विदर्भासह राज्याच्या सर्व
प्रश्नांवर अधिवेशनाचा
वेळ वाया न घालवता चर्चा व्हावी
-----------------
विरोधी पक्ष नेत्यांसमवेत बैठकीत
मुख्यमंत्र्यांचे आवाहन
नागपूर दि.8 : विदर्भाच्या सर्व प्रश्नांवर गांभीर्यपूर्वक चर्चा विधीमंडळात होणे आवश्यक
आहे, यादृष्टीने अधिवेशनाचा वेळ वाया न घालविता सर्वांनीच एकत्रितपणे सकारात्मक
दृष्टीकोन ठेवून कामकाज चालवावे, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज
येथे केले.
उद्यापासून
विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु होत असून या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येस विरोधी
पक्षनेत्यांशी रामगिरी निवासस्थानी चर्चा करतांना मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी विधानसभेतील विरोधीपक्ष नेते एकनाथ
खडसे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे, त्याचप्रमाणे विविध पक्षांचे
गटनेते उपस्थित होते.
यावेळी
बोलतांना एकनाथ खडसे यांनी अधिवेशनाच्या दृष्टीने विविध मुद्दे उपस्थित केले. त्याचप्रमाणे राज्यासमोरील तसेच विदर्भातील
काही प्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे असा आग्रह धरला. विनोद तावडे, आमदार सर्वश्री
सुभाष देसाई, कपिल पाटील, बाळा नांदगावकर यांनी देखील सावकारी विधेयक, अन्न
सुरक्षा, केळकर समिती, सीमा प्रश्न, आदर्श, धोकादायक इमारती, वस्तीशाळा,
कॅम्पाकोला यासारख्या काही मुद्यांवर चर्चा व्हावी असे सांगितले.
मुख्यमंत्री
यावेळी म्हणाले की, या अधिवेशनात विदर्भाच्या विकासासाठी त्याचप्रमाणे येथील
औद्योगिक प्रगती, कृषी विकास या संदर्भात घेतलेल्या निर्णयांची कशी अंमलबजावणी
झाली आहे, तेही पाहिले जाईल. निर्णय
घेतांना शासनाने नेहमीच सकारात्मक आणि कुठलेही पक्षीय भेद न ठेवणारा दृष्टीकोन
ठेवला असून त्यादृष्टीने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. या पुढील काळात आपल्या समोरील आव्हानांचा
आपल्याला मुकाबला करायचा असून विरोधी पक्षांनी देखील सामंजस्यपूर्ण भूमिका घेणे
आवश्यक आहे. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राज्यमंत्रिमंडळातील सदस्य
त्याचप्रमाणे मुख्य सचिव जे.एस.सहारिया व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
-----0-----
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा