शनिवार, २५ जानेवारी, २०१४

राष्ट्राला बळकट करण्यासाठी महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर ठेवुया ;
प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या जनतेला शुभेच्छा
          मुंबई, दि. २५ : देशाच्या जडणघडणीत महाराष्ट्राने नेहमीच मोठे योगदान दिले असून राष्ट्राला अधिक बळकट करण्यासाठी आपण सारे महाराष्ट्राला आघाडीवर ठेवण्यासाठी प्रयत्न करूया, अशा शब्दात  मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
विकास हा केवळ राज्यातील औद्योगिक आणि आर्थिक गुंतवणुकीतून मोजता येणार नाही तर यामुळे प्रत्यक्षात किती हातांना काम मिळाले, जीवनमानात कसा परिणाम झाला आणि अगदी शेवटच्या व्यक्तीच्या आयुष्यात किती फरक पडला हे आपल्या दृष्टीने महात्वाचे आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, महाराष्ट्र ज्याप्रमाणे परकीय गुंतवणूक आणण्यात देशात प्रथम क्रमांकावर आहे, त्याचप्रमाणे सामाजिक सुधारणांचे निर्णय घेण्यात  देशात अग्रेसर आहे. राज्यात अन्नावाचून कुणी उपाशी राहणार नाही, यासाठी लवकरच अन्न सुरक्षा योजना ही क्रांतिकारी योजना राबविण्यात येणार असून सर्वाना हक्काचे घर आणि ते देखील परवडणाऱ्या किंमतींत मिळावे म्हणून शासनाने महत्वाची पाऊले उचलली आहेत. राज्याने दुष्काळ मुक्त व्हावे, कोरडवाहू शेतीला संजीवनी मिळावी आणि पाण्याची टंचाई कायमची बंद व्हावी म्हणून राज्याने केलेले प्रयत्न यशस्वी होत आहेत, ज्याचे अनुकरण इतर राज्येही करू लागली आहेत.

आज अंधश्रद्धा आणि जादुटोणासारख्या कुप्रथा थांबविण्यासाठी शासनाने घेतलेला पुढाकार क्रांतिकारी म्हणावा असाच आहे, भ्रष्टाचाराला  आळा घालण्यासाठी देखील आम्ही लोकपाल बिलाची परिणामकारक अंमलबजावणी राज्यात करू असा निर्धार केला आहे. 

देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राने सर्वाधिक योगदान दिले असून पुढेही आपण सर्व यासाठी प्रयत्न करीत राहू आणि या प्रजासत्ताक दिनी धर्मनिरपेक्ष वृत्तीने राज्याच्या विकासासाठी काम करीत राहू अशी शपथ घेवुया,असेही मुख्यमंत्री आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा