गुरुवार, २३ जानेवारी, २०१४

दावोस येथे मुख्यमंत्र्यांनी केली विविध उद्योजकांशी चर्चा
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीसाठी  
प्रख्यात ‘झुरिक विमानतळ व्यवस्थापन’ उत्सुक
मुंबई दि. 23 : वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीसाठी दावोस (स्वित्झरलँड) येथे गेलेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दौ-याचा पहिल्या दिवशी कारगिल इन्कॉर्पोरेटेड ही खाद्यतेल उत्पादक बलाढ्य कंपनी, शीतपेय व मद्यनिर्मिती क्षेत्रातील ‘सॅबमिलर’, जपान एक्स्टर्नल ट्रेड ऑर्गनायजेशन (जेट्रो) आणि ‘झुरिक विमानतळ’ पदाधिकाऱ्‍यांची भेट घेवून त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. झुरिक विमानतळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी थॉमस केर्न यांनी नवी मुंबई विमानतळाच्या विकासाबाबत विशेष औसुक्य दाखविले. 
झुरिक विमानतळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी थॉमस केर्न आणि त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने काल मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांची भेट घेवून महाराष्ट्रातील विविध हवाई वाहतुकविषयक प्रकल्पांमध्ये सहभाग घेण्याबाबत चर्चा केली.  झुरिक विमानतळ हा तीन धावपट्टया असलेला आणि ए 380 सारखी मोठी विमाने उतरण्याची क्षमता असलेला अत्याधुनिक सुविधा आहे.  श्री. चव्हाण यांनी सुरुवातीला या विमानतळाची पाहणी केली. त्यानंतर झालेल्या चर्चेत त्यांनी शिष्टमंडळाबरोबर महाराष्ट्रातील गुंतवणुकीचा संधींबाबत सविस्तर चर्चा केली. 
पुणे, नागपूर आणि नवी मुंबई येथे नव्याने उभारल्या जाणाऱ्या विमानतळांविषयी श्री. चव्हाण यांनी माहिती दिली.  सागरी किनारा नियंत्रण नियमावली, वन विभाग आणि पर्यावरण विभाग यांची मान्यता मिळालेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीमध्ये झुरिक विमानतळ व्यवस्थापनाने विशेष औसुक्य दाखविले. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया यांनी शिष्टमंडळाला नवी मुंबई विमानतळाच्या भुसंपादन प्रक्रियेबाबत आणि विशेषत: ‘नयना’ (नवी मुंबई एअरपोर्ट इन्फ्लुअन्स नोटीफाईड एरिया) या नव्या मॉडेलविषयी माहिती दिली.  झुरिक विमानतळ सध्या जीव्हीके ग्रुपसोबतच्या भागीदारीने बंगळुरु विमानतळाचे व्यवस्थापन पाहत आहे. महाराष्ट्रातील नव्या प्रकल्पांमध्ये आपण गुंतवणूक करु इच्छितो असे श्री. थॉमस केर्न यांनी सांगितले. 
कारगिल खाद्यतेल उत्पादक कंपनीशी चर्चा
कारगिल या अमेरिकेतील बहुराष्ट्रीय कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हीड मॅकलेनन यांची आणि श्री. चव्हाण यांची काल चर्चा झाली.  कारगिल ही कंपनी अमेरिकेतील बलाढ्य खाद्यतेल उत्पादक कंपनी असून महाराष्ट्रात कुरकुंभ येथे त्यांचा खाद्यतेल शुध्दीकरण प्रकल्प कार्यरत आहे. या कंपनीला महाराष्ट्रामध्ये मोठा विस्तार करावयाच्या असून त्यासाठी आवश्यक ते सहकार्य राज्य शासनाकडून मिळावे, अशी विनंती श्री. मॅकलेनन यांनी मुख्यमंत्र्यांना केली. 
महाराष्ट्र हा सोयाबिनचा सर्वात मोठा उत्पादक असून कारगिल कंपनी मुख्यत्वे सोयाबिन तेल व्यवसायात आहे. महाराष्ट्रातील सोयाबिनचे उत्पादन लक्षात घेता आपण आणखीन नविन प्रकल्प महाराष्ट्रात सुरु करु इच्छितो व अधिक चर्चेसाठी आपण पुढील महिन्यात महाराष्ट्रात येणार आहोत, असे श्री मॅकलेनन यांनी स्पष्ट केले.  आपली कंपनी मक्याशी संबंधित प्रकल्पांबाबतही महाराष्ट्रात येण्यास उत्सुक आहे, असे ते म्हणाले. 
सॅबमिलर शीतपेय व मद्यनिर्मिती कंपनीसोबत चर्चा
ग्रेट ब्रिटनमधील लंडन येथे मुख्यालय असलेल्या सॅबमिलर या शीतपेय व मद्यनिर्मिती क्षेत्रातील कंपनीने महाराष्ट्रात आपल्या सध्याच्या प्रकल्पाचा विस्तार करण्याची तयारी मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेत दर्शविली.  महसुलाच्या दृष्टीने सॅबमिलर ही कंपनी जगातील दुसऱ्या क्रमांकाची आहे.  फोस्टर्स, ग्रोल्स, पेरोनी नास्ट्रो अझुरो आणि पिल्सनर हे या कंपनीचे जगप्रसिध्द ब्रँड आहेत. कोकाकोला या जगप्रसिध्द कंपनीसाठी ही कंपनी बॉटलिंगचे काम करते. आशिया, आफ्रिका, युरोप, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या खंडातील 75 देशांमध्ये कंपनीचे प्रकल्प आहेत.
महाराष्ट्रातील वाळुंज (औरंगाबाद) येथील एमआयडीसीमध्ये त्यांचा प्रकल्प कार्यरत आहेत. भारतामध्ये उपलब्ध असलेली बाजारपेठ लक्षात घेता आधुनिक तंत्रज्ञान वापरुन महाराष्ट्रामध्ये आणखी प्रकल्प सुरु करण्याची आपली तयारी आहे, असे या कंपनीच्यावतीने सांगण्यात आले.  बार्लीसारख्या धान्यातून मद्यनिर्मिती करण्यातील या कंपनीचे औसुक्य पाहुन मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांनी त्यांना नागपूर येथे फेब्रुवारी, 2014 मध्ये होणा-या कृषि वसंत या कृषिविषयक भव्य प्रदर्शनाला भेट देण्याचे निमंत्रण दिले. विदर्भ आणि विशेषत: नागपूर येथे आपण गुंतवणुक करण्यास उत्सुक आहोत, असे कंपनीच्यावतीने सांगण्यात आले. 
जपानी उद्योग महाराष्ट्रात येण्यास उत्सुक
जपानमधील गुंतवणुक मोठा प्रमाणात महाराष्ट्रात यावी, या हेतूने जपान एक्स्टर्नल ट्रेड ऑर्गनायजेशन (जेट्रो) चे अध्यक्ष हिरोयुकी इशिगे यांच्या नेतृत्वाखाली जपानी उद्योजकांच्या एका शिष्टमंडळाने काल श्री. चव्हाण यांच्याशी सविस्तर चर्चा केली.  अहमदनगर जिल्हयातील सुपा पारनेर येथे जपानी इन्वेस्टमेंट झोन उभारण्यासंदर्भात यावेळी सविस्तर चर्चा झाली.  महाराष्ट्रात सध्या 277 जपानी उद्योग कार्यरत आहेत.  ही संख्या देशात सर्वोच्च असून यामध्ये ब्रिजस्टोन, निप्रो, कोमात्सु या मोठया उद्योगांचा समावेश आहे.  जपान आणि महाराष्ट्र यांच्यातील औद्यागिक सहकार्य वाढविण्यासाठी महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळाने सुरु केलेल्या जपान कक्षाविषयी श्री. इशिगे यांनी समाधान व्यक्त केले.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी वाहननिर्मिती क्षेत्र व विशेषत: मोटारकार निर्मिती क्षेत्रामध्ये जपानी उद्योजकांनी सहभाग घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचबरोबर औषधनिर्मिती आणि वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये जपानने नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला असल्याने या क्षेत्रातही होणाऱ्या गुंतवणुकीचे आम्ही स्वागत करु, असे श्री चव्हाण म्हणाले. 
महाराष्ट्रातील विविध पायाभूत सुविधांच्या प्रकल्पामधील सहभागाबाबत जेट्रोने औसुक्य दाखविले. विशेषत: नवी मुंबई, पुणे आणि नागपूर येथे होणाऱ्या ग्रीनफिल्ड विमानतळांच्या उभारणीबाबत जपानमधील अनेक कंपन्या उत्सुक आहेत, असे सांगण्यात आले.  पाणी व्यवस्थापन, जलशुध्दीकरण प्रकल्प आणि विविध पर्यावरण विषयक प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले.  श्री. इशिगे यांनी मुख्यमंत्र्यांना यावेळी जपान भेटीचे निमंत्रण दिले. 

यावेळी मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंह, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटीया, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्र उपस्थित होते.

०००००००

1 टिप्पणी:

  1. Maharashtra has something unique which other states don't have. I think our strategic location and infrastructure suits those companies. I don't think only good marketing helps attract investment. You need to really give them solid solutions. Anirudha ashtaputre

    उत्तर द्याहटवा