टेंभू आणि उरमोडी प्रकल्पासाठी
120 कोटी रुपयांचा निधी वितरीत
दुष्काळी भागातील कामांना
प्राधान्य देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई
दि. 27 फेब्रुवारी : महाराष्ट्र
कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या टेंभू आणि उरमोडी या दोन प्रकल्पासाठी 119 कोटी 80 लाख रुपयांचा निधी तातडीने वितरीत
करण्याचा निर्णय झाल्याची माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. यापैकी
टेंभू प्रकल्पासाठी 73 कोटी 7 लाख तर उरमोडी प्रकल्पासाठी 46 कोटी 72 लाख रूपयांचा
निधी वितरीत करण्यात आला.
टेंभू आणि उरमोडी या दोन
प्रकल्पामुळे ज्या दुष्काळी भागाला फायदा होतो त्याच्या पहिल्या टप्प्याचे
पाणीपूजन करतांना या दोन्ही प्रकल्पाला अधिक गती देण्यासाठी त्वरीत निधी उपलब्ध
करुन देण्यात येईल, असे मुख्यमंत्री चव्हाण यांनी
दुष्काळी दौऱ्यावर असतांना जाहीर केले होते. या अनुषंगाने टेंभू आणि उरमोडी
प्रकल्पांच्या पम्प हाऊसची आणि कालव्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करावी असे
निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. यामुळे दुष्काळी भागातील लोकांच्या
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांचे पाणी आणि चारा उपलब्ध होण्यास मदत होणार
असल्याने दुष्काळी भागातील लोकांना काही प्रमाणात दिलासा मिळेल असा विश्वास
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला.
उरमोडी प्रकल्पातंर्गत
परळी गावाजवळ कृष्णा नदीच्या उरमोडी या उपनदीवर 9.96 टी.एम.सी. क्षमतेचे धरण
बांधून त्याद्वारे सातारा तालुक्यातील 8,300 हेक्टर, खटाव तालुक्यातील 9,725
हेक्टर आणि माण तालुक्यातील 9,725 हेक्टर असे एकूण 27,750 हेक्टर क्षेत्र
सिंचनाखाली आणण्यात येणार आहे.
टेंभू प्रकल्पांतर्गत
सातारा जिल्ह्यासाठी 11 कोटी 10 लाख, सांगली जिल्ह्यासाठी 58 कोटी 22 लाख, तर
सोलापूर जिल्ह्यासाठी 3 कोटी 68 लाख निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यातून
जोडकालवा, स्थापत्य, विद्युत व यांत्रिकी कामे अशा प्रकारची कामे केली जाणार आहे. टेंभू
प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात विशेषत: तासगाव, खानापूर, कडेगांव, आटपाडी, सांगोला हे
दुष्काळग्रस्त तालुके येतात. या ठिकाणचे दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन निधी
उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
00000000
नागपूर येथील 429 कोटी रूपयांच्या
कॅन्सर रूग्णालयाच्या
प्रस्तावास मुख्यमंत्री चव्हाण
यांची मान्यता
मुंबई, दि. 27 : नागपूर
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयाच्या परिसरात नवीन कॅन्सर
रूग्णालय सुरू करण्याच्या 429 कोटी 78 लाख रूपयांच्या खर्चाच्या प्रस्तावास
मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण यांनी आज मान्यता दिली.
नागपूर आणि लगतच्या
जिल्ह्यातील तसेच मध्य भारतातील कॅन्सर रूग्णांच्या उपचारासाठी अत्याधुनिक सोयी
सुविधा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न होता. याचा भाग म्हणून कॅन्सर
रूग्णांवर व्यापक उपचार सुविधा एकाच ठिकाणी करून देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री
चव्हाण यांनी हा निर्णय घेतला.
रूग्णालयाच्या
बांधकामासाठी आणि अत्याधुनिक उपकरणांसाठी 378 कोटी 47 लाख रूपये ‘नॅशनल कॅन्सर
ग्रीड’ अंतर्गत महाराष्ट्र शासनास उपलब्ध करून देण्याबाबत केंद्र शासनास विनंती
करण्यात येणार आहे.
दर्जेदार बांधकाम व अत्याधुनिक
सुविधेवर भर द्या
नागपूर ही राज्याची उपराजधानी आहे. या ठिकाणी
उभारले जाणारे कॅन्सर रूग्णालयाचे बांधकाम दर्जेदार व्हावे, तसेच या रूग्णालयासाठी
घेण्यात येणारी सर्व उपकरणे अत्याधुनिक असावीत, त्यादृष्टीनी संबंधित अधिकाऱ्यांनी
या कामाकडे प्राधान्याने लक्ष देण्याचे निर्देश मुख्यमंत्री चव्हाण यांनी दिले.
00000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा