नवीन वस्त्रोद्योग धोरणामुळे
11 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील
- राज्यपाल
मुंबई, दि. 1 : स्व.यशवंतराव चव्हाण यांची जन्मशताब्दी यावर्षी आपण साजरी करीत असून त्यांच्यासारख्या दूरदृष्टी व उत्तम प्रशासक असलेल्या थोर मुत्सद्दी व्यक्तीमुळे राज्याने विकासाच्या सर्व क्षेत्रात मोठी प्रगती केली असून शासनाने जाहीर केलेल्या नवीन वस्त्रोद्योग धोरणामुळे 11 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे गौरवोद्गार राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी आज येथे काढले.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 52 व्या वर्धापन दिनानिमित्ताने दादर येथील शिवाजीपार्क मैदानात आयोजित केलेल्या ध्वजवंदन व संचलन सोहळ्यात राज्यपाल बोलत होते. यावेळी
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख, राजशिष्टाचार
मंत्री सुरेश शेट्टी, गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान
सचिव अजितकुमार जैन, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे, महापौर सुनील
प्रभू, लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी, विधानपरिषद सदस्य दिवाकर रावते, मुख्य
राजशिष्टाचार अधिकारी सुमीत मलीक, वित्त विभागाचे प्रधान सचिव सुधीर श्रीवास्तव,
पोलीस महासंचालक के.सुब्रम्हण्यम आदी उपस्थित होते.
संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचे स्वप्न पाहिलेल्या आणि ते साकार करण्यासाठी झटलेल्या हुताम्यांना यावेळी राज्यपालांनी आदरांजली वाहिली व कामगारांना आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. पोलीस गृह
रक्षक दल, नागरी संरक्षण दल, अग्नीशमन दल, महानगरपालिका सुरक्षा दल यांच्या
संयुक्त संचलनाने राज्यपालांना मानवंदना दिली.
राज्यपाल पुढे म्हणाले की, राज्यातील काही विशिष्ट भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने शासनाने 7,753 गावांमध्ये टंचाई जाहीर केली असून सवलतीच्या दराने चारा पुरविण्यासाठी चारा केंद्र सुरु करण्यास जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. पशुधनासाठी पिण्याच्या पाण्याची पुरेशी तरतूद करण्यासाठी पावले उचलण्यात आली असून तहसीलदारांना सर्वांना पाणी पुरविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. केंद्र शासनाच्या पथकाने अलिकडेच टंचाईग्रस्त भागास दिलेल्या भेटीचा उल्लेख राज्यपालांनी यावेळी केला.
'डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत' कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 1 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के व्याजाने व त्यापुढील 3 लाखांपर्यंतच्या कर्जास एक टक्का व्याज आकारण्यात येणार असल्याचे सांगून राज्यपाल पुढे म्हणाले की, कापूस व कांदा निर्यातीवरील बंदी उठविण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाला विनंती केली आहे. राज्यातील कांही भागात प्रतिकूल हवामानामुळे फळपिकांच्या होणाऱ्या नुकसानीसंदर्भात शासनाने द्राक्ष, केळी, संत्री, मोसंबी,डाळिंब, आंबा आणि काजू या पिकांसाठी पीक विमा योजना कार्यान्वित करण्यात आली असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.
राज्याने औद्योगिक क्षेत्रात फार मोठी झेप घेतली असून राष्ट्रीय उत्पादक धोरणांतर्गत राज्यात राष्ट्रीय गुंतवणूक आणि उत्पादन क्षेत्र यांची निर्मिती होत आहे. केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयाचा 2 कोटी रुपयांचा पुरस्कार सतत तीन वर्षे राज्याने मिळविला असून पंचायत राज संस्था मजबूत करण्यासाठी महान योगदान दिलेल्या स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षात हे साध्य झाले आहे, असे प्रशंसनीय उद्गार राज्यपालांनी यावेळी काढले.
महाराष्ट्र गृहनिर्माण (नियमन व विकास) कायदा 2012 हा नवीन सर्वंकष कायदा अंमलात येणार असल्यामुळे गृह खरेदीदारांच्या हिताचे संरक्षण होणार आहे. विकासकांकडून होणाऱ्या अनुचित व्यवहारांना आळा बसणार आहे, असे सांगून राज्यपाल पुढे म्हणाले की, गिरणी
कामगारांसाठी शासनाने परवडणाऱ्या किंमतीत घरे देण्याचे ठरविले असून संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुताम्यांच्या जवळच्या वारसाला मोफत सदनिका देण्यात येणार आहेत.
शासनाने जाहीर केलेल्या क्रीडा धोरणात क्रीडा उत्सवाचे आयोजन, पायाभूत सुविधांची निर्मिती, साहसी खेळांना प्रोत्साहान, आंतरराष्ट्रीय स्थरावर विशेष कामगिरी दर्शविण्यासाठी युवकांची पूर्वतयारी यांचा समावेश याबरोबरच युवाधोरणांतर्गत युवा महोत्सव, युवा पारितोषिके, युवक प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात येणार असल्याचा उल्लेख राज्यपालांनी यावेळी केला. मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी राज्य शासनाने पावले उचलली असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले. राष्ट्र बांधणीच्या शासनाच्या प्रयत्नात नागरिकांनी सहभागी होवून राज्याचा नावलौकिक वाढविण्याचे आवाहन राज्यपालांनी यावेळी राज्यातील जनतेला केले. मुंबईचे महापौर सुनील प्रभू यांनी यावेळी
राज्यपाल के.शंकरनारायणन यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
0 0 0 0 0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा