मंगळवार, १ मे, २०१२



नवीन वस्त्रोद्योग धोरणामुळे
11 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील
                                                                             - राज्यपाल         

मुंबई, दि. 1 : स्व.यशवंतराव चव्हाण यांची जन्मशताब्दी यावर्षी आपण साजरी करीत असून त्यांच्यासारख्या दूरदृष्टी व उत्तम प्रशासक असलेल्या थोर मुत्सद्दी व्यक्तीमुळे राज्याने विकासाच्या सर्व क्षेत्रात मोठी प्रगती केली असून शासनाने जाहीर केलेल्या नवीन वस्त्रोद्योग धोरणामुळे 11 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे गौरवोद्गार राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी आज येथे काढले.
           महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 52 व्या वर्धापन दिनानिमित्ताने दादर येथील शिवाजीपार्क मैदानात आयोजित केलेल्या ध्वजवंदन व संचलन सोहळ्यात राज्यपाल बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, राजशिष्टाचार मंत्री सुरेश शेट्टी, गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अजितकुमार जैन, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे, महापौर सुनील प्रभू, लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी, विधानपरिषद सदस्य दिवाकर रावते, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी सुमीत मलीक, वित्त विभागाचे प्रधान सचिव सुधीर श्रीवास्तव, पोलीस महासंचालक के.सुब्रम्हण्यम आदी उपस्थित होते.
           संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचे स्वप्न पाहिलेल्या आणि ते साकार करण्यासाठी झटलेल्या हुताम्यांना यावेळी राज्यपालांनी आदरांजली वाहिली व कामगारांना आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पोलीस गृह रक्षक दल, नागरी संरक्षण दल, अग्नीशमन दल, महानगरपालिका सुरक्षा दल यांच्या संयुक्त संचलनाने राज्यपालांना मानवंदना दिली.
            राज्यपाल पुढे म्हणाले की, राज्यातील काही विशिष्ट भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने शासनाने 7,753 गावांमध्ये टंचाई जाहीर केली असून सवलतीच्या दराने चारा पुरविण्यासाठी चारा केंद्र सुरु करण्यास जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. पशुधनासाठी पिण्याच्या पाण्याची पुरेशी तरतूद करण्यासाठी पावले उचलण्यात आली असून तहसीलदारांना सर्वांना पाणी पुरविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. केंद्र शासनाच्या पथकाने अलिकडेच टंचाईग्रस्त भागास दिलेल्या भेटीचा उल्लेख राज्यपालांनी यावेळी केला.
             'डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत' कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 1 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याजाने व त्यापुढील 3 लाखांपर्यंतच्या कर्जास एक टक्का व्याज आकारण्यात येणार असल्याचे सांगून राज्यपाल पुढे म्हणाले की, कापूस व कांदा निर्यातीवरील बंदी उठविण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाला विनंती केली आहे. राज्यातील कांही भागात प्रतिकूल हवामानामुळे फळपिकांच्या होणाऱ्या नुकसानीसंदर्भात शासनाने द्राक्ष, केळी, संत्री, मोसंबी,डाळिंब, आंबा आणि काजू या पिकांसाठी पीक विमा योजना कार्यान्वित करण्यात आली असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.
              राज्याने औद्योगिक क्षेत्रात फार मोठी झेप घेतली असून राष्ट्रीय उत्पादक धोरणांतर्गत राज्यात राष्ट्रीय गुंतवणूक आणि उत्पादन क्षेत्र यांची निर्मिती होत आहे. केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयाचा 2 कोटी रुपयांचा पुरस्कार सतत तीन वर्षे राज्याने मिळविला असून पंचायत राज संस्था मजबूत करण्यासाठी महान योगदान दिलेल्या स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षात हे साध्य झाले आहे, असे प्रशंसनीय  उद्गार  राज्यपालांनी यावेळी काढले.
          महाराष्ट्र गृहनिर्माण (नियमन व विकास) कायदा 2012 हा नवीन सर्वंकष कायदा अंमलात येणार असल्यामुळे गृह खरेदीदारांच्या हिताचे संरक्षण होणार आहे.  विकासकांकडून होणाऱ्या अनुचित व्यवहारांना आळा बसणार आहे, असे सांगून राज्यपाल पुढे म्हणाले की, गिरणी कामगारांसाठी शासनाने परवडणाऱ्या किंमतीत घरे देण्याचे ठरविले असून संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुताम्यांच्या जवळच्या वारसाला मोफत सदनिका देण्यात येणार आहेत.

          शासनाने जाहीर केलेल्या क्रीडा धोरणात क्रीडा उत्सवाचे आयोजन, पायाभूत सुविधांची निर्मिती, साहसी खेळांना प्रोत्साहान, आंतरराष्ट्रीय स्थरावर विशेष कामगिरी दर्शविण्यासाठी युवकांची पूर्वतयारी यांचा समावेश याबरोबरच युवाधोरणांतर्गत युवा महोत्सव, युवा पारितोषिके, युवक प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात येणार असल्याचा उल्लेख राज्यपालांनी यावेळी केला.  मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी राज्य शासनाने पावले उचलली असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले. राष्ट्र बांधणीच्या शासनाच्या प्रयत्नात नागरिकांनी सहभागी होवून राज्याचा नावलौकिक वाढविण्याचे आवाहन राज्यपालांनी यावेळी राज्यातील जनतेला केले.  मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांनी यावेळी राज्यपाल के.शंकरनारायणन यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
0 0 0 0 0



महाराष्ट्राला वस्त्रोद्योगातील आघाडीचे राज्य बनवू - मुख्यमंत्री
            मुंबई, दि. 1 :  महाराष्ट्र शासनाने वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी महत्वाकांक्षी असे वस्त्रोद्योग धोरण आणले असून त्याच्या अंमलबजावणीतून राज्याला वस्त्रोद्योगातील आघाडीचे राज्य बनविले जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. 'डायनॅमिक टेक्सटाईल पॉलीसी' अशा शब्दात या धोरणाचा गौरव करुन मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांना या क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याबाबत आवाहन केले.
        येथील सह्याद्री अतिथीगृहात आज वस्त्रोद्योग विभागाच्या www.mahatextile.maharashtra.gov.in या संकेतस्थळाचे विविध उद्योजकांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वस्त्रोद्योग मंत्री मोहम्मद आरिफ (नसीम) खान, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अजितकुमार जैन, वस्त्रोद्योग विभागाचे प्रधान सचिव सुनील पोरवाल, केंद्रीय वस्त्रोद्योग आयुक्त ए. बी. जोशी, वस्त्रोद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक समीर विश्वास यांच्यासह सेंट्रल बँकेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एम. व्ही. टाकसाळे, पिरामल ग्रुपचे उर्वी पिरामल, एसकेएनएल ग्रुपचे नितीन कासलीवाल, इटको ग्रुपचे रमेश शाह, आलोक इंडस्ट्रिजचे दिलीप जिवराजकर, फेडरेशन ऑफ टेक्सटाईल इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष प्रेम मलिक, बालाजी इन्फ्रा प्रोजेक्टचे विजय कलंत्री, भिलवाडा ग्रुपचे एम. एल. झुनझुनवाला, टेक्नोपार्क ग्रुपचे रमेश पोखरीवाल, ओसवाल ग्रुपचे जयदीप जामखेडकर यांच्यासह विविध उद्योगसमूह, बँकांचे पदाधिकारी, प्रतिनिधी उपस्थित होते.
        मुख्यमंत्री श्री. चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्रात उत्पादीत होणाऱ्या कापसापैकी साधारण 80 टक्के कापूस त्यावरील प्रक्रिया उद्योगासाठी शेजारील राज्यात जातो. कापसाचे उत्पादन महाराष्ट्रात होते ; पण त्यावरील प्रक्रिया उद्योगातून निर्माण होणारे रोजगार, शासनाला मिळणारा कर असा मूल्य आधारित फायदा मात्र इतर राज्यांना होतो. हा मूल्य आधारित फायदा महाराष्ट्राला मिळावा या उद्देशानेच महत्वाकांक्षी असे वस्त्रोद्योग धोरण आखण्यात आले आहे. विकासाचा समतोल साधण्यासाठी राज्यातील अविकसीत विदर्भ, मराठवाडा आणि खानदेश  या भागात गुंतवणूक करणाऱ्या वस्त्रोद्योजकांना विशेष प्रोत्साहन आणि सवलती दिल्या जाणार आहेत. राज्य लवकरच विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होत असून वस्त्रोद्योजकांना वीज, पाणी आणि इतर महत्त्वपूर्ण सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. या धोरणाच्या अंमलबजावणीतून राज्यात साधारण 40 हजार कोटींची गुंतवणूक होणे अपेक्षीत असून त्याआधारे साधारण 11 लाख नवे रोजगार निर्माण करण्याचे शासनाचे ध्येय आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
सिंगल विंडो ते झिरो विंडो - नसीम खान
        वस्त्रोद्योग क्षेत्रात गुंतवणूक करु इच्छिणाऱ्या उद्योजकांना शासनाच्या दारी येण्याची गरज भासणार नाही, अशा पद्धतीने या धोरणाची आखणी करण्यात आल्याचे वस्त्रोद्योग मंत्री. श्री. खान यांनी सांगितले. या धोरणाचे सर्व लाभ, सवलती बँकांमार्फत दिल्या जाणार आहेत. कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी  एक खिडकी यंत्रणा (सिंगल विंडो सिस्टम) असावी अशी अपेक्षा असते. पण वस्त्रोद्योग धोरणाची अंमलबजावणी झिरो विंडो पद्धतीने केली जाईल, असे त्यांनी सांगितले. सहकाराबरोबरच खासगी उद्योजकांना भरीव प्रोत्साहन आणि सवलती देणारे हे देशातील पहिलेच धोरण आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.  वस्त्रोद्योजकांना या धोरणाशी संबंधीत सर्व शासन निर्णय, इतर महत्त्वपूर्ण माहिती सुलभरित्या उपलब्ध होण्यासाठी नव्या संकेतस्थळाचा उपयोग होईल, असेही ते यावेळी म्हणाले.
00000




राज्याच्या विकासात कामगारांचा मोलाचा वाटा
                                          - मुख्यमंत्री

        मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र राज्य औद्योगिक क्षेत्रातील आज आघाडीचे राज्य आहे. इतर विविध क्षेत्रातही राज्याने प्रगती केली असून यात कामगारांचा मोलाचा वाटा आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
        भारतीय कामगार कर्मचारी महासंघाच्या वतीने कामगार क्रीडा भवनात आज आयोजित करण्यात आलेल्या कामगार मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी कामगार राज्यमंत्री राजेंद्र गावीत, आमदार माणिकराव गावीत, आमदार भाई जगताप, कामगार आयुक्त मधुकर गायकवाड, महासंघाचे अध्यक्ष ॲड. शशिकांत पवार यांच्यासह विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी आणि कामगार उपस्थित होते.
        मुख्यमंत्री म्हणाले की, कामगारांना न्याय मिळवून देण्याची शासनाची नेहमीच भूमिका राहिली आहे. मुंबईतील गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाने व्यापक प्रयत्न केले असून बांधून तयार असलेल्या सुमारे 6 हजार 800 घरांची प्रत्येकी किंमत साडेबारा लाखावरुन साडेसात लाखापर्यंत कमी करण्यात आली आहे. माथाडी कामगार आणि खासगी सुरक्षा रक्षकांनाही त्यांच्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंडळांच्या माध्यमातून विविध लाभ देण्यात येत आहेत. बाल कामगारांसारख्या अनिष्ट प्रथेच्या निर्मूलनासाठी शासनाने प्रत्येक जिल्ह्यात कृती दलाची स्थापना केली आहे. असंघटीत घरेलू कामगारांच्या हितासाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात आले असून या माध्यमातून त्यांच्यासाठी विविध योजना राबविल्या जाणार आहेत. इमारत व इतर बांधकामावर काम करणाऱ्या कामगारांसाठीही मंडळ स्थापन करण्यात आले असून मार्च 2012 पर्यंत या मंडळाकडे 512 कोटी रुपयांचा उपकर जमा झाला आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. कामगार कल्याण मंडळाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
        राज्यमंत्री श्री. गावीत म्हणाले की, औद्योगिक क्षेत्रातील मालक आणि कामगार हे दोन्ही घटक महत्त्वाचे असून हे दोन्ही घटक टिकले तरच कामगारांचा विकास होईल. शासनाने कामगारांच्या हितासाठी विविध कल्याणकारी मंडळांची स्थापना केली असून त्यामार्फत कामगारांना विविध लाभ दिले जात आहेत. असंघटीत कामगारांनाही असेच लाभ मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असेही त्यांनी सांगितले.
        याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस.के.शेट्ये यांना भिष्माचार्य पुरस्कार, कामगार नेते शिवाजीराव खटकाळे यांना द्रोणाचार्य पुरस्कार, कोहिनूर कॉन्टिनेन्टलचे अध्यक्ष उन्मेश जोशी व काशिद बीच रिसॉर्टचे अध्यक्ष अमिर अली कोटडीया या दोघांना औद्योगिक शांतता पुरस्कार, योगिराज स्वामी व ईश्वर हैद्राबादी यांना उत्कृष्ट संघटक पुरस्कार, विनोद चाळके यांना महाकवी कालिदास पुरस्कार,
डॉ. रुपा कुळकर्णी यांना अहिल्याबाई होळकर पुरस्कार, सौ. गार्गी रावते यांना रणरागिणी पुरस्कार, धनंजय देसाई व सौ. अनिता काळे यांना भारतीय कामगार कर्मचारी महासंघ भूषण पुरस्कार, करुणानिधी आर. चतुर्वेदी यांना आदर्श कामगार पुरस्कार प्रदान करण्यात आला.
0 0 0 0 0