मुंबई चेंबर ऑफ कॉमर्सच्या उपक्रमांना
शासन सर्वतोपरी सहकार्य करेल
--
मुख्यमंत्री
मुंबई,
दि. 7 : मुंबई चेंबर ऑफ कॉमर्स ही देशातील जुनी संस्था असून महाराष्ट्राच्या
विकासात त्याचे मोठे योगदान आहे. आज या चेंबरला 177 वर्ष पूर्ण होत असून
महाराष्ट्रात राबवित असलेल्या यांच्या उपक्रमांना राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य
करील, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काल येथे सांगितले.
मुंबई
चेंबर ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्रीची 177 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कफ परेड येथील ताज
प्रेसिडेंट हॉटेल येथे आयोजित करण्यात आली होती. या सभेत मुख्य अतिथी म्हणून मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी
चेंबरच्या विविध प्रकल्पांची माहिती घेऊन चेंबर आणि राज्य शासन यांनी मिळून मुंबई
शहराच्या विकासासाठी काम करु या, असे सांगितले.
राज्यात
सध्या दुष्काळामुळे तब्बल 4 हजार 559 गावे आणि 11 हजार 333 वाड्यांना टँकरने पाणी
पुरविले जात असून चारा छावण्या बंद न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी
माहिती त्यांनी यावेळी दिली. राज्य शासनापुढे अनेक आव्हाने आहेत. पिण्याच्या
पाण्याचा प्रश्न तातडीने सोडविण्याचा शासनाचा मानस आहे. दुष्काळावर कायमस्वरुपी मात
करण्यासाठी, पाटबंधारे प्रकल्प राबविले जाणार आहेत. नवी मुंबई विमानतळ, मेट्रो आणि
मोनो रेल, चर्चगेट ते विरार एलिव्हेटेड कॉरीडॉर प्रकल्प, नागपूर येथील मिहान
प्रकल्प शासनाने हाती घेतले असून सध्या राज्यात 22 विमानतळ आहेत. प्रत्येक
जिल्ह्यात विमानतळ करण्याचा शासनाचा विचार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
चेंबरचे
अध्यक्ष उदय खन्ना यांनी आपल्या प्रास्ताविकात चेंबरच्या कार्याची माहिती दिली.
यावेळी चेंबरचे सभासद व उद्योगपती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 0 0
0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा