मराठी सिनेसृष्टीतील ‘स्मितहास्य’ लोपले - मुख्यमंत्री
मुंबई,
दि.
6
: आपल्या सकस आणि दमदार अभिनयाने मराठी चित्रसृष्टीला
लोकप्रियता मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री, तसेच निर्माती आणि दिग्दर्शक
स्मिता तळवलकर यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीतील स्मितहास्य लोपले आहे. नव्या
पिढीतील कलावंतांना विविध व्यासपीठांवर संधी देणारे व्यक्तीमत्व गमावले आहे, अशा
शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शोक व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री म्हणतात की,
स्मिता तळवलकर यांनी चित्रपट अभिनयाबरोबरच नाट्य, दिग्दर्शन, वृत्तनिवेदन, चित्रपट
निर्मिती, दूरचित्रवाणी आदी विविध क्षेत्रात प्रभावी कामगिरी केली. चित्रपटापासून
कारकिर्द सुरू केल्यानंतर यशाची अनेक शिखरे गाठताना आपल्यातील संवेदनशील आणि
प्रयोगशील कलाकाराला धक्का लागू दिला नाही. लहान पडद्याच्या माध्यमातून मराठी नाटक
आणि चित्रपटांनी देशाची सीमा ओलांडावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले. निर्माती
म्हणून सरस कलाकृती प्रेक्षकांसमोर आणल्या. अनेक पुरस्कार मिळवित असताना
कर्तव्यभावनेने मराठी नाटक आणि चित्रपटसृष्टीला अधिक यश मिळवून देण्यासाठी
सातत्याने प्रयत्न केले. गेली चार वर्षे असाध्य रोगाशी लढा देतानाही
चित्रपटसृष्टीप्रती असलेले नाते अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न केला.
स्मिता तळवलकर यांच्यामुळे
अनेक नव्या कलाकारांना त्यामुळे चित्रपट आणि नाटकात काम करण्याची संधी मिळाली.
त्यांच्या निधनामुळे नव्या कलावंतांचा आधार हरपला आहे. त्यांच्या निधनाने मराठी
रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीची झालेली हानी न भरून निघणारी आहे, असेही मुख्यमंत्री
शोकसंदेशात म्हणतात.
----0-----
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा