शनिवार, ४ फेब्रुवारी, २०१२


ईद-ए-मिलादनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा
मुंबई, दि. 4 : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ईद-ए-मिलादनिमित्त राज्यातील मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
मोहम्मद पैगंबरांचा जन्मदिन जगातील लाखो लोक ईद-ए-मिलाद म्हणून साजरा करतात. मोहम्मद पैगंबर हे शांततेचे पुरस्कर्ते सामाजिक सुधारणावादी आणि मानवतावादी होते. मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांचे कृतज्ञतापुर्वक स्मरण करतानाच त्यांचा सहिष्णुता, शांतता, संयम आणि प्रेमाचा संदेश आचरणात आणणे गरजेचे आहे. अखिल मानवजातीला प्रेरक असे पैगंबरांचे विचार सध्याच्या आधुनिक युगातही तितकेच अनुकरणीय आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
00000000

शुक्रवार, ३ फेब्रुवारी, २०१२


   राज्य निवडणूक आयोग
महाराष्ट्र
       पहिला माळा, नवीन प्रशासकीय भवन, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई- 400 032.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
                                                                                (प्रसिद्धिपत्रक)                                             दि. 2 फेब्रुवारी 2012

आरक्षित जागेवरील उमेदवारांना
प्रतिज्ञापत्र देण्याची आवश्यकता नाही
                              -नीला सत्यनारायण

मुंबई, दि. 2 : उच्च न्यायालयाने जात वैधता प्रमाणपत्राची तपासणी/छाननी करण्यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिलेल्या निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे महानगरपालिका निवडणुकीतील उमेदवारांच्या जात वैधता प्रमाणपत्रावर आक्षेप घेण्यात आल्यास संबंधित उमेदवारांकडून प्रतिज्ञापत्र घेण्यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने मागे घेतल्या आहेत. त्यामुळे निवडणूक प्रक्रियाही नेहमीच्या पध्दतीने होईल, असे राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी स्पष्ट केले आहे.
मागासवर्गीयांसाठी आरक्षित असलेल्या जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रांची छाननी करताना उमेदवारांनी दाखल केलेल्या जात वैधता प्रमाणपत्रावर अन्य उमेदवारांनी हरकत घेतल्यास अशा उमेदवारांना त्यासंदर्भात दक्षता समितीचा अहवाल घेऊन जात वैधता प्रमाणपत्र देण्यात आले असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करणे उच्च न्यायालयाच्या निर्देशामुळे बंधनकारक करण्यात आले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाने आज उच्च न्यायालयाच्या या संदर्भातील निर्देशांना स्थगिती दिली. त्यामुळे आरक्षित जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना आता प्रतिज्ञापत्र देण्याची आवश्यकता नाही, असेही त्यांनी  सांगितले.
उच्च न्यायालयाच्या निदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने 1 फेब्रुवारी 2012 रोजी दिलेल्या आदेशानुसार छाननी आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्यासंदर्भात सुधारीत कार्यक्रम जाहीर केला आहे. आता प्रतिज्ञापत्राची अट जरी वगळण्यात आली असली तरी उर्वरित कार्यक्रमाच्या तारखा 1 फेब्रुवारी 2012 च्या आदेशाप्रमाणेच राहतील. त्यानुसार खुल्या जागेवरील नामनिर्देशन पत्रांची छाननी आज पार पडली. उद्या 3 फेब्रुवारी 2012 रोजी राखीव जागांसाठीच्या नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल व वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. उमेदवारी अर्ज 4 फेब्रुवारी 2012 पर्यंत मागे घेता येतील आणि 6 फेब्रुवारी 2012 रोजी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. निवडणुकीची उर्वरित प्रक्रिया पूर्वनियोजनाप्रमाणे म्हणजे मतदान 16 फेब्रुवारीला, तर मतमोजणी 17 फेब्रुवारी 2012 रोजी होईल. असेही श्रीमती सत्यनारायण यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

                                           0-0-0

गुरुवार, २ फेब्रुवारी, २०१२


  

 राज्य निवडणूक आयोग
महाराष्ट्र
       पहिला माळा, नवीन प्रशासकीय भवन, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मुंबई- 400 032.
-------------------------------------------------------------------------------------------------------------
                                                     (प्रसिद्धिपत्रक)                                  दि. 2 फेब्रुवारी 2012
जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महानगरपालिकांची
मतमोजणी एकाच दिवशी 17 फेब्रुवारीला
                                   -नीला सत्यनारायण
मुंबई, दि. 2 : राज्य निवडणूक आयोगाने विविध राजकीय पक्षांची  मागणी लक्षात घेऊन जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि महानगरपालिकांची मतमोजणी एकाच दिवशी 17 फेब्रुवारी 2012 रोजी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
येथील सचिवालय जिमखान्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. श्रीमती सत्यनारायण यांनी सांगितले की, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी 7 फेब्रूवारीला; तर गडचिरोली जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये 12 फेब्रुवारीला मतदान होईल. महानगरपालिकांसाठी 16 फेब्रुवारीला मतदान होईल. या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांची मतमोजणी 17 फेब्रुवारीला होईल. एकत्रित मतमोजणीच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने 1 लाख 81 हजार यंत्रांची व्यवस्था केली आहे. त्यात भारत निवडणूक आयोगाच्या 1 लाख 30 हजार, इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून (ईसीआयएल) मागविलेली 24 हजार आणि राज्य निवडणूक आयोगाकडील सुमारे 27 हजार मतदान यंत्रांचा समावेश आहे. भारत निवडणूक आयोगाच्या यंत्राचा उपयोग पुणे आणि नागपूर जिल्हा परिषद वगळून अन्य सर्व जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी केला जाणार आहे. पुणे आणि नागपूर जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या पंचायत समित्यांसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या मतदान यंत्रांचा वापर केला जाणार आहे. दहा महानगरपालिकांसाठी इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची यंत्रे वापरण्यात येणार आहेत.
भारत निवडणूक आयोगाकडून 1 लाख 30 हजार मतदान यंत्रे मागविली आहेत. त्यापेक्षा अधिक मतदान यंत्रे उपलब्ध करून देणे शक्य नसल्याचे राज्याच्या निवडणूक आधिकाऱ्यांनी कळविले होते; तसेच यातील सुमारे 5 टक्के मतदान यंत्रे सुस्थितीत नसल्याचे आढळून आले. यंत्रांची जुळवाजुळव करण्याच्या प्रक्रियेमुळे एकत्रित मतमोजणीचा निर्णय घेण्यासाठी एवढा कालावधी लागला. तसेच जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांसाठी एका मतदान केंद्रावर दोन मतदान यंत्रे लागतात, असेही राज्य निवडणूक आयुक्त यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेसाठी आचारसंहिता शिथिल होणार
पूर्वनियोजनानुसार जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांची मतमोजणी 8 फेब्रुवारीला होणार होती. त्यामुळे जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या क्षेत्रात निकालापर्यंत लागू असलेली आचारसंहिता मतदानानंतर विशेष बाब म्हणून शिथिल करण्यात येईल. परंतु निवडणूक होत असलेल्या महानगरपालिका क्षेत्रातील आचारसंहिता महानगरपालिकांचे निकाल लागेपर्यंत कायम राहील, याची सर्वांनी दक्षता घ्यावी, असे आवाहनही श्रीमती सत्यनारायण यांनी केले आहे.

0-0-0