शनिवार, २० एप्रिल, २०१३


राज्यात उत्पादित होणाऱ्या शंभर टक्के
कापसावर प्रक्रिया केली जाईल - मुख्यमंत्री
         जळगाव, दि.20 :  राज्यातील एकूण कापूस उत्पादनाच्या 75 टक्के कापूस बाहेरील राज्यात जात असल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांना न मिळता मध्यस्थ व्यापाऱ्यांना मिळत आहे. त्यामुळे राज्य शासन वस्त्रोद्योग धोरणाच्या माध्यमातून राज्यात उत्पादित होणाऱ्या शंभर टक्के कापसावर येथेच प्रक्रिया  करणार असल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा मोठया प्रमाणावर मिळेल,  असे  प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
        आमदार मनीषदादा जैन फाऊंडेशनमार्फत आयोजित महाराष्ट्र कापूस परिषदेच्या
उद्‌घाटनप्रसंगी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बोलत होते.  याप्रसंगी कृषी व पणन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, वस्त्रोद्योग मंत्री मोहमद आरिफ (नसीम) खान, माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार माणिकराव ठाकरे, आ.मनीष जैन, आ.शिरीष चौधरी, माजी खासदार उल्हास पाटील, महापौर किशोर पाटील, संजय गरुड, रमेश जैन, डॉ. सी. डी. माई आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
        मुख्यमंत्री श्री.चव्हाण म्हणाले, राज्यात कापूस उत्पादनासाठी 95 टक्के बी. टी. बियाणाचा वापर होत असून, कापसाचे नवीन वाण विकसीत करणाऱ्या बियाणे कंपन्यांचे संघटन करुन त्यांना शासनाकडून मदत दिली जाईल.  तसेच केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील 2 हजार 100 कृषी सर्कल मध्ये स्वयंचलित हवामान मापक यंत्र लावण्यात येणार आहेत.  त्यामुळे उपग्रहाच्या माध्यमातून उष्णतामान, हवा, आद्रता, पाऊस आदि निकषांची माहिती तात्काळ शेतकऱ्यांना दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
      राज्यातील सुमारे 82 टक्के  शेतकऱ्यांसाठी  कोरडवाहू शेती अभियान राबविले जाणार आहे. त्यात शेतकऱ्यांना कृषिमधील आधुनिक तंत्रज्ञान, हवामान, पाण्याचा शास्त्रीय वापर आदिबाबत माहिती दिली जाणार असल्याचे श्री.चव्हाण यांनी सांगितले. तसेच कृषी विभागामार्फत टेलीफोनचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी मधील शास्त्रोक्त ज्ञान, प्रगत तंत्रज्ञान, बाजारपेठांची माहिती आदी दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले तसेच ठिबक सिंचनाच्या ग्लोबल टेंडरमुळे ठिबकच्या किंमती 30 टक्के कमी झाल्याची माहिती त्यांनी दिली.
     राज्यात जळगाव जिल्हा कापूस उत्पादनात आघाडीवर असून येथे टेक्सटाईल पार्क निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्याकरिता उद्योजकांनी पुढे येण्याचे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले. राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणांतून उद्योजकांना सोयी-सुविधा देण्यात येतील असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी  जळगाव जिल्हयात कापूस संशोधन केंद्र सुरु करण्याची घोषणा केली. तसेच टेक्सटाईल पार्क निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगितले.       
 विदर्भातील आठ जिल्हयासाठी विदर्भ इंटेन्सिव पॅकेज अंतर्गत पंतप्रधान यांचेकडून पुढील 5 वर्षासाठी साडेतीन हजार कोटीचा निधी मिळालेला आहे. त्याच अनुषंगाने खान्देश इंटेन्सिव पॅकेजची मागणी पंतप्रधान यांचेकडे करणार असल्याची माहिती  श्री.चव्हाण यांनी दिली.  राज्य शासन टंचाई परिस्थितीचा सामना करत असून जळगाव जिल्हयातील सात तालुक्यात टंचाई परिस्थिती आहे अशा ठिकाणी मागेल तेथे टॅंकर व गुरांसाठी चारा छावणी सुरु केली जाईल, असे त्यांनी सांगितले. टंचाईच्या कामाबाबत लोकांच्या काही तक्रारी असतील तर त्या त्यांनी त्वरित कराव्यात असे त्यांनी सांगितले.
        सन 2011-17 च्या वस्त्रोद्योग धोरणात जळगाव जिल्हयाचा समावेश केला असून त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळेल असे वस्त्रोद्योग मंत्री नसीम खान यांनी सांगितले. तर कापूस फेडरेशन व कापूस एकाधिकार योजना बंद पडल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी नवीन व्यवस्था निर्माण झाली पाहिजे असे आमदार माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.
         शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कोणत्याही बियाणे कंपनीवर शासन कारवाई करेल, असे कृषी मंत्री विखे-पाटील यांनी सांगितले.  तसेच राज्यातील कापूस उत्पादकांनी रंगीत कापसाचे उत्पादन घेण्याचे त्यांनी आवाहन केले. कृषि विभागामार्फत शेतकऱ्यांच्या बांधावर खते व बियाणे उपलब्ध केली जात आहेत. त्याकरिता शेतकऱ्यांनी गावातील कृषी सहाय्यकांकडे बियाणांची नोंदणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. येथील शेतकरी हा चालती बोलती प्रयोगशाळा असल्याने अशा प्रगत शेतकऱ्यांचे मार्गदर्शन विद्यापीठातील प्राध्यापकांना मिळावे याकरिता कृषी विद्यापीठांना सूचना दिल्याचे श्री. विखे-पाटील यांनी सांगितले यावेळी माजी राज्यमंत्री अब्दुल सत्तार , आमदार शिरीष चौधरी यांचेही भाषणे झाली.
         आमदार श्री. जैन यांनी आपल्या प्रास्ताविकात महाराष्ट्र कापूस परिषदेच्या आयोजनाचा उद्देश सांगितला. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी महाराष्ट्र कापूस परिषदेच्या आयोजनाचे कौतुक केले. या परिषदेस जळगाव, धुळे, नंदुरबार, बुलढाणा, जालना आदी जिल्हयातील कापूस उत्पादक शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
          प्रारंभी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन महाराष्ट्र कापूस परिषदेचे उदघाटन करण्यात आले. यावेळी कापूस उत्पादक प्रगतशील शेतकरी अशोक ओंकार पाटील व जीभाऊ धनसिंग पाटील यांचा मुख्यमंत्री यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. या परिषदेत शेतकऱ्यांना शास्त्रज्ञ डॉ. सी. डी. माळी, डॉ. व्ही. एन. वाघमारे, एस. बी. नंदेश्वर,
जे. एच. मेश्राम, एस. एम. रोकडे आदींचे मार्गदर्शन मिळाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन
प्रा. सुरवाडे यांनी केले तर आभार उदय पाटील यांनी मानले.
                                                           0 0 0 0 0

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा