शुक्रवार, १५ नोव्हेंबर, २०१३

 
वीज निर्मिती क्षमता वाढविण्याची आवश्यकता -- राष्ट्रपती


मुंबई दि. 15 : देशाच्या सर्वांगीण विकासासाठी पारंपरिक तसेच अपारंपरिक अशा सर्व प्रकारच्या माध्यमांतून  देशातील वीज उत्पादन क्षमता वाढविण्याची आवश्यकता असल्याचे  प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज येथे केले.
भाभा अणुशक्ती संशोधन केंद्राच्या प्रशिक्षण विद्यालयाच्या दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी बोलत होते. यावेळी राज्यपाल के. शंकर नारायणन , मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आदि मान्यवर उपस्थित होते.
            राष्ट्रपत्री पुढे म्हणाले की , पर्यावरणाचे संरक्षण आणि विकास याचा योग्य मेळ साधने आवश्यक आहे. देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत वीज पोहचली पाहिजे तसेच आपल्याकडे असलेल्या क्षमतेचा पूर्ण वापर करुन वीज निर्मिती केली गेली पाहिजे. आज देशात फक्त दोन टक्के वीज ही अणुऊर्जेद्वारे निर्माण केली जाते. अणुऊर्जेची निर्मिती क्षमता आणखी वाढविण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर पारंपरिक आणि अपारंपरिक अशा सर्व स्त्रोतांपासून वीज निर्मिती क्षमतेमध्ये वाढ करणे गरजेचे असल्यामुळे  वैज्ञानिकांनी त्यादृष्टीने प्रयत्न करावेत.
कृषी तसेच फळ प्रक्रिया उद्योगात तंत्रज्ञानाचा उपयोग अधिकाधीक कसा करता येईल याकडे विशेष लक्ष द्यावे. आपले प्रशिक्षण पूर्ण करुन प्रत्यक्षात सेवेत रुजु होणाऱ्या वैज्ञानिकांनी नवीन आव्हानांना सामोरे जाऊन देशाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे असे आवाहन करुन राष्ट्रपतींनी प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या सर्व पदवीधारकांचे अभिनंदन केले.
            मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यावेळी बोलतांना म्हणाले की , अणुऊर्जा ही महत्वाची असून त्यासाठी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प सुरु करण्याची प्रक्रिया सुरु आहे. यासाठी आवश्यक असणारी पर्यावरण मंत्रालयाची मान्यता मिळविण्यात आली आहे. हा प्रकल्प राबवितांना सुरक्षेला सर्वप्रथम प्राधान्य देण्यात येईल. या प्रकल्पासाठी जमीन संपादीत करण्यात आली आहे. प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला देण्याचे नियोजन आहे.  देशाच्या प्रगतीमध्येअभियंते आणि वैज्ञानिक यांचे  योगदान व्हावे. त्यांच्याकरीता योग्य प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्याची आवश्यकता असल्याचेही मुख्यमत्र्यांनी सांगीतले.
            होमी भाभा पुरस्काराचे वितरण राष्ट्रपतींच्या हस्ते या प्रसंगी करण्यात आले. बी.ए.आर.सी च्याविविध ठिकाणी अणुऊर्जेच्या अनुषंगाने सुरु करण्यात आलेल्या नवीन सुविधांचे उद्घाटन राष्ट्रपतींनीरिमोट कंट्रोलद्वारे केले.तसेच बी.ए.आर.सी ने विकसित केलेले शेंगदाण्याचे टॅग - 24 या नवीन बियाणाचे लोकार्पणही राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले.
            अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. आर.के.सिन्हा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. बी.ए.आर.सी चे वैज्ञानिक आणि अणुऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ  आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.



 00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा