मंगळवार, २३ एप्रिल, २०१३

कर्करोगासंदर्भात टाटा स्मारक रुग्णालयाची
कामगिरी जागतिक दर्जाची : मुख्यमंत्री
मुंबई, दि. 23: कर्करोगाशी लढा देण्यासाठी टाटा स्मारक रुग्णालयाने केलेले संशोधन आणि या क्षेत्रात दिलेल्या योगदानाची जागतिक स्तरावर दखल घेतली जात आहे. ही अभिमानाची बाब आहे. कर्करोगावरील संशोधन अधिक व्यापक करावे, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज येथे व्यक्त केले.
            परळ येथील टाटा स्मारक रुग्णालयाच्या तीन अत्याधुनिक सुविधांचे उद्घाटन मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांच्याहस्ते करण्यात आले. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी, अन्न व औषधे प्रशासन व गृह राज्यमंत्री सतेज पाटील, आमदार बाळा नांदगावकर, अणु उर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ. आर. के. सिन्हा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
            मुख्यमंत्री म्हणाले की, रुग्णालयामध्ये नव्याने बसविण्यात आलेल्या या अत्याधुनिक यंत्रसामुग्री आणि तंत्रज्ञानामुळे कर्करोगाला प्रतिबंध करण्यात आणि उपचारासाठी मोठा हातभार मिळणार आहे. टाटा स्मारक रुग्णालय आणि रिसर्च इन्स्टीट्युटने या क्षेत्रात केलेल्या संशोधनाचा फायदा जगभरातील कर्करुग्णांना मिळत आहे. या अभूतपूर्व कामगिरीमुळे टाटा रुग्णालयाचे नाव जगाच्या नकाशावर आले आहे. आधुनिकीकरण आणि विस्तारासाठी रुग्णालयाच्या शेजारील जागा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने सकारात्मक निर्णय घेतला आहे. या रुग्णालयाचे विस्तारीकरण आणि अद्ययावतीकरण झाल्यास त्याचा फायदा लाखो रुग्णांना होणार आहे. यासाठी राज्य शासनाकडून आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल. कर्करोगाला निमंत्रण देणाऱ्या गुटख्या सारख्या पदार्थांवर बंदी घालण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला. यासाठी टाटा स्मारक रुग्णालयाच्या डॉक्टरांनी घेतलेला पुढाकार महत्वाचा होता, असेही श्री. चव्हाण यांनी यावेळी सांगितले. कर्करोगासारख्या आजाराशी लढा देण्याकामी टाटा रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचारी यांचे योगदान नक्कीच कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले.
            यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पहिला, तळ आणि सातव्या मजल्यावरील डिजीटल मॅमोग्राफी, ॲन्जोग्राफी आणि सीटीस्कॅनची एकत्रित सुविधा आणि मोलेक्युलर डायग्नॉस्टिक्स ॲण्ड ट्रान्सलेन्शल मेडीसीन या अत्याधुनिक यंत्रसामुग्री आणि उपचार पद्धतीचे उद्घाटन करण्यात आले. ॲन्जोग्राफी आणि सीटीस्कॅनची एकत्रित सुविधा असलेली यंत्रसामुग्री ही दक्षिण आशियातील पहिलीच असल्याचे यावेळी झालेल्या सादरीकरणात सांगण्यात आले.
            टाटा स्मारक रुग्णालयातील उद्घाटन समारंभानंतर मुख्यमंत्र्यांनी हाफकीन इन्स्टीट्युटला भेट दिली. यावेळी झालेल्या छोटेखानी बैठकीत हाफकिन जीव औषध महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक एस. एस. झेंडे, हाफकीन रिसर्च इन्स्टीट्युटचे संचालक डॉ. अभय चौधरी यांनी सादरीकरण केले. हाफकीनच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या विविध संशोधनाची माहिती यावेळी देण्यात आली. ग्रामीण भागात आरोग्य संस्थांना आणि कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या औषधांचे कीटची पाहणी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांनी केली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा