सचिनच्या ‘भारतरत्न’मुळे तमाम युवकांना
सतत प्रेरणा मिळत राहील : मुख्यमंत्री
मुंबई, दि. १६ : क्रिकेट विश्वात स्वत:चे अबाधित स्थान निर्माण करणारा विक्रमादित्य
सचिन रमेश तेंडुलकर याला ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, ही अत्यानंदाची
घटना आहे. या पुरस्कारामुळे कोणत्याही क्षेत्रात स्वत:चे स्थान निर्माण करु इच्छिणाऱ्या
तमाम युवक युवतींना सतत प्रेरणा मिळत राहील, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री पृथ्वीराज
चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
श्री. चव्हाण यांनी म्हटले आहे की,
सचिनने आपल्या खेळाने गेली २४ वर्षे जगातील क्रिकेट रसिकांना केवळ आनंद दिला.
खेळाडु म्हणुन तो सर्वश्रेष्ठच आहे, पण माणूस म्हणुनही तो श्रेष्ठ आहे. एखादी गोष्ट
सर्वस्व झोकुन करणे आणि त्यात सातत्य राखणे, हा त्याचा गुण सर्वांनी घेण्यासारखा आहे.
अतिशय शानदारपणे आजच निवृत्त झालेल्या सचिनला ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार
देऊन केंद्र सरकारने औचित्य बाळगले, हे विशेष उल्लेखनीय आहे. सचिनची क्रिकेटमधील निवृत्ती
हा त्याच्या करोडो चाहत्यांच्या दृष्टीने दु:खदायक असली तरी त्याचा आज झालेला सन्मान
हा सर्वांना सुखावुन जाणारा आहे. सचिनने आता अनेक नवे ‘सचिन’ घडवावेत, अशा शुभेच्छा
श्री. चव्हाण यांनी दिल्या आहेत.
०००००
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा