गुरुवार, २७ नोव्हेंबर, २०१४


`मुनीजन` उपक्रमातून स्वच्छता संदेश देणारे गुणीजन घडावेत
स्वच्छता केवळ अभियान न राहता नित्यनियम बनणे आवश्यक
-मुख्यमंत्री
मुंबई दि 27 : स्वच्छता हे केवळ अभियान न राहता ते नित्यनियम बनणे आवश्यक आहे. आपण जसे भूक लागली की जेवतो तसाच नित्यनियम स्वच्छतेच्याही बाबतीत आवश्यक असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्र युनिर्व्हसिटीज न्यू एनिशिएटिव्ह फॉर जॉईंट ॲक्शन नाऊ (मुनीजन) मार्फत स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज मुंबई विद्यापीठाच्या दिक्षांत सभागृहात करण्यात आली. कार्यक्रमास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ संजय चहांदे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ राजन वेळूकर, प्र- कुलगुरु डॉ. नरेश चंद्र आणि राज्यातील विविध विदयापीठाचे कुलगुरु, प्र-कुलगुरु उपस्थित होते.
आजच्या तरुणाईने स्वच्छता हे जीवनमूल्य स्वीकारुन भारत स्वच्छ अभियानात सहभागी झाले पाहिजे. सामाजिक मुल्यांमध्ये आपला सहभाग दिला तर इथे उपस्थित असलेल्या गुणीजनांच्या माध्यमातून मुनीजन हा उपक्रम यशस्वी होऊ शकेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
शालेय शिक्षण आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाने स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत शाळांमध्ये आणि महाविदयालयांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती मोहीम हाती घेतल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी या विभागाचे यावेळी अभिनंदन केले.
ते म्हणाले की, आपण बस किंवा ट्रेनमध्ये प्रवास करत असताना जर सीट फाटलेली असेल तर ती आपण स्वत: सुईदोऱ्याने शिवण्यापेक्षा अधिक फाडतो. तसेच प्रेक्षणीय स्थळावर गेल्यावर दगडावर नाव कोरुन राष्ट्राच्या संपत्तीची नासधुस आपण करत असतो. हे थांबविण्यासाठी आपण सर्वांनी पुढे येणे आवश्यक असल्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना केले.
आपल्या अंगी राष्ट्रभक्ती असणे आवश्यक आहे. ही राष्ट्रभक्ती फक्त सीमेवर लढून किंवा पोलीस दलात भरती होऊन करता येत नाही. स्वच्छता ही देखील एक राष्ट्रभक्तीच आहे. हे पटवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वामी विवेकानंदाचे उदाहरण आपल्या भाषणात दिले. एकदा स्वामी विवेकानंद मद्रास विदयापीठात गेले होते. तेथे त्यांनी राष्ट्रभक्ती म्हणजे फक्त देशासाठी लढणे नव्हे, तर राष्ट्रभक्ती म्हणजे काय आहे याची व्याख्या सांगितली. आपल्या समाजात असलेल्या अनेक समस्या उदाहरणार्थ भूकबळी, सामाजिक दरी पाहून अस्वस्थ होणे ही खऱ्या अर्थाने देशभक्तीची पहिली पायरी असते. तर आपल्याला जेव्हा वाटते की हे बदलण्यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे आणि या भावनेने आपण विचार करतो, काहीतरी योजना आखतो तेव्हा तुम्ही राष्ट्रभक्त होत असता आणि जेव्हा तुम्ही विचार केलेल्या योजनांवर अंमलबजावणी करता तेव्हा तुम्ही राष्ट्रभक्त होता, असे स्वामी विवेकानंदानी सांगितल्याचा दाखलाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. 
आज भारताच्या 125 कोटी लोकसंख्येत तरुण वर्गाची संख्या अधिक असून यामध्ये 25 वर्ष वय असणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. आजच्या तरुण वर्गाचे सरासरी वय 27 वर्ष आहे. याचाच अर्थ भारताची युवाशक्ती ताकद हीच आपली संपत्ती आहे. आजच्या तरुण वर्गाने जर स्वच्छता राखणे ही आपली मुलभूत जबाबदारी म्हणून स्वीकारली तर आपले जीवनमूल्य उंचावण्याबरोबरच महाराष्ट्राची प्रगती होईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
आगामी पाच वर्षात विदयापीठ आणि महाविदयालयांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्याबरोबरच सार्वजनिक ठिकाण निवडून तेथे देखील स्वच्छता करावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रमात केले.  या उपक्रमाला शुभेच्छा देत असताना स्वच्छतेतून महाराष्ट्राचा विकास घडवूया असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमात बोलताना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे म्हणाले की, स्वच्छता आणि समृध्दी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आज आपल्या भारताची खरी ताकद ही युवाशक्ती आहे. स्वच्छ भारत अभियान यशस्वी होण्याकरिता युवाशक्ती एकत्रित होणे आवश्यक आहे. आज राज्य शासनासमोर गृह आणि शिक्षण हे दोन विषय प्राथमिकतेच असून शिक्षणामध्ये कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी बोलताना श्री. तावडे यांनी जर्मनीमधील जागरूक नागरीकाचे एक उदाहरण दिले. ते म्हणाले की, जपानमधली एक महिला ट्रेनमध्ये प्रवास करीत असताना तिला फाटलेली सीट दिसली तर ती स्वत:च्या पर्समधील सुई-दोरा काढून ती सीट शिवते.. याचाच अर्थ त्या महिलेला ती ट्रेन माझी आहे असे वाटते. आपल्या सर्वांमध्येही हीच राष्ट्रभावना निर्माण होणे आवश्यक असल्याचे आवाहन श्री. तावडे यांनी यावेळी केली.
श्री. तावडे पुढे म्हणाले की, अखिल भारतीय विदयार्थी परिषदेत आणि सिनेटमध्ये काम करीत असताना अनेकदा मुंबई विदयापीठामध्ये मी यायचो. तेव्हा मी कधीच मानाने मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केला नव्हता. पण आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री म्हणून या कार्यक्रमाला येताना आनंद आणि दडपण वाटत होते. शाळेत जसे नाठाळ मुलाला मॉनिटर केले जाते तसे मला या विभागाचा मंत्री करण्यात आले आहे. पण असे असले तरी शिक्षणालाच केंद्रबिंदू मानून विदयार्थ्यांचे हित जोपासणे याला माझे प्राधान्य राहिले, असे त्यांनी यावेळी सांगितले.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव डॉ. चहांदे म्हणाले की, आज महाराष्ट्रात 4500 महाविदयालये आहेत आणि या महाविदयालयात 26 लाखांहून अधिक विदयार्थी शिक्षण घेत आहेत. याचाच अर्थ स्वच्छ भारत अभियान यशस्वी करण्याकरिता या विदयार्थ्यांचा सहभाग अत्यंत महत्वाचा असणार आहे. स्वच्छता हे सामाजिक आरोग्य आणि उत्कृष्ट मनुष्यबळाचे इंजिन असते आणि त्यामुळेच विदयार्थ्यांनी स्वच्छता अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
मुंबई विदयापीठाचे कुलगुरु डॉ वेळूकर म्हणाले की, आपण सर्वांनी स्वच्छतेची सवय लावून घेणे आवश्यक आहे. आज मुनीजन हा उपक्रम सुरू करणारे भारतातले महाराष्ट्र हे पहिले राज्य असल्याचे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
याच कार्यक्रमात विविध विदयापीठाच्या कुलगुरुंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते स्वच्छतेचे प्रतिक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचा शेवट राष्ट्रगीताने करण्यात आला.


०००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा