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
          या प्रसंगी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अजितकुमार जैन, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे अध्यक्ष डॉ. जतीन मोदी, महासंचालक रणजित चव्हाण, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यू.पी.एस.मदान, मुंबई ट्रान्सफॉर्मेशन सपोर्ट युनिटचे संचालक    बी.सी. खटुआ आदी मान्यवर उपस्थित होते.
* * * * * * *