सोमवार, ३ नोव्हेंबर, २०१४

अमरापूरकर यांच्या निधनाने महाराष्ट्राने
संवेदनशील माणूस गमावला : मुख्यमंत्री
मुंबई, दि. 3: रुपेरी पडद्यावर ‘रामा शेट्टी’ सारख्या कुटील खलनायकाचे अजरामर रुप साकारणारे ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर वैयक्तिक जीवनात मात्र अतिशय संवेदनशील आणि सत्शील होते. चित्रपटासारख्या झगमगाटाच्या क्षेत्रात राहुनही त्यांनी आपल्यातले साधेपण आणि माणूसपण जपले होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक सच्चा रंगकर्मी, समर्पित समाजसेवक गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे.
          ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांच्या निधनाबद्दल शोकसंदेशात श्री. फडणवीस म्हणतात की, स्व. अमरापूरकर यांनी चतुरस्त्र अभिनेता म्हणुन आपली स्वतंत्र ओळख नाटक आणि चित्रपट क्षेत्रात निर्माण केली होती. उत्तम चरित्रनायक, खलनायक, विनोदी अभिनेता अशा विविध प्रकारच्या भूमिका त्यांनी लिलया साकारल्या. काळजाचा ठाव घेणारी संवादफेक, भेदक डोळे आणि भुमिकेला अनुरुप देहबोली ही त्यांची वैशिष्ट्ये होती. मराठी रंगभूमी आणि बॉलिवुड या दोन्ही ठिकाणी त्यांनी आपली स्वत:ची प्रतिमा निर्माण केली. रसरशीत आणि जिवंत अभिनय यासाठी ते ओळखले जायचे. केवळ अभिनेता एवढीच त्यांची ओळख नव्हती, तर सुजाण नागरिक आणि अत्यंत तळमळीचे सामाजिक कार्यकर्ते म्हणुनही ते महाराष्ट्राला परिचित होते. अनेक सामाजिक आंदोलनामध्ये त्यांनी घेतलेला सहभाग लक्षणीय होता. अभिनेता या ओळखीबरोबरच संवेदनशील माणूस आणि सच्चा समाजसेवक म्हणुनही ते दीर्घकाळ स्मरणात राहतील.
०००००००



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा