एमएमआरडीएच्या बैठकीत महत्वाचे
तीन निर्णय
दहिसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्द
आणि
वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडावली
मेट्रो मार्ग मंजूर
वांद्रे-कुर्ला संकुलातील वाहतूक
कोंडी सोडविण्यासाठी 4 उड्डाणपूल व 1 रस्ता
मुंबई, दि. 20 : मुंबई महानगर प्रदेश
विकास प्राधिकरणाच्या आज पार पडलेल्या 136व्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि
प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय महत्त्वाचे तीन निर्णय घेतले.
बैठकीमध्ये दहिसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्द आणि वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडावली या
दोन मेट्रो मार्गांना मंजूरी देण्यात आली आणि त्याचबरोबर वांद्रे-कुर्ला जंक्शनवर
दररोज होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी चार उड्डाणपूल आणि एक रस्ता बांधण्याचा
निर्णयही घेण्यात आला.
दहिसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्द या 40 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गावर 36
स्थानके असतील व हा मार्ग पूर्णत: भुयारी असेल. 32 किलोमीटर लांबीच्या
वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडावली या मेट्रो मार्गावर 24 स्थानके भुयारी असतील तर 6
उन्नत असतील. या दोन्ही मार्गाची अंमलबजावणी मुंबई मेट्रो रेल महामंडळाद्वारे येत्या
6-7 वर्षांत करण्यात येणार आहे. दहिसर-चारकोप-वांद्रे-मानखुर्द मेट्रो मार्गासाठी
येणारा अंदाजीत खर्च 25 हजार कोटी रूपये इतका आहे, तर
वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडावली या मेट्रो मार्गाचा अंदाजीत खर्च 19 हजार कोटी
रूपये इतका आहे.
या दोन्ही प्रकल्पांची अंमलबजावणी करण्यासाठी येणाऱ्या एकूण खर्चापैकी 50
टक्के रक्कम आंतरराष्ट्रीय बँका किंवा वित्तीय संस्थांकडून कर्जरूपाने घेतली जाणार
आहे. उर्वरीत 50 टक्के खर्च केंद्र आणि राज्य शासन किंवा प्राधिकरणातर्फे करण्यात
येण्याची शक्यता आहे. या दोन्ही मेट्रो मार्गामुळे इंधन वापर आणि वेळ यामध्ये बचत
होणार असून त्याचबरोबर रस्त्यावरील दुर्घटना आणि प्रदूषण कमी होण्यासही मदत होणार
आहे.
वांद्रे-कुर्ला संकुल जंक्शनवरील वाहतुककोंडी सोडविण्यासाठी 4 उड्डाणपूल आणि 1
रस्ता बांधण्यासाठी मंजुरी देतानासुद्धा प्राधिकरणाचा हाच विचार होता. दररोज
गर्दीच्यावेळी सरासरी दर ताशी 12 हजार वाहने या वांद्रे-कुर्ला संकुल जंक्शनवर
गर्दी करतात, असे एका सर्वेक्षणात दिसून
आले आहे. मात्र, या प्रस्तावित 4
उड्डाणपूल आणि एका रस्त्यामुळे ही वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.
वांद्रे-कुर्ला संकुल ते सी-लिंककडे जाणारा उड्डाणपुल, तसेच सी-लिंक ते
वांद्रे-कुर्ला संकुलाकडे येणारा उड्डाणपूल दोन पदरी असून या दोन्ही पुलांची एकूण
लांबी 1 हजार 888 मीटर इतकी आहे. धारावीकडून पश्चिम द्रुतगती मार्गाकडे जाणाऱ्या
उड्डाणपुलास वांद्रे-कुर्ला संकुलाकडून येणारा उड्डाणपुल कलानगर जंक्शन येथे
द्वितीय स्तरावर येऊन मिळेल व तेथून पुढे पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या दिशेने
जाणारा उड्डाणपुल तीन पदरी बांधण्यात येणार आहे. सदर द्वितीय स्तरावरील
उड्डाणपुलाची एकूण लांबी 2 हजार 920 मीटर इतकी आहे. त्याचप्रमाणे धारावीकडून
सी-लिंककडे जाणारी वाहतूक अव्याहत ठेवण्यासाठी शासकीय जमिनीवरून 300 मीटर लांबीचा
व 12 मीटर रूंदीचा रस्ता बांधण्यात येणार आहे. या एकूण प्रकल्पासाठीचा अंदाजित
खर्च 227 कोटी रूपये इतका आहे.
या बैठकीला मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, प्राधिकरणाचे महानगर आयुक्त यू.पी.एस.
मदान, बृहन्मुंबई मनपाचे आयुक्त सीताराम कुंटे, बृहन्मुंबईच्या महापौर स्नेहल
आंबेकर, स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे, नगरसेवक दिलीप पटेल, वसई-विरारचे
महापौर नारायण मानकर, रायगडचे जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे, अंबरनाथचे
नगराध्यक्ष सुनील चौधरी, कल्याण डोंबिवलीच्या महापौर कल्याणी पाटील, नगरविकास
विभागचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, श्रीकांत सिंह, गृहनिर्माण विभागाचे
प्रधान सचिव देवाशिष चक्रवर्ती, प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त संजय सेठी, सिडकोचे
व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया आदी उपस्थित होते.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा