शुक्रवार, १२ एप्रिल, २०१३


केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाशी चर्चा करुन
चैत्यभूमी राष्ट्रीय स्मारकाचा आराखडा मंजूर करुन घ्यावा
                                                                                        - मुख्यमंत्री

          मुंबई, दि.12 : चैत्यभूमी सुशोभिकरण व राष्ट्रीय स्मारक उभारणी संदर्भात येत्या आठवड्यात केंद्रीय पर्यावरण मंत्रालयासोबत अधिकारी स्तरावर चर्चा करुन याबाबतचा आराखडा मंजूर करुन घ्यावा असे निर्देश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महापालिका आयुक्तांना दिले.
          चैत्यभूमी सुशोभिकरण व राष्ट्रीय स्मारक उभारणी प्रकल्पासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सुकाणू समितीच्या आज सह्याद्री अतिथी गृहात झालेल्या आढावा बैठकीत अध्यक्ष पदावरुन मुख्यमंत्री बोलत होते.
          स्मारकाबाबत समिती सदस्यांनी आपल्या संकल्पना लिखित स्वरुपात सादर कराव्यात अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी केली.  केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय तसेच सांस्कृतिक कार्य मंत्रालय यांच्याकडूनही काही संकल्पना घेण्याचे त्यांनी सांगितले. विधीमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर या बाबत चर्चा करण्यासाठी आपण दिल्लीला जाणार असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. 
याप्रसंगी बृहन्मुंबई महानगर पालिका आयुक्त सिताराम कुंटे यांनी प्रस्तावित चैत्यभूमि सुशोभिरण प्रकल्पाबाबत सादरीकरण केले. या प्रकल्पाच्या  पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्याचे काम कोणी करावयाचे याबाबत निर्णय व्हावयाचा आहे. चार्ल्स कोरिया यांना सुकाणू समितीवर घेतले होते परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी याबाबत आपली असमर्थता व्यक्त केली आहे.   वास्तुविशारद शशि प्रभू यांनी या प्रकल्पाचे संकल्प चित्र तयार केले आहे. या पूर्वीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे अशोक स्तंभावर सोनेरी रंग देण्याचे काम पूर्ण झाले असून वर्षातून दोनदा हे रंग काम केले जाईल अशी माहिती महापालिका आयुक्तांनी यावेळी दिली. 
प्रकल्पाची पुढील कामे करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची विशेष प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्राधिकरणाचे आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी जागतिक पातळीवर वास्तुविशारदांकडून या कामासाठी निविदा मागविण्यात येणार असल्याचे सांगितले. यासाठी या प्रकल्पाची संकल्पना आधी तयार करावी लागेल असे ते म्हणाले.  मागविलेल्या निविदांमधून एका वास्तूविशारदाची निवड करण्यासाठी निवड समिती नियुक्त करण्यात येईल आणि या समितीत नामवंत वास्तुविशारदांसोबत अन्य क्षेत्रातील अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश केला जाईल असेही त्यांनी सांगितले.
या बैठकीत मुंबईचे पालकमंत्री तथा ग्राम विकास मंत्री जयंत पाटील, महिला व बालविकास मंत्री प्रा.वर्षा गायकवाड, गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहीर, मुख्य सचिव जयंतकुमार बाँठिया, मुख्यमंत्र्याचे अपर मुख्य सचिव अजितकुमार जैन, प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव, मनुकुमार श्रीवास्तव आणि श्रीकांत सिंह, वित्त विभागाचे प्रधान सचिव सुधीर श्रीवास्तव, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त यू.पी.एस.मदान, खासदार एकनाथराव गायकवाड, समितीचे सदस्य जोगेंद्र कवाडे, आनंदराज आंबेडकर, रामदास आठवले, राजेंद्र गवई आदी उपस्थित होते.
-----
डॉ.साधले/बारसकर 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा