सोमवार, १२ ऑगस्ट, २०१३

नवी मुंबई प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी
कृती कार्यक्रम आखण्याचे मुख्यमंत्र्यांचे सिडकोला आदेश
मुंबई, दि. 12 :  नवी मुंबईच्या निर्मिती व विकासामध्ये ‘सिडको’चे भरीव योगदान असून नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा अत्यंत महत्वांकाक्षी असा राष्ट्रीय महत्वाचा प्रकल्प ‘सिडको’च्या माध्यमातून साकारला जाणार आहे. या प्रकल्पाच्या मार्गातील सर्व अडचणी प्रकल्पग्रस्त, लोकप्रतिनिधी आणि सर्व संबंधितांशी चर्चा करुनच समन्वयाने दूर केल्या जातील. यासाठी लवकरच व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात येईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज सांगितले. प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न कालबद्ध रितीने सोडविण्यासाठी कृती कार्यक्रम तयार करण्याचे आदेश त्यांनी ‘सिडको’ला दिले.
          नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री चव्हाण यांनी आज बैठक आयोजित केली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री नारायण राणे, उत्पादन शुल्क मंत्री गणेश नाईक, रायगडचे पालकमंत्री व जलसंपदा मंत्री सुनील तटकरे, नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत, ‘सिडको’चे अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, आमदार प्रशांत ठाकुर, संदीप नाईक, संचालक नामदेव भगत, मुख्य सचिव जयंत कुमार बाँठिया, ‘सिडको’चे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया आदि मान्यवर उपस्थित होते.   
प्रकल्पग्रस्तांना १२.५ टक्के योजनेनुसार भूखंडाचे वाटप जलद गतीने व पूर्णपणे पारदर्शक पध्दतीने होण्यासाठी, भूखंड वाटपाच्या प्रक्रियेमध्ये आवश्यक तो बदल करण्यात येत आहे. वैयक्तिकपणे प्रकरणनिहाय भूखंडाचे वाटप करण्याऐवजी, गावनिहाय एकाचवेळी भूखंड वाटप करण्याची पारदर्शक प्रक्रिया सुरु करण्यात येत आहे. ही नवीन प्रणाली लवकरच कार्यप्रवण होईल, अशी माहिती श्री. चव्हाण यांनी दिली.
प्रकल्पग्रस्तांसाठी ग्राहक सुविधा केंद्र सुरु करण्यात येत आहे. तक्रारीचे व विशेषत: प्रकल्पग्रस्तांनी केलेल्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. भ्रष्टाचारासंबंधी, विशेषत: प्रकल्पग्रस्तांनी केलेल्या तक्रारीच्या बाबतीत कार्यवाही करण्यासाठी दक्षता कक्ष निर्माण करण्यात आला आहे. तसेच महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक मुख्य दक्षता अधिकारी म्हणून करण्यात येत आहे, असे ते म्हणाले.
प्रकल्पग्रस्त उमेदवारांना भरतीपूर्व तसेच अग्नीशमन सेवेचे प्रशिक्षण, वैद्यकीय, अभियांत्रिकी वगैरे शिक्षणासाठी प्रवेशाकरिता प्रशिक्षण, तसेच रोजगाराभिमुख व्यवसायाचे प्रशिक्षण देण्याबद्दल आवश्यक ती प्रक्रिया लवकरच करण्यात येणार आहे.
००००००



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा