आरक्षणाचा उपयोग करून मराठा समाजाने शिक्षणाचा पाया
मजबूत करावा : मुख्यमंत्री
मुंबई,
दि. 26 : मराठा समाजाला शासकीय नोकरी आणि शिक्षणामध्ये 16 टक्के आरक्षण देऊन राज्य
शासनाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मात्र या आरक्षणाचा खरा उपयोग शिक्षणाचा पाया
मजबूत करण्यासाठी केला गेला पाहिजे, मराठा माणसाला देशाच्या आणि जगाच्या
व्यासपीठावर ताठ मानेने उभे राहण्याची क्षमता या आरक्षणामुळे प्राप्त होईल, असा
विश्वास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज यांनी व्यक्त केला.
राज्य
सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय घेतल्याबद्दल या मागणीसाठी प्रयत्न करणाऱ्या मराठा
समाजातील विविध संघटनांच्या नेत्यांनी आज मंत्रालयात श्री. चव्हाण यांची भेट
घेतली. युवराज संभाजी राजे यांनी श्री. चव्हाण यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ
देऊन सर्वांच्या वतीने सत्कार केला.
यावेळी अखिल
भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष शशीकांत पवार, अखिल भारतीय मराठा महासंघाचे सरचिटणीस
राजेंद्र कोंढरे,माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील, मराठा सेवासंघ संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्ष
शांताराम कुंजीर, मराठा महासंघ मुंबईचेनेते व संपादक अभिजीत राणे, सामाजिक कार्यकर्ते सचिन सावंत व विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
श्री.
चव्हाण म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण ही मराठा आणि बहुजन समाजाच्या दृष्टीने
आनंदाची बाब आहे. विशेष म्हणजे या आरक्षणाला अन्य कोणाचाही विरोध नव्हता. तसेच
अन्य कोणत्याही समाज घटकाचे आरक्षण कमी करून मराठा समाजाला आरक्षण देण्याचे
शासनाचे धोरणही नव्हते. कुणाच्याही हक्कावर अतिक्रमण न करता अतिरिक्त आरक्षण
देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हा निर्णय न्यायालयाच्या पातळीवर टिकण्यासाठी
परिपूर्ण तयारी करण्यात आली. यामुळे हा निर्णय घेण्यास विलंब झाला. उद्योग मंत्री
नारायण राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ समितीने राज्यातील चार लाख पाच हजार
कुटुंबाचे सर्वेक्षण करुन, ऐतिहासिक, सामाजिक संदर्भ तपासून साधार माहिती आपल्या
सविस्तर अहवालाद्वारे सादर केली.
आरक्षण
मिळाले तरी केवळ त्यावर अवलंबून न राहता मराठा समाजातील युवकांना कठोर परिश्रमाचा
सल्ला द्यावा लागेल, कारण कठोर परिश्रमाला व कष्टाला पर्याय नाही, असे सांगून
श्री. चव्हाण म्हणाले की, या आरक्षणाचा उपयोग करून मराठा समाजाने शैक्षणिक प्रगती
केली पाहिजे. आजघडीला मराठा समाजातील एकही आयएएस अधिकारी थेट सेवेने नियुक्त
झालेला नाही. मुंबईतील गिरणी कामगार आणि माथाडी कामगारांनी मोठ्या कष्टाने मुंबईची
उभारणी केली. परंतू आता काळ बदलला आहे. शिक्षणाचा पाया मजबूत केल्याशिवाय तरणोपाय
नाही. यामुळेच समाजाच्या सर्व नेत्यांनी युवा पिढीला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले
पाहिजे.
राज्यात
आरक्षणाची सुरवात करणारे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची जयंती आहे. त्यांचा
आदर्श ठेऊनच सरकार काम करीत आहे, असे सांगून श्री. चव्हाण यांनी हा निर्णय
घेण्यासाठी सहकार्य करणारे माजी केंद्रीय मंत्री श्री. शरद पवार, उपमुख्यमंत्री
श्री. अजित पवार, उद्योग मंत्री श्री. नारायण राणे, राणे समितीचे सर्व सदस्य आणि
समाजातील सर्व संघटनांचे नेते व कार्यकर्ते यांचे आभार मानले. हा निर्णय घेताना
अन्य समाजाच्या नेत्यांचेही सहकार्य लाभल्याचा उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी आवर्जून
केला.
यावेळी संभाजी
ब्रिगेड मुंबईचे सुभाष घुमरे पाटील, मराठा महासंघाचे कोषाध्यक्ष प्रकाश देशमुख, मराठा महासंघाचे
संयुक्त सरचिटणीस दिलीप जगताप, छावा मराठा युवा संघटनेचे अध्यक्ष किशोर चव्हाण, राष्ट्रीय छावा
संघटनेचे गंगाधर काळकुटे, अखिल भारतीय
छावा संघटनेचे नानासाहेब जावळे पाटील, मराठा महासंघाचे अनिल ताडगे, अखिल भारतीय छावा संघटनेचे आप्पासाहेब कुढेकर, जिजाऊ ब्रिगेडच्या
सुनिता काटकर, युवराज उलपे, नितीन पाटील,विनोद कांबळे, साजन जाधव, आर. आर. कदम, सुहास राणे, संतोष नानावटे, एकनाथ दांगट, रमेश पाटील, अमित जाधव, आण्णासाहेब साळुंखे, सुनिल पाटील, उत्तम भोईर, संभाजीराव दहातोंडे आदी उपस्थित होते.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा