मंगळवार, ३ जून, २०१४

गोपीनाथ मुंडे हे राजकारणाच्याही पलिकडे जाऊन
लोकांसाठी काम करणारे नेतृत्व : मुख्यमंत्री
मुंबई, दि. 3 : भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री श्री. गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन हे अतिशय धक्कादायक आणि चटका लावुन जाणारे आहे. अथक संघर्ष करुन त्यांनी समाजकारण आणि राजकारणामध्ये स्वत:चे स्थान निर्माण केलं होतं. राजकारणाच्याही पलिकडे जाऊन लोकांसाठी काम करणाऱ्या काही मोजक्या नेत्यांपैकी ते एक होते, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी श्री. मुंडे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
श्री. चव्हाण शोकसंदेशात म्हणतात, महाराष्ट्रातील खंबीर आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून ख्याती असलेल्या केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचे आकस्मिक निधन अतिशय दुर्दैवी आहे. त्यांच्या मृत्युने महाराष्ट्र एका अष्टावधानी नेतृत्वाला आणि एक संवेदनशील लोकसेवकाला मुकला आहे. जिल्हा परिषद गटातील कार्यापासून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास सातत्यपूर्ण लोकसेवा आणि लोकसंग्रहाच्या बळावर केंद्रीय मंत्रीपदापर्यंत विस्तारला गेला. लोकसभा सदस्य म्हणून देखील त्यांची कामगिरी सरस अशीच झाली. याचाच परिणाम म्हणून कार्यकर्तृत्वाच्या बळावर त्यांचा समावेश केंद्रीय मंत्रीमंडळात करण्यात आला.
स्व. मुंडे यांची मुळ ओळख एक प्रभावी वक्ता आणि तळागाळातील कार्यकर्त्याशी जोडला गेलेला नेता अशी आहे. ग्रामीण जनतेच्या प्रश्नांशी त्यांनी सातत्याने स्वत:ला जोडले आणि त्या सोडविण्याचा प्रयत्न केला. आपल्या खुमासदार शैलीत जनतेशी संवाद साधतांना याच शैलीने त्यांनी विरोधकांवर तेवढेच कठोर प्रहारही केले. तत्वाला किंवा एखाद्या निर्णयाला विरोध करताना मात्र वैयक्तिक पातळीवर अत्यंत दिलखुलासपणे माणसे जोडण्याची खुबी त्यांच्यात होती.
अतिशय विनम्र स्वभाव हा त्यांचा गुण सर्वांनीच घेण्यासारखा आहे. त्यांच्या निधनाने केवळ मराठवाड्याचेच नव्हे तर संपूर्ण राज्याचे नुकसान झाले आहे. आमदार, उपमुख्यमंत्री, खासदार या पदांच्या माध्यमातुन त्यांनी महाराष्ट्राच्या हिताची अनेक कामं केली. केंद्रीय मंत्रीपद स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसात मृत्युनं त्यांना अशा भयानक आणि निर्दयी प्रकारे गाठावं, हे अतिशय क्लेशकारक आहे, असे श्री. चव्हाण म्हणतात.
-0-0-0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा