गुरुवार, ९ जानेवारी, २०१४

शिक्षकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊ  - पृथ्वीराज चव्हाण
सातारा, दि. 9  : शिक्षकांच्या सर्व मागण्यांबाबत राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल. अशैक्षणिक काम कमी करण्याबाबतही आपण प्रयत्न करणार आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री  पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे 15 वे त्रैवार्षिक महाअधिवेशन पाचगणी येथे झाले.  या महाअधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम, पालकमंत्री  शशिकांत शिंदे, सहकारमंत्री  हर्षवर्धन पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष अरुणादेवी पिसाळ,  मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत बांगर, आमदार सर्वश्री मकरंद पाटील,  जयकुमार गोरे, सदाशिव पाटील, नगराध्यक्ष लक्ष्मी कराडकर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, राज्याचा विकास दर हा देशाच्या विकास दरापेक्षा नेहमीच 2 टक्के जादा राहिला आहे.  राज्य आणि देशाच्या विकासासाठी शिक्षण, साक्षरता आणि त्यामधील गुणवत्ता ही महत्वाची ठरते.  सर्व शिक्षा अभियानांतर्गत राज्यात आलेल्या कोट्यावधी रुपयांमधून शाळांमध्ये सुविधा निर्माण केल्या. दोन कोटीहून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची यंत्रणा उभी केली आहे.  देशाला महाशक्ती व्हायचे असेल तर शिक्षण आणि बौध्दिक कौशल्यावर होता येईल.  जपान आणि इस्त्राइल देशासारखे देशाला आणि राज्याला बौध्दिक कौशल्यावर आणि ज्ञानाधारित गुणवत्तेवरच प्रगतीपथावर नेता येणार आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थी जगाच्या व्यासपीठावर कोठेही जावू शकतील अशी पिढी घडवली पाहिजे, असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले, शिक्षकांनी गुणवत्तेच्या आधावर देशाची भावी पिढी तयार करावी.  यासाठी तुम्हाला सुविधा दिल्या पाहिजेत.  राज्य शासन निश्चितपणे तुमच्या पाठीशी आहे.  एम.एस.सी.आय.टी. साठी तुम्हाला आणखी 6 महिन्यांची मुतदवाढ कशी देता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.  मध्यवर्ती स्वयंपाक घर करुन गाडीने सर्व शाळांमध्ये भोजन पुरविण्याचा आमचा प्रयत्न असून 38 हजार किचनशेड मंजूर केलेत.  त्यापैकी 20 हजार किचन शेड पूर्ण असून 18 हजार प्रगतीपथावर आहेत.  राजीव गांधी विमा योजनेतून विद्यार्थ्यांना 8 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहेत.  तुमच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक निर्णय घेईल मात्र, प्राथमिक शाळांमधील गुणवत्ता वाढविण्याचे काम तुम्हाला करावे लागेल असेही ते शेवटी म्हणाले.
प्राथमिक शाळा बंद का  होतात याचे आत्मचिंन करावे लागेल, असे सांगून वनमंत्री श्री. कदम म्हणाले, मी शिक्षणमंत्री असताना घेतलेल्या निर्णयांची फक्त अंमलबजावणी केल्यास नवीन कोणतेही निर्णय घेण्याची आवश्यकता नाही.  शाळांमधील गुणवत्ता वाढली नाही तर पुढचा काळा कठीण आहे, असेही ते म्हणाले.
पालकमंत्री शशिकांत शिंदे यावेळी म्हणाले, देशाचे आणि राज्याचे भविष्यकाळ घडविण्याचे काम ग्रामीण भागातील शिक्षक करीत आहेत.  ग्रामीण भागातील प्राथमिक शिक्षक देशासाठी आय.ए.एस. विद्यार्थी घडविण्याचे कामही करतोय.  शिक्षक हा शिक्षणासाठी असावा तो कंत्राटासाठी नसावा त्यासाठी त्याच्या कामात अमुलाग्र बदल  झाला पाहिजे. त्याच्यावरील अन्य कामांचा भार कमी व्हायला हवा.
सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील म्हणाले, देशाची नवी पिढी घडवण्याचं काम शिक्षकाच्या माध्यमातून होतयं. आजही शिक्षकाला आदरानं गुरुजी म्हटलं जाते. या गुरुजी शब्दाचं काम तुम्हा-आम्हाला करावं लागणार आहे.  राज्य शासन आपल्या पाठीशी ठामपणे उभं राहतय.  राज्याची शैक्षणिक दिशा कशी असावी याचा विचार होणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या पर्यायाने शाळांच्या गुणात्मक वाढीकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.  प्राथमिक शाळांमधील पटसंख्या का कमी होतेय या विषयी आपणाला विचार करावा लागेल.  शिक्षकांनी राष्ट्रीय आणि सामाजिक बांधिलकी म्हणून गुणात्मक शिक्षणासाठी प्रयत्न करावेत आणि राज्याला शिक्षणात पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवावे, असे आवानही त्यांनी शेवटी केले.
स्वागताध्यक्ष गृहमंत्री सतेज पाटील यावेळी म्हणाले, शिक्षकांच्या समस्या, प्रश्न याची जाणीव मला आहे.  त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले. काही विषय माझ्यास्तरावर मार्गी लावण्याचा प्रयत्न केला.  शाळेचा दर्जा प्राधान्याने घ्यायला हवा ती नैतिक जबाबदारी आपली आहे.  शैक्षणिक दर्जा वाढला पाहिजे.  याशिवाय शाळांचा दर्जा का कमी होतोय याचाही विचार करायला हवा असेही ते म्हणाले.
            या महाअधिवेशनाची सुरुवात मुख्यमंत्री आणि अन्य उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन करण्यात आली.  यावेळी आमदार सदाशिव पाटील यांना शिक्षक मित्र पुरस्काराने गौरिवण्यात आले. शिक्षक समितीचे राज्याचे अध्यक्ष नाना जोशी यांनी प्रास्ताविक केले. 
            यावेळी आनंदराव पाटील, जिल्हा परिषद शिक्षण सभापती संजय देसाई, पंचायत समिती सभपती जयश्री जंगम, महाबळेश्वरचे नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे, शिवाजीराव साखरे, उदय शिंदे, संजय कळमकर आदींसह राज्यातून आलेले प्राथमिक शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा