मंगळवार, ३ जुलै, २०१२


इचलकरंजी येथील काविळीच्या साथीतील मृतांच्या
वारसांना दिलेले धनादेश वटले नसल्याचे वृत्त चुकीचे
फक्त एका धनादेशाबाबत बँकेकडून चूक झाल्याचे निष्पन्न

            कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी नगरपरिषद क्षेत्रात काविळीच्या साथीत दगावलेल्या 12 जणांच्या वारसांना मुख्यमंत्री मदत निधीतून द्यावयाच्या मदतनिधीसंदर्भात जिल्हा प्रशासनाने योग्य ती सर्व कार्यवाही केलेली आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या धनादेशांनुसार रक्कम संबंधितांच्या खात्यांवर जमाही झाली आहे. फक्त एका धनादेशाच्या बाबत बँकेच्या चुकीमुळे दोन लाखांऐवजी खात्यावर 20 हजार रक्कम जमा झाली होती. ती चूकही आता सुधारण्यात आली आहे, असे कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.    
याबाबत जिल्हा प्रशासनाकडेन घेतलेल्या माहितीनुसार, इचलकरंजी नगरपरिषद क्षेत्रात काविळीच्या साथीने मृत झालेल्या 12 व्यक्तींच्या वारसांना मुख्यमंत्री मदत निधीतून चौवीस लाख रुपये मंजूर झाले होते. मृतांच्या वारसांना धनादेश क्रमांक 061279 ते 061290 ने प्रत्येकी दोन लाख रुपये याप्रमाणे जिल्हा प्रशासनामार्फत हातकणं तहसिलदारांकडून 25 जून 2012 रोजी दिले आहेत. हे धनादेश भारतीय स्टेट बँकेच्या कोल्हापूर दसरा चौक शाखेचे होते. यातील काही धनादेश बँकेने 29 जून 2012 रोजी संबंधितांच्या खात्यावर जमा केले आहेत. श्री. संदेश बाजीराव आडमुठे यांच्या नांवे असलेला दोन लाख रुपयांचा धनादेश क्रमांक 061283 दिनांक 25 जून 2012 रोजी दिला होता. पण भारतीय स्टेट बँकेच्या दसरा चौक शाखेने त्यांच्या खात्यावर दोन लाखाऐवजी वीस हजार रुपये जमा केले. याबाबत बँकेच्या व्यवस्थापकांना विचारणा केली असता त्यांनी आज श्री. आडमुठे यांच्या खात्यावर दोन लाख रुपये जमा केल्याचे कळविले आहे.
000000

सोमवार, २ जुलै, २०१२


प्रा.राम बापट यांच्या निधनाने
एका ज्येष्ठ विचारवंताला मुकलो
-        मुख्यमंत्री

मुंबई, दिनांक 2 जुलै :  प्रा.राम बापट यांच्या निधनाने महाराष्ट्रातील विविध परिवर्तनवादी क्षेत्रातील एका ज्येष्ठ विचारवंताला आपण मुकलो असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री आपल्या संदेशात पुढे म्हणतात की, प्रा.बापट हे सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ मार्गदर्शक होते.  राज्यशास्त्र विभागात अधिव्याख्याता म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम केले होते.  वेगवेगळ्या विषयांचा त्यांना मोठा व्यासंग होता.  अनेक विषयात त्यांनी प्राविण्य संपादन केले होते.  साहित्य, सौंदर्यशास्त्र आणि नाट्यशास्त्र या विषयांचा त्यांचा गाढा अभ्यास होता.  राज्यातील विविध भागात असंख्य नाट्यशिबिरात त्यांनी व्याख्याने दिली होती.  नव्या पिढीतील विद्यार्थ्यांना नवा विचार देण्याचे महत्वपूर्ण कार्य त्यांनी सातत्याने केले.  त्यांच्या निधनाने नव्या पिढीला नवा विचार देणारा एक उत्तम मार्गदर्शक हरपला आहे. असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोक संदेशात शेवटी म्हटले आहे.
00000



मुख्यमंत्री रविवारी दिवसभर कार्यालयात

मुंबई, दिनांक 2 जुलै : रविवारचा सुट्टीचा दिवस असूनही मुख्यमंत्री श्री.पृथ्वीराज चव्हाण यांनी दिवसभर मंत्रालय, तसेच विधानभवन येथील कार्यालयात कामकाज पाहिले.  दिनांक 21 जूनच्या दुर्घटनेनंतर मंत्रालयातील सर्व कार्यालये पूर्वस्थितीत आणण्यासंदर्भात त्यांनी मुख्य सचिव जयंत कुमार बांठिया यांच्याशी चर्चा केली.
सकाळी 10 वाजता मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर मुख्यमंत्री चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री आणि हरितक्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली  वाहिली.  त्यानंतर विधानभवनाच्या प्रांगणातील स्व.वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.  यावेळी विधान परिषदेचे सभापती श्री.शिवाजीराव देशमुख, महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस समितीचे प्रदेशाध्यक्ष आमदार श्री.माणिकराव ठाकरे, आमदार सर्वश्री सुभाष चव्हाण, मधु चव्हाण, संजय राठोड, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्री.आशिषकुमार सिंह, डॉ.नितीन करीर उपस्थित होते.

मुख्यमंत्री चव्हाण यांनी त्यानंतर विधानभवन येथील मुख्यमंत्री कार्यालयातील शासकीय कामकाज पाहून कार्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला.  सर्वसामान्य जनतेच्या कामाला प्राधान्याने अग्रक्रम देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मंत्रालयातील दुर्घटनेची सर्वसामान्य जनतेला झळ बसणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.  तसेच येत्या 9 जुलै पासून होणाऱ्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासंदर्भात केल्या जाणाऱ्या कामकाजाची माहिती करून घेतली.

00000

विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन

राज्य शासनाच्या पाठीशी

            मुंबई, दिनांक 2 जुलै : विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष श्री. प्रफुल्ल जोशी यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र लिहून 21 जूनच्या दुर्घटनेसंदर्भात तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. मंत्रालयातील सर्व कार्यालये पूर्वस्थितीत येण्यासाठी आपण करीत असलेल्या प्रयत्नात असोसिएशनचे या कामी संपूर्ण सहकार्य राहील, असे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.

-----0-----