रविवार, १ डिसेंबर, २०१३

 
मुख्यमंत्री रविवारी पोचले कामकाजासाठी
मंत्रालयात : नव्या मुख्य सचिवांना दिल्या शुभेच्छा
मुंबई, दि. १ : नवी दिल्ली येथे दोनच दिवसांपूर्वी आपल्या कन्येच्या अतिशय साध्या पद्धतीच्या विवाह समारंभात वधुपित्याच्या भुमिकेत असलेले मुख्यमंत्री  पृथ्वीराज चव्हाण आज रविवारी दुपारी मुंबईत ‘वर्षा’ निवासस्थानी पोचताच पुन्हा कर्तव्यदक्ष मुख्यमंत्र्याच्या भुमिकेत गेले आणि रविवारचा दिवस सुट्टीत न घालवता त्यांनी थेट मंत्रालय गाठले. कालच पदाचा कार्यभार स्वीकारलेले नूतन मुख्य सचिव ज. स. सहारिया यांना त्यांनी पुष्पगुच्छ देऊन कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आणि काही म‍हत्वाचे शासकीय कामकाजही केले.
मुख्यमंत्री काल दुपारच्या सुमारास नवी दिल्लीहुन मुंबईत पोचले आणि लगेचच ते ‘वर्षा’ निवासस्थानी असलेल्या कार्यालयात दाखल झाले. काही महत्वाच्या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या करुन त्यांनी मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यानंतर त्यांनी ‘मंत्रालयात निघण्याची तयारी करा’ असा आदेश खासगी सचिवांना दिला. सुरक्षा यंत्रणेला आवश्यक सुचना देताच काही मिनिटांतच मुख्यमंत्र्यांचा वाहनताफा मंत्रालयाच्या दिशेने रवानाही झाला.
      मंत्रालयात पोचताच श्री. चव्हाण आपल्या कार्यालयातील दालनात आले. नूतन मुख्य सचिव जे. एस. सहारिया यांनी त्यांची भेट घेतली. श्री. चव्हाण यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. नंतर त्यांनी काही महत्वाचे प्रशासकीय कामकाज पार पाडले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव अजित कुमार जैन,  प्रधान सचिव आशिष कुमार सिंह व अन्य अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्रासारख्या प्रगत आणि महत्वाच्या राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या श्री. चव्हाण यांनी साधी राहणी, स्वच्छ प्रतिमा, पारदर्शक प्रशासनाचे उदाहरण सर्वांसमोर ठेवतानाच वैयक्तिक जीवनातही कन्येच्या विवाह समारंभाच्या निमित्ताने एक अनुकरणीय पायंडा पाडला. आजची त्यांची मंत्रालयाची भेट हाही त्यांच्या सतत कार्यमग्न राहण्याच्या कार्यपद्धतीचाच भाग होता.
                                     ०००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा